Thursday, December 31, 2020

वसंत भारली माती...

या प्राजक्त फुलांची 
ही कसली गर्दी?
सकाळ देते अलवार
गंधबहराची वर्दी

सांडल्या किरणांचे
भरून येती थवे
उगवत्या सुर्याचे
स्पर्श भासती नवे

काल रातीचे मळभ
आपसुक दुर सरले
दाटून गेल्या धुक्याचे
अस्तर अलबत विरले

दुरच्या गर्द जंगलाला
बहराची सय दाटली
पहाटेच्या काळजाला 
कसली खुण पटली?

दिवे विझुन गेले
आकाशी लामणदिवा
दुर भरारी मारे
स्वप्नदाटला थवा

बोटांच्या पेरांना सुचे
बटांचे गर्द गाणे
शिशीराला भारून देती
मोहरली दोन पाने

वाट उत्सुक वाटे
पावलांना गती सुचे
दुरच्या माळरानी
पक्षाची जोडी नाचे

भिंतींना लागे रंग 
हा कसला उत्सव दाटे?
वेशीस तुझ्या शहराच्या
मन घालते खेटे

रानात फुलांची गर्दी
मातीस भरते येते
शिशीराच्या मध्यावरती
हिरवळीची गीते

येत्या पानगळीची
कशास धरावी भिती?
ओंजळ भरून देईल
वसंत भारली माती...
(प्रताप)
"रचनापर्व"
1/1/2021
prataprachana.blogspot.com

Saturday, December 26, 2020

दारात फुलांची दाटी..

एक ढगाचे 
दोन तुकडे
मनात त्यांच्या 
समान दुखडे

हवा संन्यासी
वैरागमुखी चांदणे 
कुणाच्या काळजावर
उमटे कुणाचे गोंदणे

चंद्र नभीचा गातो
चकोरआलापी गाणे
मोग-याच्या वेलीला
आठवणीचे पान्हे

तु दर्ददुव्याची वाणी 
कवितेस माझ्या देते
चंद्र पुरवतो तुला
चकोरभयाची गीते

दुरदेशी चांदणउजेड
गाव उसासे भरतो
मोरपिसा-यावर मी
ओंजळ काहूरी धरतो

दिव्याच्या अंतःकरणी 
सजतो वातीचा सण
संबंध जाळुन घेणे
साधण्या प्रकाशसाजरा क्षण

या आभासाच्या अस्तरात
कोणाचा शोध चाले?
मुकशब्दाआडून मन
गुज कुणाचे खोले?

उसास्याची विण घट्ट 
गंधबहराची आरास
रातीच्या कुशीत चांद
उमलून ये भरास

मंद दिव्याच्या ठायी
हा चेतव जागर चाले
रातसजणीच्या कानी
वारा काय बोले?

सारेच काळीजक्षण
रातराणीच्या ओटी
बहराच्या पहिल्याप्रहरी
दारात फुलांची दाटी...
(प्रताप)
"रचनापर्व"
27/12/2020
prataprachana.blogspot.com

Tuesday, December 22, 2020

स्वप्नपडीचा मुहूर्त....

स्वप्नपडीचा मुहूर्त
वेशीत उभे आभास
लगडून जातो जिव
चांदण्याच्या नभास

कोण कुठला दरवेशी
नजरबंदीचा खेळ 
ओळखीच्या खिडकीशी
रेंगाळे सांजवेळ 

पापण्यांचा मुहुर्त 
नजरेला साधत नाही 
दरवेशाची जादू
काजळाने बाधत नाही 

हवेला नजीकचे जंगल
कसला सांगावा धाडे?
तटबंदीच्या भिंतीचे
अस्तर भारी जाडे

झुळुकीला दडवत नेती
पारव्याचे पंख
त्वचेच्या रंध्राखाली गोंदले
विंचवाचे डंख

दारास कसले तोरण
हा कसला उत्सव चाले
काढत चालत जावे
काळजात घुसले भाले

हाक कुणाची येते
शहराला काळीज फुटते
दाराच्या अडसराचे
भान अचानक सुटते

खिडकीला येतो बहर
दारास झुळुक भेटे
पारव्यांच्या पंखाचे
नशीब घालते खेटे

चांद बहरून येतो
प्रतिबिंब तुझे सांडे
दुरदेशी निघती चालत
तुझ्या प्रकाशाचे तांडे

गाव अंधारात बुडता
एक खिडकीत दिवा जळतो
शिखरास जोडल्या हाताचा
अर्थ मला मग कळतो....
(प्रताप)
"रचनापर्व"
23/12/2020
prataprachana.blogspot.com

Sunday, December 20, 2020

सांजपारवा...

तुझ्या शहराला बरकत आहे
तेथे माझ्या मनाचा प्राचिन ठेवा
तिथल्या जळत्या दिव्यांचा
न माझ्या अंधारास हेवा

वेदनेचे वारस शब्द घेवून
मी गझलांचे रस्ते आखतो
शब्दांचे ठसे आभासी
मुसाफिर कोण थकतो?

हे वाटा चुकवणारे वाटाडे
देतात उजाड वस्त्यांचे पत्ते
मी गिरवत जातो तुझ्या
दिर्घ आठवणींचे कित्ते

तुझ्या चेह-यासम दिसता ढग
घराहून माझ्या जातो
हा सांजपारवा धुकेरी
आर्त कसले गीत गातो?

