Wednesday, August 24, 2022

मिलन भरात


रातीच्या सावलीत
झाकाळे प्रकाश
पाताळाच्या अंतरी
कलते आकाश

होते उसास्याचे गाणे
शब्द कशाला आणावे?
किती वाटते मनाला
तु सारेच जाणावे

नसे तुला काही
किती तुटतो बकूळ
फुलबांधणीत होतो
सुगंध व्याकुळ

मी नष्ट होऊ कसा?
तुझ्या उरी साचलेला
मी होऊ का तो शब्द
ओल्या डोळ्याने वाचलेला?

मध्यराती गडे सखे
कसे चालावे अंतर?
ठेव पापण्यात माझ्या
तुझ्या स्वप्नांचे मंतर

होऊ दे ना भेट
जिव व्याकुळ वागतो
तुझ्या झोपल्या उशीला
दिप आठव जागतो

नको कुस बदलू
दिप तेवणे विसरतो
चांदण्याला घेण्या कुशी
मी बाहू पसरतो

असा वेडा उभा मी
चांदण्याच्या खाली
हो ना कधितरी
माझ्या हाकेची तु वाली

देवू किती हाका
शिखराची आन
या तमाच्या झाडाला
दे चांदण्याचे पान....

झाड चांदणे होऊ दे
फुल पडू दे दारात
चल वाहू सारे सारे
मिलन भरात....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४ .८. २०२२







No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...