Sunday, June 26, 2022

अवकाशाला मोल

चंद्र प्रवेशता तु
माझ्या निळ्या अवकाशी
नक्षत्री उमलून येती
तुझ्या समग्र चंद्रराशी

तुझ्या तारकांचे समूह
नक्षत्र माझे हसरे
तु प्रदिर्घ निळे चांदणे
अवकाशी माझ्या पसरे

कधी पेरते हिरवे सारे
तु असता पुर्ववसू
मी घेतो उचलून तारे
आणी राशीचे हसू

काय शुभ,काय अशूभ
ता-यांच्या अवकाश राशी
मी तुझे चांदणे राखतो
हृदयाच्या तळापाशी

तु रेखले नक्षत्र सगळे
अवकाश सारा खुलतो
चंद्र मनीचा माझ्या
तारकांशी मुक बोलतो

घे व्यापून सारे सगळे
तुझ्या हळव्या कुशीला
मी नित्य नक्षत्र ठेवतो
तुझ्या व्याकुळ उशीला

उलगड तु ठेवण
चांदण्याशी आर्त बोल
तुझे नक्षत्र देखणे देई
रित्या अवकाशाला मोल....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२७ जून २०२२

दुराव्याने वागत नाही

आठवे धुसर चेहरा
तरीही खुण तुझी पटते
ते दुरचे शहर अनोळखी
आता आपलेसे वाटते

शब्दांची झाली भेट
डोळ्यांनी टिपले भाव
घेई दुरवरचे चांदणे
बैरागी मनाचा ठाव

गर्दीत गुंतले होते
अज्ञात आपले कोणी
विस्तृत महावृक्षाखाली
झाडाच्या पानोपानी

हिरवाईच्या अंतरी
सजली होती दरवळ
गंध सुगंध पेरती
शामल झाली हिरवळ

ते शब्द कोणते होते
जे मनात रुतुन बसले
अज्ञात आपण दोघेही
नशिब हळुच हसले

निघून गेल्यावेळी
सांज राहिली मागे
शब्दबनातुन जुळले
भावबंधी दृढ धागे

पानगळीच्या पानातुन
वारा फिरत होता
हिरव्या चैत्रासाठी का
तो सांजसमयी झुरत होता?

गेली वेळ, गेलो आपण
मागे राहिले शब्द
दोघांच्याही तळव्यावर
चितारण्या नवप्रारब्ध

फिरू शब्दबनातुन
देवू शब्दांची आण
माझ्या अवकाशाला तुझ्या
चांदण्याचे पंचप्राण...

जाणतो चांदणे हाताला
सहजी लागत नाही
तरी आर्त जिवातले चांदणेही
दुराव्याने वागत नाही....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२७ जून २०२२






Saturday, June 25, 2022

फुलखुणांचे माग

रातीच्या घनगर्दीतले
चांदणे हळुवार सरले
प्रतिक्षारत वाटेवरती
मन भिरभिर फिरले

सांडल्या फुलांचे
अविनाशी गंध रिते
मी शब्दात सोसतो आहे
तु पाठवलेली गीते

गीत तुझे बिलगते
शब्दास मौन बाधते
ही कसली काळीजवेळ
सय तुझी साधते

मी परत निघतो ठेवत
फुलखुणांचे कोमल माग
खिडकीत पक्षी गातो
येईल तुला का जाग?

येवू दे परतून मजकडे
मी तुला दिलेली हाक
त्या हाकेस यावी आर्त
तुझ्या प्रतिहाकेची झाक

थरारूदे बन मनाचे
येवू दे आभास धारा
ओळख कुणाचे स्पर्श
घेवून वाहतो वारा?

दुर अंतरावरूनी
सांधून घे दुरावा
भाव उदास विरहाचा
अलगद दुर सरावा....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६ जून २०२२








Friday, June 24, 2022

अव्यक्त



अव्यक्त असु दे मन
तुला समजते भाषा
तुझ्या ओंजळी राहते
माझ्या बहराची आशा....