माझ्या पुर्वजांच्या दुव्यांना
मी कवटाळुन उरास चाले
कोणाची चाहूल पूर्वजन्मीची
जखमांचे टाके खोले?

अजब अत्तर आहे तुझे
मनात दाटता दरवळ
आभाळाला जाचत राहते
चंद्रचणीची हिरवळ

देवदुतांच्या हाताचे
कंपन करती बोटे
चालत राहते गझल
काळोखास ठरवत खोटे

तुझ्या शहराला हा कसला
अंधाराचा सोस?
फकिराच्या कटो-यात तो
ओसंडे भरघोस

मी अंधाराच्या धाग्यातुन
प्रकाश विणत राहतो
जिव कुणाचा भिंतीत
कोण चिनत राहतो?

त्या शहराच्या मध्यभागी 
तो उभा मनोरा कसला?
सांजपारवा माझा
त्याच्या माथ्यावर बसला...दिसला....
(प्रताप)
"रचनापर्व"
20/12/2020
prataprachana.blogspot.com

Thursday, December 17, 2020

गवतफुलांची जुडी...

गवतफुलाची रास
ही निर्जन वाट
नि:शब्द सागर हृदयी
उचंबळून ये लाट

मौनातुन मी देई
तुला आलिंगन आतुर
कवितेला बिलगुन माझ्या
शब्द होती फितुर 

काजव्यांना स्वप्न पडे
कळ्यावर पडे गारूड
अवकाशाच्या उधाण कडेवर
उत्सुक चांदणे हो आरूढ

नजरेची बिलगभाषा 
कटाक्षाचा स्पर्श 
आभास नुसता तुझा
पेरून जातो हर्ष

एक चांदवा आपला
दोघास दुर पाहतो
परस्परांच्या दिशेस दोघे
निःश्वास पोरके वाहतो

तु रमल्या गोकुळी
धुन कसली उचलून घेशी?
मी उधळून देतो अलबत
आर्त सुरांच्या कृष्णराशी

पाताळाच्या खोल तळातुन
हा कसला बहर फुलतो
फांदीच्या काळजावर 
गंध कुणाचा झुलतो?

ही कसली गारूडभाषा
नजरेला तुझ्या फुटते?
राधेची काळीजखुण
बासरीला हलकेच पटते

हसत्या ओठांचा बहर
दोन दवबिंदूचा भास
नितळ..सुंदर तुझा
मृदगंधी सुवास

आभासाचा जागर नुसता
कल्पनेची आतुर घडी
मी उचलून हृदयाशी घेतो
गवतफुलाची जुडी....
(प्रताप)
"रचनापर्व"
17/12/2020
prataprachana.blogspot.com

Tuesday, December 15, 2020

झुळुकीच्या स्पर्शाला...

नसताना तु शिलगे
मनात एक पणती
कशी करावी सांडल्या
प्रकाशकणाची गिणती?

अनोळखी अंधाराला
पाचोळ्याचा भार
नदीच्या अंतःकरणातुन
वाहे सलग सांजरी धार

काळ वश होत नाही
फुटे अंधाराला विलाप
त्वचेच्या रंध्राआड
तुझ्या आभासाचा मिलाफ

रस्ताभर फुलांचा बाजार
वेलीचे काळीज तुटते
निजेला झपाटे जागेपण
रातीस पहाट फुटते

आठवणीच्या हनूवटीवर
कल्पनेचा असर
उघड्या टक्क डोळ्यात
तुच तु धुसर

नक्षत्र उगवतीच्या घटकेला
द्यावी कसली आण?
सागर पडे शांत
ये माळरानास उधाण

तुझ्या आसक्तीचा प्रहर
दिव्याला हवा ओवाळे
मी तुडवत निघतो दिगंती
निसरड्या स्वप्नाचे शेवाळे

तु असताना चांद
जागचा हलत नाही
झुळुकीच्या स्पर्शाला
प्राजक्त भुलत नाही

तु आत दाटला आवेग
तु अपूर्ण राहीले काव्य
कृष्णाच्या बासरीला
पैंजण कुणाचे श्राव्य?

तु तिथे असता रिक्त
मला साद द्यावी
सादेस तुझ्या अनवाणी
माझ्या कवितेने दाद द्यावी....
(प्रताप)
"रचनापर्व"
15/12/2020
prataprachana.blogspot.com














Sunday, December 13, 2020

तळहाताची भुल.....

ओथंबलेले उधाण 
सागर अपार खिन्न
चंद्राच्या काळजावर
भरतीचे ओले चिन्ह 

गवतात विखुरलेले
हे हलके दव मुके
कोणाची साद अन् स्पंदन
कुणाच्या काळजाचे चुके

ही रातसांज केसाची
चेह-यावर हो आभास
कोणाचीच ना चाहूल
तरी बावर बावर श्वास 

तु आल्याचा हृदयप्रहर
अजूनही त्यांचे ठसे
रात उगवे मावळत्या प्रहरी
हे रातीचे असे...!

