Sunday, August 7, 2022

निघून जाणे

कोसळते जणू ढगातुन
आठवांचे काळीजपाणी
अन् ते ही गुमान वाहते
एकल्या माळरानी

चिंब माळ भिजतो
माजघर कोरडे ठाक
पावलास चिखलबंदी
कोणाचा त्यावर धाक?

दुर पडता पाऊस
छान तसाही दिसतो
खिडकीस कसे उमजावे
व्याकुळ किती तो असतो

येवून कधी माळावर
वेच सुनेपणाचे टिंब
ढवळ ओथंबात साचलेले
सजनाचे प्रतिबिंब

चिखलात रूतू दे तुझा
नक्षिदार पाऊल ठसा
टिपून त्यास घेवू दे
नाचल्या मोराच्या पिसा

नखशिखांत पाऊस गायील
तुझ्या स्पर्शाचे ओले गीत
माळही समजून घेईल
मग मिलनाची ओली रित

मनातल्या पावसाला
दे माळावरती संग
पाऊस कोसळून पेरेल
मातीत हिरवा रंग

माळ होईल हिरवा
धारून तुझे येणे
मग मनास टोचणार नाही
पावसाचे निघून जाणे.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७ .८. २०२२




























No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...