(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५ जून २०२२


चांदणसय

कसे रहावे मुक
चांदणे असता नभी
ही सय कुठली हसरी
हृदयात दृढ उभी?

व्यापते सारे सारे
चंदेरी त्याची आभा
तुझे चांदणे आभासी
धारण्याची ना मुभा

मी बसतो छायेखाली
ते बरसते मंद
आस दाटल्या नयनी
ते हलके..अलवार..बंद

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५ जून २०२२


चांदण्यावाटे..

एकांत बोलका होई
मुक बनता वारा
शब्द वाहतो मंद
मनातल्या चिंबधारा

चंद्र उतरतो हलके
आर्त तळ्याच्या वरती
शांत तळ्याच्या अंतरी
ही कसली भावभरती?

व्याकुळ तमाच्या हृदयी
थवा विसावे शांत
चांदण्याच्या छायेखाली
मुक सरे आकांत

मन होते संयतभारी
तुझी आठवण दाटे
गीत तुझे सुचावे
धुंद चांदण्यावाटे...

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४ जून २०२२











चंद्रतळ....

चल! गाठू चंद्रतळ
बिंब मनाचे पाहू!
भिन्न असूनही दोघे
एक अवकाशाचे होवू!

गाठू सय मनाची
बोलू एक न शब्द
देवू तमास बिलोरी
चांदण्याचे प्रारब्ध!!

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४ जून २०२२



आभाळमाया

खिडकीतला तुझ्या चंद्र
सुक्त कोणते रचतो?
शब्द चांदणधुनीचा
आभाळाला सुचतो

दे! शब्द ओंजळीला
गीत तुझे रचू दे
तुझ्या चांदण्याला
आभाळमाया सुचू दे....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४ जून २०२२




Thursday, June 23, 2022

आत्म्यापार....

हसताहेत जखमा
तुझ्या क्रुसास भेटून
तुझ्या वेदनेचा अपार...
शरीरा पार..आत्म्यापार....

(Nobody)
@nothing






भावमुक्त.....

तपासतो आहे
मी शब्दांचे आत्मे
न उगवल्या चांदण्याखाली
करतो आहे त्यांची
तपशिलवार वर्गवारी
शाकारतो आहे त्यांचे
अंतरंग विस्कटलेले...

त्यातील...
आवेगी,भावगर्भी,उत्सुक,
अलवार,स्नेही,आर्त
आणी हळव्या शब्दांना
मी ठेवतो आहे बाजूस
ओंजळ असो वा नसो
असावेत ते गाठीला
म्हणून....

आणी घेतो आहे तपशील
घसरल्या,टोचल्या,दुरावल्या,
दुख-या, विसंगत आणी
असंगत शब्दांचे नव्याने...

या निर्वाताच्या झाडाखाली
माझ्या कवितेचे कलेवर
मुक्त होत आहे
त्यांचे सनातन दुःख
कधीच विजनवासात गेलंय..

मी निःशब्द होवून
निघालो आहे तमाकडे
फिक्या शब्दांना आत्मा
मिळवण्याच्या मनसुब्याने

आणी एक दरवेशी धुके
विसर्जित करते आहे
माझ्या कवितेचे साऊलबन
हळुवार..

या झाडाखाली आता
शब्द रूजतील ही शक्यता
कधीचीच आहिल्या होऊन
निपचित पडलीय

आणी तीस पाउल लागुन
ती सजीव होईल म्हणून
मी प्रार्थनाही करत नाही...

माझं शब्दवैराग्य
आता मुक्तीपथावरून
निघालं आहे
कवितेस भावमुक्त
करत धिराने.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३ जून २०२२











मुकहाकांचे गोंदणे....