तुझ्या गंधाचा दरवळ
प्राजक्त फुलण्या विसरे
नजरेच्या समीप माझ्या
तुझे नयन आभासी हसरे

दगडाला फुटते काया
तुझ्या नजरेचा टाक
चंद्र दिला मी ओंजळी
तु रातीस अलबत राख

हृदयाची समिधा वाहून
हा यज्ञ करावा साकार
मी अंधाराला कितीदा
देतो तुझा आकार

मी यावे मनात उमलून
सोडत अलवार गाठी
मी उचलून घ्यावा नि:श्वास 
तुझ्या सुस्का-या पाठी

वहिवाट मिलनाची
प्राचिन हा ठेवा
बेधुंद आळवी धुन
वृंदावनात पावा

तळहाताच्या तळ्यात 
मी धारण करावे फुल
चेह-याला तुझ्या पडावी
माझ्या तळहाताची भुल.....
(प्रताप)
"रचनापर्व"
13/12/2020
prataprachana.blogspot.com

Saturday, December 12, 2020

निद्रानाशाचे फुल...


मनास सांजेच्या पडे
धुक्याची अस्पर्शी भुल
मी उचलून घेई अलगद
निद्रानाशाचे फुल

दोन ढगांचा मिलनबिंदू
तेथून हो पाठलाग
दुर अंधारात दिसे
पेटल्या नंदादिपाची आग

तुझ्या उशिला सुचते
सुस्का-याची गझल
मी चालत जाई शब्दबनातुन
मजल....दरमजल

रित्या क्षणांना कवेत
अंधार हळू घेतो
चंद्र ही मग अधिर
चांदणीचा होवून जातो

दुरदेशी टेकडीला
हवेचा ये इशारा
मी पायथडीला आवरे
झुळुकींचा पसारा

ओल्या गवताला येती
फुलांच्या काळीज हाका
रात पेटल्या वेळी 
चंद्र होई शांत ....मुका

हा दुराव्याचा खंजीर
कोणास हे ओरखडे?
पहाडाचे काळीज हळवे
होई थोडे थोडे

रातीच्या गर्भगुहेतुन
कोणाची साद घुमते?
रातराणीची कळी
झुळुकीच्या ठायी रमते

तु बहर कशाला द्यावे
आठवणीचे सारे?
मी मोजून घेतो अगणित 
रातदाटले तारे....

या हवेला तु गंध
मिलनघडीचा द्यावा
वासरकंठी उत्सुक
मुरलीचा रूजतो धावा...
(प्रताप‍‍‍‍)
"रचनापर्व"
12/12/2020
prataprachana.blogspot.com

 

Thursday, December 10, 2020

धुकेरी ढगांच्या अस्तरी....


 
सावलीचे जमिनीशी
असले कसे नाते?
सुर्याची हुलकावणी
ती दुर जाते, समीप येते

टाकत्या पावलांना
किरणाची लगडे आण
पाऊल वाटा न सरती
त्यास असे ना भान

मी अंधारघडीच्या राती
सावलीस पाहून घ्यावे
जे नसते कोणी आपले
त्याचे होवून जावे

तु दिव्यांच्या काळजाला
कशास वात द्यावी?
मनातल्या सावलीला
अंधारी मात द्यावी

मी सांजघडीचे अस्तर
चांदण्यास वाहून देतो
गाय गळ्याची घंटा
हंबराला वाहून घेतो

चांद सरकत नाही
रात थांबत नाही
प्राक्तन चांदण्याचे
दिर्घ लांबत नाही

तु न आल्याचा सुगावा
चंद्रास कुठुन लागे?
रातराणीच्या फुलात
मग संशयकल्लोळ जागे

मी गंध पेरत नाही
तुझ्या तनुचा कस्तुरी
भाव मनाचे दडती
धुकेरी ढगांच्या अस्तरी

मी सांधून घेतो काळोखाच्या
दडलेल्या रात घडी
तु असते उभी प्रतिक्षारत
बंद जाहल्या नयनथडी

तुझ्या आभासाचे सोने
उगवतीला पसरत असते
मिलनबिलगी सरती रात
अंधार विसरत असते
(प्रताप)
"रचनापर्व"
11/12/2020
prataprachana.blogspot.com











Wednesday, December 9, 2020

बंद डोळ्यांना ग्वाही....


हाताशी आभाळ घेवून
चांदणे गुंफावे
सांजेच्या धुकेरी क्षणांना
स्वप्नास जुंपावे

मिटत्या सावलीचे ठसे
अंधार सजवून घेतो
धरतीचा मावळ कोना
सुर्य रूजवून घेतो

हा कसला नित्य उगवणे
आणी मावळतीचा फेरा
मी नित्य पाहतो अवकाशी 
एक लुकलुकणारा तारा

ही पुरातन ओढ 
ही प्राचीन आस
या कळ्यांना दे!
बहराचा बकुळ भास

या धुक्याच्या अंतःकरणी 
माझ्या हाकेच्या नक्षी
मनाच्या मुक सादेला
तुझे मन बावरे साक्षी

नजरेचे स्पर्श
नजरेला होई बाधा
रातीच्या कृष्ण रंगात
चमकून उठते राधा

तु आर्जवी पुजा
मी मनात मांडलेली
उचलून घे स्पर्शफुले
ओटीत सांडलेली

बोटांना सुचली कविता 
बटावर ती उमले
तुझ्या तनुच्या भूर्जपत्री
शब्दांचे कोमल इमले 

गहिवर तुटवत नाही 
रान भरून येते
तु गेल्यापाठी आठवण
लगेच फिरून येते

तु , तुझा आभास
मी रिक्त नाही 
तुझी जागती नजर
माझ्या बंद डोळ्यांना ग्वाही!!
(प्रताप)
"रचनापर्व"
09/12/2020
prataprachana.blogspot.com

 

Tuesday, December 8, 2020

प्रतिक्षेचा सडा.....