मी हाक हवेला देतो
ती येऊन तुला भेटे
प्रतिध्वनी हा दरीतला
तुझ्यात मुक दाटे

किती पुसाव्या खुणा?
गोंदण मिटत नाही
जिव फुलांचा फांदीवर
तुटता तुटत नाही

विस्मरणातले ते चांदणे
अनाहूत उगवून येते
आठवणीचे नक्षत्र
मनात जागवून जाते

मी अवकाशाच्या पार
शोधत तुला निघतो
दुर दिवा जळता
अंधारास व्याकुळ बघतो

वाटते तुलाही बहुधा
चंद्रउजेडी द्यावी साद
नयनात तुझ्याही दाटतो
आर्त वेणू नाद

मुक जरी हाक तुझी
परतून मला भेटते
प्रतिहाक होऊन मलाही
मग तीस बिलगावे वाटते

हे हाकांचे कळप
तुझे निघनिश्चयी पाऊल
त्यांच्या मनसुब्याची
लागता लागत नाही चाहूल

तरी प्रतिक्षा चाले
हे मिलनगारूडी चांदणे
हृदयात चकाकून उठते
तुझे मुकहाकांचे गोंदणे...

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२२ जून २०२२










कळवावे..

अनादी काळापासून
माझे शब्द वाहतायत
तुझ्या आठवणींचे क्रुस..
कवितेच्या खांद्यावर

मी माझे भाव घेवून
निघालो आहे त्या
खुल्या जागेकडे ...जेथे....
अश्रू भिजवतात माती

मीही तुझ्या खिळ्यांना
भेटतो नित्य कडाडून
कारण माझ्या कवितेला
करायचंय 'पुनरुत्थान'...

घाव तसे भरतात
कधी भरत नाहीत
पण क्रुस तपासतो नित्य
शब्दांचे काळीज सखोल

मी मुक्त होत नाही
शब्दात भाव फसतो
आणी काळजातला क्रूस
कवितेतुन मंद हसतो....

का वाटते तुला?
असे क्रुसी खिळवावे.
किती होतात वेदना
कधी तुलाही... कळवावे...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२० जून २०२२














Monday, June 20, 2022

गंधीत सुगंधीत माती...

झेलून सारा पाऊस
झाडास का शहारे?
एकांतावर माझ्या
आठवांचे तुझ्या पहारे

बिंब उमटते तळी
झाड निरखते छाया
भिजपावसात मोहरे
फुलांची नाजूक काया

ओला गंध पसरे
आसमंत हो अत्तर
सांजेच्या आर्त हाकेला
पक्षांचे गीत उत्तर

अशा हळव्या वेळी
भाषा गीतांची कळते
अवकाशाला दुरवर
धरती अलगद मिळते

मिलनाभास नुसता
अवकाश आणी धरती
मिलनबिंदू या दोहोचा
पक्षी शोधत फिरती

असूनही दोघे दुर
होई मिलाफ आभासी
मी शब्द पेरण्या देतो
झेपावल्या पक्षापाशी

शब्द दिगंती रूजती
पाऊस त्यांचा पडतो
रंग फुलावर आर्त
शब्दांचा मग जडतो

या शब्दफुलांचे सडे
नेमाने धरती झेली
गंधीत सुगंधीत माती
शब्द दाटकी ओली....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२० जून २०२२








हुरूपाचे ढग

तुझ्या स्वप्नमृगा मागे
मन माझे धावते
तु नयनातुन जेव्हा
वाटेवर दिप लावते

गाव तुझे मंतरलेले
खुणावते सा-या वाटा
मी थवा रोखुन धरतो
पावलातला छोटा

तु असता मग्न गावी
स्वप्न मागती ठाव
मी मनात जोजवून घेतो
तुझा आभासाचा भाव

असतील आले पक्षी
निरोप तुला ना मिळे
नयनात तुझ्या भिजते
माझ्या मनाचे तळे

फुलता गुलाब भिजतो
थेंबाथेंबाने ओल पाझरे
ढगात माझ्या होती
तुझे पाऊसगाणे साजरे

मी धाडून देतो पाऊस
थॆंब मनाचे व्याकुळ
तु चिंब भिजल्या रानी
मांड बासरीतले गोकुळ....

हृदयात येवू दे ओल
ढगास सार्थक वाटेल
कंच तुला भिजवण्या
ढग हुरूपून पुन्हा दाटेल....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९ जून २०२२

घट्ट विण

कुठल्या मठात
कुठला जोगी?
दुःख कुणाचे
अजाण भोगी

उभा एकला
मुक पार
मनात त्याच्या
कारूण्य फार

गातो गीत
लिहतो ओवी
मन तयाचे
निसंग धावी

नाद तयाला
तुझा बिलगतो
मठ तयाचा
त्यास विलगतो

तुझ्या दिशेला
त्याचे निघणे
अंतरी तुला
शोधून बघणे

तो होतो असा
तुझ्यात लीन
तु ही जप
घट्ट विण....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९ जून २०२२


जाता जात नाही

झाडावर नित्य
भावपक्षी येवून
बहरगीत गायचा
झाडास हंबर येवून
ते बहर द्यायचं रंगीत..

तो रंगीत बहर पाहून
भावपक्षी पुन्हा हळवं
गीत गायचा
आणी झाड बहर
ओसंडून वहायचं...

कोण जाणे कशाने
पक्षाने झाड त्यागलं...
बहर वगळून झाडही
शब्दाला मूक जागलं

आता बहर नसतो तिथे
पक्षीही येत नाही
हा कोण मुसाफिर
झाडाखालून
जाता जात नाही.....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१८ जून २०२२




Thursday, June 16, 2022

पाऊस ओला..

नभ परतून आले रिते 
पाऊस राहिला दुर
नयनी तुझ्या ओथंब
मनास माझ्या पुर

तु वाहते अगाध माझ्या
अंतरी ऊरात खोल
मी उचलून अलगद टिपतो 
तुझ्या थेंबाचे ओले बोल

हे काय हृदयी वाहते?
रिपरिप तुझे गाणे
ते ही स्पंदत राहते
तुझ्या मंद सुराने

पाऊस तुझा असा
सारे कंच भिजते
हे बिज तुझ्या आसेचे
मनात माझ्या रूजते

या हिरव्या रानावरती
तुझाच पाऊस झरतो
हृदयाच्या कोन्यामधूनी
ढग तुझा बघ उरतो 

मन उधाण माझे होई
तुझे दाटले ढग
मी शोषून धरेची घेतो
भावविभोर ओली धग

मी व्हावा पाऊस ओला
तुझ्या तनावर पडणारा
मी भाव अनामिक व्हावा
श्वासात तुझ्या बुडणारा....
(Pr@t@p) 
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७ जून २०२२

Tuesday, June 14, 2022

सार्थक....

शब्दांचे जिव हळवे
त्यास तुझा भास
मी ही राखतो त्यांचे
अन्वयार्थ खास

त्यांचे सरीसम येणे
अज्ञातात भाव भिजले
हे ओथंब गहिवराचे
नभात माझ्या रूजले

कोसळ त्यांचे सुगंधी
हिरवे होई बन
थेंबास व्याकुळ आर्त
मातीचे ओले मन

पाऊस असा शब्दांचा
घर तुझे की ओले
मातीस बिलगुन थेंबाचे
कोसळणे सार्थक झाले....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५ जून २०२२



गीत तुझे मिठीला...

मी पाहतो तोच चंद्र
तु ही बहुधा पाहते
मग ही कसली चंद्रधुन
आपल्या अंतरी वाहते?