कल्पनेला स्पर्श फुटावा
विचारांना गंध
मनात दरवळत राही
तुझा आभासी सुगंध 

कंठ मनाला फुटावा
नजरेला यावी भाषा
मी होवून जावे तुझ्या 
तळहाताची ठळक रेषा

दाटल्या हंबरवेळी 
आस दाटून यावी
पावलांनी माझ्या तुझ्या
पावलांची गती गाठून घ्यावी

दिर्घ नि:श्वासांना तुझ्या
माझ्या उसाशांची आण
का थरारे फांदिवर एकले
कंच हिरवे हिरवे पान?

अंधाराला उजेडाचे
लागावे काळीज पिसे
दुर अवकाशी अंधूक
कोणती चांदणी हसे?

चांद उगवी उशीरा
समईची वात विझे
कोणाच्या कुशित मिटल्या
कोणाचे स्वप्न निजे?

नितळ स्वच्छ कांती
अंधार झाकत नाही 
लुटुन जाई काफिला
तुझी नजर राखत नाही 

मनाला मनाचा 
अपूर्व ध्यास बिलगे
वा-याची अनवाणी झुळुक 
देह फुलांचा विलगे

रातीला कसले अजाण
पडते गुढ कोडे लाघवी
नजर कुणाची ओली
नजरेस कुणाच्या जागवी?

प्राजक्ताचे बहर क्षण
स्वतःस जाती विसरून
कोणाच्या प्रतिक्षेचा सडा
असतो फुलात पसरून?
(प्रताप)
"रचनापर्व"
08/12/2020
prataprachana.blogspot.com

Saturday, December 5, 2020

ओंजळडोह....

चंद्र कवेला असता
आभाळ सजून जाते
कोणाच्या ओंजळडोहात
चांदणे भिजून जाते?

का उठवून देतेस सांजेला
मिलनघडीची हुल?
उगाच मोहरून जाते
फांदिवरती गोंदणफुल

तु सोनघडीच्या नक्षित
पेरून देतेस रंग
मोहरून जाते नभाचे
चांदणरंगी अंग

रानास होतो भुलवा
झाड मुके होते
एकट रातघडीला
चांदण्याचे धुके होते

मी धुक्याच्या सावलीवर
रेखाटतो शब्दमाला
चंद्र दाटल्या अवकाशावर
ढग घालते घाला

पाखरांची दिशा चुकते
हवा धुंद होते
प्रतिक्षारत दिव्याची
वात मंद होते

तु सोबत नसता इकडे
चंद्र नभात रूसतो
खिडकीच्या तुझ्या तावदानावर
उगा उदास बसतो

जिव काहूरी होतो
चंद्र हलत नाही
बोलावे किती तुज आभासाशी
तो शब्द बोलत नाही 

हर रातीला असा
चाले प्रतिक्षा खेळ 
तुझ्या नजरेच्या डोहात
ओली होते सांजवेळ 

रातसजणीचे पैंजण 
वाटेस प्रश्न पडतो
गोकुळाचा जिव मग
वृंदावनात अडतो...
(प्रताप)
"रचनापर्व"
05/12/2020
prataprachana.blogspot.com


Tuesday, December 1, 2020

चंद्रचाहूली प्रहर....

चंद्रचाहूली प्रहर
ते दुर पसरले धुके
घरट्यातल्या उबेतुन
गीत बहरते मुके

ही पैंजणी भैरवी
हा समर्पणी आलाप
जात्या पाउलवाटेचा
तळ्याकाठास हो मिलाफ

पाण्यात उतरते चांदणे
ही सोनेरी आभा
गंगेच्या काठावर हा
कोण भगिरथ उभा?

रानफुलांना गंध
फुलती कळ्यांचे श्वास 
डोळ्यांचा माझ्या चाले
तुझ्या डोळ्याकडे प्रवास

खुण कसली प्राचिन
नयनात तुझ्या दाटे?
कुठल्या जन्मीचे झाड
कुठल्या जन्मात फाटे

तळव्यात चांद बंदिस्त
मिटल्या पापण्यांना चांदणे
अंधारात चकाकून उठते
तुझ्या तनावरील गोंदणे

हे भारले पाणी
तळ्यास तहान लागे
चांदण्याच्या उजेडात
हे पक्षी का जागे?

हवेला ही कसली
निरोपाची भाषा फुटते?
तुझे आभासी चांदणे
वाण प्रकाशी लुटते

नभीचा चांद देतो
दिव्याला वातीचा संग
रातीच्या अंधारात उमटतो
इंद्रधनुचा रंग

नकोस बोलू काही 
शब्द अधुरे राहू दे
कवितेच्या गवाक्षातुन मला
पुनव तुझी पाहू दे...
(प्रताप)
"रचनापर्व"
01/12/2020
prataprachana.blogspot.com

Sunday, November 29, 2020

शब्दफुलांचा माग....

फुलाच्या ओटीत
गंधाचा अत्तरथेंब साचे
आभाळ दाटते इकडे
तिकडे मोर मनात नाचे

मी वेचत जातो हलकेच
ओठावर थबकते गाणे
तळव्यावर उमटती जर्द
मेहंदीची हिरवी पाने

देवकुळी चांदण्याला
आभास होतो प्रकाशी
तुझ्या रूपाचे चांदणे
ये बहरून अवकाशी 

शब्दखुडीची वेळ 
फुलांचा करते धावा
राधेच्या अंतरआत्म्याला
भारून देतो पावा

कंदिलाच्या काचकाळजावर
हे कुणाचे काळे डाग?
वातीने का धरावा
जळत्या समईचा राग?