या बावर सांजवेळी
मी धुके तुझ्यावर पसरे
तु पेरते नभात माझ्या
चांदणे तुझ्यातील हसरे

हसत्या चांदण्याच्या
डोळ्यात कसले पाणी?
माझी कविता गाते
तुझ्या मनातील गाणी

गाण्यास तुझ्या बिलगती
शब्द माझे अनावर सारे
तुझ्या मनातही असते
धुंद बोलके वारे

वारा होतो भाव
दोघेही मुक जळतो
तुझ्या दिव्याचा प्रकाश
वातीस माझ्या कळतो

दिवा ,वात,जळणे यावर
दोघेही बोलत नाही
प्रकाशाचे मुळ आपल्या
दोघेही खोलत नाही

दिसती प्रकाश वाटा
अंधार सरतो मागे
तु निजता तुझ्या घरा
माझे शब्द राहती जागे

जाग्या शब्दांची माझ्या
पहाटे भुपाळी होते
गीत तुझे मिठीला
येथे सकाळी येते....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५ जून २०२२




Monday, June 13, 2022

जिव चांदणे होतो...

उमजत नाही कसले
गतजन्माचे हे धागे
दोघेही अलगद भेटलो
पुनवेच्या चंद्रामागे

चांद लकाकी नेसे
तुझे काजळी नेत्र
हृदयास बिलगुन गेले
तुझे व्याकुळ मैत्र

अबिरतम सरतो
तुझ्या पाऊल वाटी
मी टाकता चांदणबण
तुझ्या आसुस ओटी

पदराने झाकले तु
हे जगण्याचे चांदणे
तुझ्या तनावर सजते
प्रकाशकिरणी गोंदणे

मी भाव अधिर राखतो
शब्दांना आवरून घेतो
झरत्या अरण्यवेळी
तुझे गीत सावरून घेतो

मी मला वाहवत नेतो
शांत मंद धिराने
रान भान जागते
तुझ्या मिलन सुराने

गीत आपले प्राचिन जंगल
अनंतापासून फुललेले
विसाव्यास पक्षी येती
चुकलेले..भुललेले..

गाऊ गाणे पुनवेचे
अर्णवाची घेवून भरती
जिव चांदणे होतो
तुझ्या आकाशावरती....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४ जून २०२२







Sunday, June 12, 2022

पेटल्या वाती

या झाडाच्या फांदीवर
आठवांचा थवा जागतो
अशा मर्मवेळी मी
तु येण्याची दुवा मागतो

झाड फुलातुन पेरते
एक सूगंधी आशा
मी पाहून घेतो व्याकुळ
चंद्र उगवती दिशा

तु येता येत नाही
सारे होते मुके
पसरत जाते रानी
एकट उदास धुके

अशा शांत वेळी
चंद्र बोलका होतो
हाती धरला शब्द
सुबक शेलका होतो

मी देतो अर्ध्य त्याचे
तुझ्या पाऊल वाटी
कवितेत माझ्या होते
चांदण्याची तुझ्या दाटी

हा चांदणप्रहर नक्षत्री
मी भोगत असतो राती
तिकडे जळत असता
प्रतिक्षेत पेटल्या वाती...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२ जून २०२२

Saturday, June 11, 2022

पाऊसगाणे...

मी रेखले गीत होते
ओल्या वाळु वरती
पुसून वाहून गेले
येता मनास भरती

चेह-यावर ठेवू कसे?
मी अनोळखी भाव
नजरेतुन लोक घेती
तु असल्याचा ठाव

भभुईस्पर्शी झाले फुल
झाडास खंत वाटे
बोलावता तुझे हाकारे
मनात अवकाश दाटे

तु पाऊस का धरावा
वेठीस अशा घडीला?
नदी अशाने मुकते
लांघण्या थडीला

तु सावर सारे थेंब
ओंजळ नसावी रिती
पावसालाही कसली
कोसळण्याची भिती?

हे निनावी बहर
सारे उभे केविलवाणे
पाझरू दे ओंजळीतले
तुझे पाऊसगाणे...

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११ जून २०२२














Friday, June 10, 2022

पारिजातकी...