खडकाच्या पाझराला
फुटते मुक ओल
रातीस कळते राती
तुझ्या काजळाचे मोल

तुझ्या सावलीच्या हातावर
ही कसली गोंदणनक्षी?
डोळ्यात तुझ्या उतरती
सांजदाटले पक्षी

बोटांच्या पेरांना तुझ्या
स्पर्शाची भाषा फुटते
बहरती रातराणी
दचकून राती उठते

पावलांना अलगद उचल
कवितेला येईल जाग
तु काढत येशील अलवार मग
माझ्या शब्दफुलांचा माग

भारून जाईल तुझ्या
समग्र अस्तित्वाची रेषा
उमटेल तुझ्या ओठी मग
माझ्या कवितेची खोलभाषा.....
(प्रताप)
"रचनापर्व"
29/11/2020
prataprachana.blogspot.com

Saturday, November 28, 2020

राधेचा आर्जवी प्रहर.....

मनास हितगुज करती
तुझ्या आठवांचे भावभोळे
वाहत्या नदी काठावर
मी सोडून आलो डोळे 

चिंब वाटेने वाहे नदी
डोळ्यात किनारा दाटे
अर्पण केल्या फुलांचे
मी चुंबून घेतो काटे

प्रार्थनेतील आळवणी
का नभी निनादत फिरते?
रात दाटल्या कोनाड्यात
समई उगाच झुरते

अपु-या पुनवेचा चांद
नभात खुलून हसतो
चांदण्याच्या झुडुपात
पदर कुणाचा फसतो

चंद्र कशाला झाकु?
तळव्यात त्याची कांती
क्रमाने जळती दिप
वातीस बिलगते शांती

रात दाटून येता पेटती 
'शकुनफुलांचे दिवे'
तुझ्या कुशीत उधळती
सोनकांती चांदणथवे

पदराला येवो तुझ्या
माझ्या आठवणीचा गंध
पेटून याव्यात दिशा
वात होता अलगद मंद

तुझ्या घराच्या खिडकीला
फुटावे आठवणीचे गाणे
वा-याच्या आभासात मोहरावी
रातराणीची पाने

मोहरल्या रातराणीला 
गंधाची पडावी भुल
तुझ्या मनाच्या कळीचे
मी राखे ओंजळीत फुल...

तुझ्या बहराला लगडावेत
माझ्या मोसमांचे बहर
मी उचलून घ्यावा कुशीला
तुझ्या राधेचा आर्जवी प्रहर.....
(प्रताप)
"रचनापर्व"
28/11/2020
prataprachana.blogspot.com 
(शकुनफुलांचे दिवे- आदरणीय ग्रेस सरांची अमिट कल्पना...साभार# संदर्भ #सांध्यपर्वातील वैष्णवी)

Tuesday, November 24, 2020

आठवणीचे तळे..

समर्पणाची दृष्टांतकथा
आदिम पिढ्यातुन वाहे
मृगजळाच्या छायेतुन
नजर कुणाची पाहे?

सांजधुलीची वलये
किरणाची लगबग वाढे
सांजेला दे संधिप्रकाश
दिर्घ आलिंगन गाढे

पानांना गहिवर दाटे
फुल सजून जाते
यशोधरेची छाया अनवाणी 
अंगणी रूजून जाते

बेटांना सागराने
अपार वेढून घ्यावे
लाटांचे सांडबहर शुभ्र
ओंजळीत झाडून घ्यावे

औदुंबर उन्हात निजतो
बिजास हृदय फुटते
पाखरांच्या पंखाची
आस झेपावी फिटते

हंस लाघवी फिरतो
शोधीत मोती चारा
तथागताच्या मुद्रेचा
मंद वाहतो वारा

मी बकुळफुलांची समई
स्पर्शाने पेटवून देतो
विरहाच्या अंधाराचे
पंख मिटवून घेतो

तृष्णचातक उभा
उधाणल्या सागरा काठी
अस्पर्शी लाटांचे शुष्क
तुषार बिलगती ओठी

ही तुष्णा की तृप्ती?
सांजेस ना कळे
भरून वाहे रानी
आठवणीचे तळे...
(प्रताप)
"रचनापर्व"
23/11/2020
prataprachana.blogspot.com

Sunday, November 22, 2020

दिवोत्सवास ग्वाही.......

पुर्वसंचिताचे हाकारे
नभाचे संध्यादान
सुर्यास ये अलवार
दाटत्या रातीचे भान

सांज मागे संधिप्रकाशास
प्रकाशाचा जोगवा
पेटत्या पणतीआड दडे
अंधार बुजरा नागवा

ही कसली हैराणी
कशाला अलिंगन आंधळे?
श्वासांच्या बावर स्पर्शी
दुःख हो अनामिक पांगळे

झेलून घेत्या हाकेला
पाखरपंखी ओझे
मनात कसली लगबग
धुन कसली वाजे?

मौनातुन अंधार झरतो
शब्दाला पाझर फुटतो
कवितेचा काफिला नित्य
भरल्या सांजेस निघण्या उठतो

शब्दांची झडती घेत
मन भिरभिर चाले रानी
मातीत उगवून हिरवी
येतात टप्पोर गाणी

धुक्याला उमजते
थंडीची चाहुल ओवी
मनाचा कळस
पायरीकडे धावी

सांज वाहून जाताना
प्रकाश सांडून जाते
पेटल्या दिव्याच्या उजेडी
रातीस भांडून जाते

सावलीच्या आडून
तु अंधार का लपवला?
उतर तो चांदणखडा
ज्याने काळीज परिघ दिपवला

दिव्याचा सोस
तसा खास मला नाही
तुझ्या दिवोत्सवास दिलीय
माझ्या वातीची ग्वाही...
(प्रताप)
"रचनापर्व"
22/11/2020
prataprachana.blogspot.com




Friday, October 30, 2020

गोंदणाचे ठसे...


ही चांदणगंधी सांज
वारा काहूरी वाहे
वेलीच्या पानाआडून
चंद्र कुणाला पाहे?

वाळुच्या मनावर
ही कसली उमटे नक्षी?
कुठे नित्य जाती
हे ओढ दाटले पक्षी

थिरकत्या हवेला
ही कसली येते धुंद
चांद उगवत्यावेळी
दिवे शिलगती मंद

सांजेच्या अंतःकरणी
चांदण्याची सावली पडे
रातीच्या तळ्यावर
रिते आठवणींचे घडे

दिव्याला हवेची
कसली मिळते हुल
धुक्यास पडून जाते
चांदणरंगी भुल

चांद झिरपता होतो
प्रकाश मंद चकाकी
नितळ तमाच्या आडही
का नयनास ये लकाकी?

दुरदेशी हाकेला
हंबरडा फुटून येतो
खिडकीचा कापरा कोना
उगाच दाटून येतो

तगमगीच्या घटीका
चंद्र मुका होतो
भिजल्या बावर मनाचा
उंच झोका होतो

तळव्यात विसावला चंद्र
डोळ्यात आभाळ भासे
चांदण्याच्या तनावर
गोंदणाचे ठसे.....
○‍‍pr@t@p○
"रचनापर्व"
☆prataprachana.blogspot.com☆
《30 ऑक्टो 2020》









Monday, October 26, 2020

हुरहुरीचा गंध.....


ढगांच्या किनारी
                                   नक्षत्रांची दाटी
                                   धुके साचते अनवट
                                   थिजल्या नदी काठी

                                   रेतीत उमटती पाऊले
                                   चकाकती शिंपले
                                   गोंदणाच्या काळजावर
                                   गीत कुणाचे लिंपले?

                                    झाडाच्या सावलीला
                                    रातीची पडते भुल
                                    ओंजळ भरून वाहे
                                     गंध दाटले फुल

                                    दारातील तुळशीला
                                    मुरलीची होई बाधा
                                    सुर वाहती झुळुक
                                    बावर होई राधा

                                   थंडी पसरते रानी
                                   धुनी कसली आत पेटते?
                                   बहराच्या नक्षीने
                                   बकुळाची फांदी नटते

                                   डोळ्यांच्या आसाला
                                   हा चंद्र कशाला लगडे?
                                   मी झाकुन घेतो हृदय
                                   दुःख पडते उघडे

                                   चांदण्याच्या प्रकाशात
                                   राजहंस सिध्दार्थ शोधी
                                   विसरण्या देवदत्ती बाणाची
                                   दुखरी एक व्याधी

                                   रानफुलाचे मस्तक
                                   धरतीला अलगद मिळते
                                   रूदन तयाचे मुके
                                   अवनीच्या हृदया कळते

                                   धुक्याच्या आडून
                                   ही चाहूल कसली लागे?
                                   गाव झोपल्या प्रहरी
                                   ते कुठले दिप जागे?

                                   इकडे अंधार पेटता होई
                                   तिकडे प्रकाश असे मंद
                                   चांदण्याला येतो मग 
                                   अनामिक हुरहुरीचा गंध...
‍‌                                                                                                                           pr@t@p
                                 "रचनापर्व"
                   ☆prataprachana.blogspot.com☆
                              《26 ऑक्टो 2020》





















                                                                                

Sunday, September 27, 2020

चंद्राचेही भान.......

तरारल्या गवताची हवा
हिरवे शेत उफाणलेले
तरल सांजेच्या चाहुलीने
निरंजन तुफानलेले

बहराचा अंधूक प्रकाश
खिडकीत झिरपते ढग
हुरहुरीच्या काहूर लहरी
वातीस हो तगमग

उगवत्या चांदण्याचा
जिव होतो गोळा
कवडशाच्या इशा-याला
चंद्र रमतो भावभोळा

आठवते का वाट?
घाटातुन जाती खोल
अंधाराला कसले
सांजेचे आले मोल

थरथरणा-या वातीवर
झुळुकीचे असता पहारे
अंधाराच्या रोमावर
उमटती चांदणशैली शहारे

चंद्राशी कसला तंटा
चांदण्याचा कसला दावा
फुलण्याचा गर्भसोस
कळ्यांनाच असतो ठावा

हे आभाळ, हे चांदणे
हा चांदणरंगी पसारा
रात पसरते रानावर
आठवणीचा पिसारा

मोर नाचतो रानी
चांदण्याच्या प्रकाशसरी
दिवा टाकतो नि:श्वास
अंधारसाचल्या घरी

दिव्यासाठी वातीचे तु
सौदे रोज केले
मी अंधाराच्या आभाळाला
दान चांदणी दिले

असुदे! ठेव ! चांदण्याचे
हे आसमानी दान
खिडकीबाहेर चकाकणा-या
चंद्राचेही भान!
 Pr@t@p
" रचनापर्व "
27/09/2020
BLOG#prataprachana.blogspot.com












Thursday, September 24, 2020

सांजफुल.....