शकुनसांधी नजर
पहाटेस उजळुन आली
चांदणी हळुवार उगवे
मिटल्या पापणी खाली

गहिवर मोडून सारे
जावे विराण गावा
तरी मनाचा होई
तुझ्या दिशेस धावा

काव्याभास तुझा भोवती
शब्दांचे फुल सांडले
पारिजातका खाली तु
भाव तुझे जणू मांडले

मी एक फुलातुन कविता
टिपून पहाटे घेतो
शब्दांना गंध तुझा बिलगून
शब्द भुपाळी होतो

जात्यावरच्या ओवीतही
तुझ्या सुराचा भास
ओसरीत दरवळतो
तुझ्या गीताचा सुवास

राहुटीवरचे आकाश
त्यास गुलाल लागतो
मी असा नित्य
तुझ्या स्मरणे जागतो

मी बोलत नाही सारे
चांदण्याला सारे कळते
तुझ्या पारिजातकी भासात
ते नित्य दरवळते....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११ जून २०२२








Thursday, June 9, 2022

चांदणसखी


आकाशगंगे खाली
रान चांदणे चांदणे
आठवांच्या गहिवराला
स्वप्नांची कोंदणे

सखीच्या डोळ्यात
चांदण्याचे रान
सागराची खोली
चांद होई बेभान

सखी चांदण्याचा भास
सखी शब्दांचा आस
मी समेटून घेई
सखीचा आभास

सखी सांगावा वा-याचा
सखी झुळुक मंद
माझ्या शब्दांचे आत्मे
त्यांना सखीचा तनूगंध

सखी रातव्याचा राग
सखी प्रतिक्षेची जाग
हरवल्या मनाचा
सखी होतसे माग

सखी शब्दांचे लेणे
सखी गजलांचा बंध
सखीच्या चांदण्याला
माझ्या अवकाशाचा छंद

सखी चांदवली रात
सखी दिव्याची वात
सखी उमटला भाव
सांजप्रहरी उरात

सखी आभाळाचे रंग
सखी रचले अभंग
सखीच्या चांदण्याला
माझा अवकाश दंग...

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९ जून २०२२









झरा...

रंगभिजल्या सांजेत सुर्य
अलवार संधेत मिसळे
दुर डोंगरडोही झरा
मातीत धुंद कोसळे

हे झ-यास कुठले भाव
घेवून इथवर आले?
कशाच्या ओढीने तो
डोंगरद-यातुन चाले?

मातीचा का पुकार
हृदयी त्याच्या भिजतो?
म्हणून बावरा तो
मातीच्या कुशीत निजतो

माझ्या अंतरीचा झरा
त्यालाही हाक ओली
तुझ्या मृदगंधी शब्दांची
कवितेस बिलगे बोली

मलाही होते बावर
ढगही दाटून येते
थंड तुझ्या झुळुकीने
मग थेंबाची कविता होते

तु घे थेंब ओंजळी!
अर्ध्य जणू हे माझे
नयनाच्या गर्द वनात
पाऊस रिमझिम वाजे...

तो पडता पाऊस पुन्हा !
होतो कोसळणारा झरा
तु शाम सावळा होते
कविता माझी मीरा....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९ जून २०२२








Wednesday, June 8, 2022

शब्दांचा वृक्ष...

मी माळ माझा घेवून
उभा पावसाखाली
ही कसली कळ हृदयी
हिरवी..फुलती..ओली

तु रिमझिम धारा द्याव्या
मातीस ॠतु बिलगावा
की फुटव्यांच्या फुलो-याचा
हंगाम मनी शिलगावा

रान व्हावे हिरवे सारे
तुझे अथांग यावेत थवे
मी पेरून शब्द घ्यावे
पुन्हा... बेजोड नवे

कवितेचा माळ फुलावा
भरून यावे सारे
पक्षास तुझ्या बिलगावे
माझ्या मनातील वारे

झेपून त्यांनी थकावे
फांदीचा आसरा घ्यावा
माझा मातीत रूजला शब्द
फांदीचा वृक्ष व्हावा....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७ जून २०२२




Sunday, June 5, 2022

वैराण रातीत...