शिगाभर चांदणे
चंद्रउगवता वारा
झाड दडवे फांदीत
फुलांचा कोंडमारा

चांदण्याचे कळप
चंद्राची दिशाभुल
झाकुन घे सये!
पदरातील सांजफुल

लेण्यांच्या काळजाचाही
टाकावर जिव जडतो
पहाडाच्या अंतःकरणी मग
घावाचा पाऊस पडतो

स्वप्नांच्या अगम्यतेचे
दगडावर बसती घाव
पहाड तोलून धरतो
लेण्यांचे आर्त भाव

फुलपसा-याचे गुपित
चांदण्यास गोकुळधुंद
कृष्णाच्या बासरकथेत
राधेचे डोळे बंद

मी झाड एकले पाही
फुलांची ओघळ धारा
या निर्गंध सायंकाळी
का उगा बावरे वारा?

मी दिव्याचे उगवणे
खिडकीत तुझ्या पाहतो
उधाण वाराही उगाच
त्या दिशेस का वाहतो?

ओंजळ कर! दिवा जप!
वातीला होईल बाधा
मथुरेस निघत्या पावलावर
मुर्छित होईल राधा

बहर साठवून ठेव
हंगामही झालेत फितुर
कातर झाल्या सायंकाळी
जिव कशास आतुर?

जपून ठेव पेरण्या
हे आठवणींचे मोती
येता हंगामात बहर
जागवेल मग माती
Pr@t@p
" रचनापर्व "
24/09/2020
BLOG#prataprachana.blogspot.com









Monday, September 21, 2020

रूतून बसती तारे.......


शिलाखंडास रिझवती
मुर्त्यांचे शृंगार दगडी
शिशिराच्या चाहुलीत
हा बहर कसला बेगडी?

सांजेचे साऊल महल
हा ढगांचा पसारा
फुलातुन शिल्लक पडतो
सुगंधाचा घसारा

डोळ्यासमोर नटते
तमाची चंदेरी जाळी
परतती पाखरे देती
आर्जवी पंखाची टाळी

कसे करावे काहूर
झरल्या शब्दात बध्द?
रूजवून घ्यावा मनात
आम्रपाली नाकारता बुध्द

शिंपत्या श्वासाची
ही लगबग कसली चाले?
काढून घ्यावेत अलगद
हृदयात घुसले भाले

चकाकत्या विजेचे तंतू
पावसाच्या थेंबावर रेघा
पडता पाऊस बुजवी
माळास पडल्या भेगा

फुलांची शिळ ओली
ढगाला ये सुवास
एकट संध्या समयी चाले
ओल्या आठवणींचा प्रवास

माळरानाच्या काळजावर
काढावा कालवा खोल
गवताला जाणवू द्यावे
ओल्या थेंबाचे मोल

सारे हिरवे ओले
अंधारही ठार ओला
एकांताच्या काजळक्षणी
चांदण्या घालती घाला

लपत नाही काही
उजळून येते सारे
पडून गेल्या पावसात
रूतूून बसती तारे.....
Pr@t@p
" रचनापर्व "
21/09/2020
BLOG#prataprachana.blogspot.com




 

Sunday, September 20, 2020

वाट मुक्याने वाचते.......


                                                         नयनी रोखू नकोस पाणी,वाहते पाणी निर्झर
                                                         ही कसली ओल साचते, कुठे कुणाच्या घरभर?

                                                         हे निशीगंधाचे सडे,आकाशी माणिकखडे
                                                         रात तरीही कसली,काळीकभिन्न चढे?

                                                         उधार घेतला चंद्र,कलेकलेने परत यावा
                                                         सांजेच्या काळजातला,अंधार सरत जावा

                                                        ती उतरंड कशाची रचली,तो संदूक मुक का बसला
                                                        मेहंदिचा कोना हिरवा,नक्षितुन उदास हसला

                                                         आठवते का झाड?,पक्षांचा होता डेरा
                                                         निष्पर्ण फांद्या भोगती, आता थंड बोचरा वारा

                                                         उदास बहर झाला,पक्षी उडून गेले
                                                         त्या झाडाखाली काल, पंख रडून गेले

                                                         त्या अश्रुंच्या ठशाला,मी ओळख कशास द्यावी?
                                                        शिशिराच्या सांजपारी, जणू पावश्याने गाणी गावी

                                                        तुझ्या आठवांचे डोंगर,अंधूक होतात म्हणून
                                                        तु दिवे कशाला चिणावे?, कडे कपारे खणून

                                                         आता माळ आवडत नाही, तेेेथे गाई जमत नाहीत
                                                         बासरीचे सुरही आता, यमूनेशी रमत नाहीत

                                                          पाण्याची घागर बुडबुड, वाहत जाते धारा
                                                          सांज होण्या अगोदरच,का उगवे हा सांयतारा...?

                                                           कोण बावरे उभे, ही देते कोण हाक?
                                                           वा-याची झुळुकीला, का सुगंधाचा वाटे धाक?