स्मरणे तुझे आभासी
त्यांची जटिल नक्षी
तारकांचे पुंज कितीदा
ठेवू त्यांना साक्षी

मी मार्ग चांदण्याचे
शोधतो निर्जन एकला
एकटे पाहून मजला
बघ चांदही थकला

चांदणे कसे पेटते?
नयनास तुझ्या पुसावे
द्यावे कसे प्रतिक्षेसही
काही वेळ विसावे?

ढगास असे का बावर
चंद्रास पाहून होते?
दुर वाहती नदी
नयनी का धावून येते?

वैरिणीच्या वेषामधली
तुझी उदासी दाटे
निरंजनाच्या वातीतुन
उजळावे मजला वाटे

तु नसता चांद नसतो
रक्तात अंधार भिनतो
जिव कावरा हळवा
माळावरती शिणतो

जळबिंब चांदण्याचे
ओंजळी माझ्या गोठते
निर्वातातही ध्वनी घुमतो
मनास असे वाटते

हृदयास किनारा नसतो
ते वाहत तुजकडे निघते
तुझ्या मिलन आशेने
ते वैराण रातीतही तगते.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
६ जून २०२२










ललित.....

ललित.....

निनाद यावेत इतपत मौनाने प्रदिर्घ होवू नये..! म्हणून फुलपाखरांचे पंख तपासायला हवेत...ती सारी फुलपाखरे मौन घेवून फिरतात..आणी हर फांदीवर मौनाचे रंगठसे उमटतात..त्या रंगठशांना घेवून लिहू पाहावे तर.. ते रंगही मावळतीत विलीन होतात.. (जसा तुझा आभास अलवार अंतरी विलीन होतो..) मावळतीत उतरलेले रंग गडद होवून ते अंधाराचे रूप घेतात..आणी मौनाची भाषा अजून गहन होते..मी त्या गहन मौनाचे हलकेसे पायरव टिपत,माग काढत निघतो दिगंत शोधत..आणी एकेक शब्द फुलपाखरांच्या रंगठशाएवढे स्पष्ट होवून आकाशात चांदणे बनून चकाकताना दिसतो..मी त्या चांदण्याचे अदमास घेत आतला..अवकाशातला..अंधार हटवू पाहतो..त्या चांदणरंगाने अंधार कालवू पाहतो...ते रंग ओघळतात... एकमेकात विलीन होतात..आणी माझे शब्द रंगीत कविता होतात..!! मी स्थिरावून त्या रंगीत कवितेचे प्रतिबिंब मनात साचवू पाहतो...पण मग मनही रंगीत होते.. त्या रंगीत मनाची पुन्हा कविता होते...!!
मी त्या रंगातुन तुझ्या मौनाचे अन्वयार्थ लावतो..तुझे मौन कधी रंगीत होते..कधी शब्द!!

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५ जून २०२२







Saturday, June 4, 2022

पाडस

दुर एकट जंगलाच्या
खोल झाडी आत
पाडस एक उभे
@शामल सांजभ्रमात

वाट चुकले वा पाहते?
रविकिरण होती मंद
नयनी त्याच्या कोणाच्या
स्वप्नांचे अनूबंध

तु ही पाडस गोजिरे
जंगल लांघू पाहे
हवा सांजव्याकुळी
जंगल भेदत वाहे

झटकून दे बंधने
गर्द होण्यापुर्वी निशा
घे मुक्तीची झेप!
व्यापून टाक दिशा

(Pr@t@p) फोटो @$|<
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
४ जून २०२२






तळ्याचे निरव गाणे

प्रतिबिंब तरंगी वाहे
सारंगीचे गाणे
खोडास कंचहिरवी
बिलगून येती पाने

झाडाचे नशीब रंगीत
मोरपिसांची फुले
फांदीवरती बुलबुल
गीत तयास भुले

शब्दातुन एक रावा
बोलतो संकेतवाणी
वा-याची झुळुक वाहे
तळात दडली गाणी

तळ कसा गाठावा
नजरेस पडतो प्रश्न
तळे तुझे सांजरंगी
भासे मला मग तृष्ण

ओंजळ तळ्यावर धरता
तळ्यात लहर साचते
माझ्या शब्दाआडूनी
स्वतःस कोण वाचते?