                                                           मी पाठमोरा उभा, सुर्य बुडत असतो
                                                          मनाचा चकोर माझ्या, चंद्रदिशी उडत असतो

                                                          आल्या वाटेला,परतीची दिशा जाचते
                                                          चांदण्याच्या शब्दाची कविता, वाट मुक्याने वाचते....
                                                                           Pr@t@p
                                                                           " रचनापर्व "
                                                                           20/09/2020
                                                            BLOG#prataprachana.blogspot.com








Friday, September 18, 2020

फितुर झाल्या चकोराची.......

              स्थिरावले जरी मन तरी बोच आहे
               तुला जो बोचतो,विषयही तोच आहे

               तासावे किती , मरणासन्न लाकडाला
               दिसे गुळगुळीत तरी, त्यास खोच आहे

               चांदण्यास लगडती, पोर्णीमेचे अंधार
               चंद्रास अंधाराचा, असा जाच आहे

               मारावेत दगड, घरावर कशाला
               तुझ्याही घराला, हाच काच आहे

               ही दुनिया लपवते , शब्दांचे सुरे
               मारणारा खंजर, हातही तोच आहे

               द्यावेत कशाला दिलासे,उगाच खोटेनाटे
               तुझ्या शब्दांचा सुरा, काळीजही हेच आहे

               तोडल्या बंधनाने,तुला मुक्त वाटे
               तरीही आठवांची शृंखला , तुला जाच आहे

               दिलेले बहर,तु तुडवावे पायदळी
               दिर्घ पानगळीची आता, तुला बोच आहे

               थरथराट कसले, मोरांच्या पिसा-याला
               हा कसला बेमोसमी, त्याचा नाच आहे?

               तु पाठव तुझ्या हत्या-या ,आठवणींचे पायदळ
               मी ही रोवली भक्कम, आता टाच आहे.

               तु नसलीस जरी तीच , तुझेच रूप पालटलेले
               ती नवलाई त्यागणारा , हा ही मीच आहे !

               आता उगवत नाही चंद्र, खिडकीत उदासल्या तुझ्या
               जो टांगला होता कधी, नभी खुलला तोच आहे!

                उधळून पुनवनक्षी, तरीही तो निस्तेज
                फितुर झाल्या चकोराची, त्यास बोच आहे!

                #पुन्हा एक अनावृत गझल

                   Pr@t@p 
                  " रचनापर्व "
                 18/09/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
                  

Thursday, September 17, 2020

आठवणींचे समर...........

या लाटा होवून आर्त
किना-याचे गीत गाती
दर्याच्या अंतःकरणातुन
उचलावा एक मोती

झाडाच्या सालीचे थर
दरसाली विलग होती
त्या झाडाखालून गेली
पायवाट सलग होती

शुष्क झाल्या गवताने
झाकुन गेल्या वाटा
अंधूक झाल्या पाउलखुणा
पुसुन टाकती लाटा

फुलल्या प्राजक्ताचे तुझ्या
दारात झाड वाढे
झडल्या फुलांना तु
हळुवार उचल वेडे!

फुलांनाही असते हृदय
वरून अलगद पडलेले
सडा फुलांचा धराशयी
जणू झाड रडलेले

तिकडे लाटा,इकडे बहर
दोन्ही निघून जाती
ओसाड एकल्या रानी
उडत असते माती

सागर ओकाबोका
झाडांना ये आहोटी
कोण हा भटका बांधी
उडत्या मातीत राहुटी?

पडल्या अंधाराला मुका
एक टाहो फुटेल
झडन्या उत्सुक फुलांचे
काळीज पुन्हा तुटेल

दर हंगामास फुले येतील
गंध असतोच मुळी अमर
तुला झेलावे लागते मग
सुगंधी आठवणीचे समर
○ Pr@t@p ○
" रचनापर्व "
17/09/2020
BLOG#prataprachana.blogspot.com







                                                                         

Monday, September 14, 2020

सुगंध त्यांचा उरतो......

सांजेच्या शिलालेखातुन
हे गाण्याचे कसले सुर
चांदण्यास उगवण्या वेळ
कसला उजळे नुर

मी चंद्रदिव्याची काच
पुसुन सजवून ठेवी
बासरी हलकेच गाई
अश्रुत भिजवून ओवी

महामुनीच्या हस्तरेषा
शांती पेरत निघती
ही पाखरे उडताना
दुर कुठे बघती?

सांज देखणी उभी
सुर्याचे झरते रूप
संथ नदीच्या प्रवाहाखाली
हो मातीची धुप

धुके उगवून येते
जसे हंगाम हिरवा सजने
चटका लावून जाते
रविकिरणाचे विझने

मी धुक्याच्या काळजावर
शब्दांची पेरतो माया
देवळाच्या गाभा-याचा
भाराऊन जातो पाया

उडत्या पाखरांच्या पंखावर
झडत्या प्रकाशाचे कण
मी उचलून घेतो ओंजळीत
सांज दाटले बन

हलकेच कसली चाहूल
मनात माझ्या दाटे
फुल खुडत्या हाताला
चुंबून घेती काटे

मी फुलांच्या झडीचे
मोसम दुरून बघतो
मी उचलून घेण्या फुलांना
जिव त्यांचा तगमगतो

मी सोडून देतो आत्मे
कळ्यांना मुक्त करतो
रात दाटल्या सांजेत
सुगंध त्यांचा उरतो...
Pr@t@p
" रचनापर्व "
44/09/2020
BLOG#prataprachana.blogspot.com



राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...