भाव तुझे चांदण्याचे
माझ्या तळ्यात चिंब
सारंगाचे गाणे बनते
मग तळ्यातले प्रतिबिंब

तुझे तळे की माझे
कोणाचा तळ न लागे?
निजल्या निरव रातीस
दोन नयन मग जागे.....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
४ जून २०२२











Thursday, June 2, 2022

स्वप्नांचे असेच..

स्वप्नपंखी मोरपिसांचे
काढत अंधूक माग
पहाटेच्या अंतराला
येई उजेडरंगी जाग

खच फुलांचे शुभ्र
सकाळ गंधित रंगीत
नव्या घडीत लहरते
खोल रूहानी संगीत

लहरी मंद उतरती
उंबरठयावर दाटी
गोठ्यात अनावर पान्हा
झरतो वासरओठी

पाखरथवा निघाला
किरणांचे स्पर्शिण्या मुळ
मातीत सुर्य उतरता
उठते गोरजधुळ

पापणांची बंद दारे
करून तु किलकिले
नजरेतुन दे बहरांची
दोन प्रसन्न फुले

भारल्या उजेडवेळी
स्वप्नास निज दाटे
सांजेच्या शामलवेळी
ती परतती चांदण्यावाटे

स्वप्नांचे सगळे असेच..
येणे जाणे , रुजणे
नयनात खोलवर सजने
कधी आठवणीत भिजणे...

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३ जून २०२२















मुभा

तु नाहीस म्हणून आज
चंद्रही लयाला गेला
अवकाशी ढग फिरतो
मुक...एक..भावओला

ओंजळभर पाऊस
दे अर्पूण या नभी
विज या काळजातली
नजरेत तुझ्या बघ उभी

ती कोसळते लख्ख
सारे उजळुन जाई
ओथंब पावसाला मग
अनावर कोसळ घाई

तळवा तुझा स्पर्शावा
थेंब मनात झुरती
ओघळून तुझ्या मनावर
ते अजून व्याकुळ उरती

पाऊस दाटून असा
तुझ्या आभाळी उभा
ये दारात अनवाणी
दे कोसळण्याची मुभा...

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२ जून २०२२

Wednesday, June 1, 2022

निर्जन..


                                      गर्दीत निर्जन होऊन
                                      मी असा मुक होतो
                                     तुझ्या येण्यापूर्वीच....
                                     बहुधा ठिक होतो

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१ जून २०२२





ढगांची काळीजमाया

प्राचिन नदीचा तळ
ढवळून शब्द आले
ओल्या भावकळांनी
ते ही भिजून..ओले

अंतःकरणी काय फुटते?
जणू नदीचे मन्वंतर
लांघत शब्द निघती
आपल्यातले अंतर

भाव ढग होतो
डोंगरी व्याकुळ फिरतो
पावसातला शब्द
मग रानशिवारी झरतो

तो झिरपत राही रानी
तो स्पर्शितो धरणीकाया
धरतीच्या अंतरी रूजविण्या
ढगांची काळीजमाया....



(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१ जून २०२२










स्फटिकांचे गोंदणे

सुटता सुटत नाही
कोडे अंतरी पडलेले
कल्लोळून मनाचे पक्षी
तुझ्या दिगंती उडलेले

सवाल कसले फुलले
या रातीच्या एकट फांदी
पाखरांच्या पंखावरती माझ्या
हृदयाच्या रंगीत नोंदी

गझलेस रंग बिलगती
त्या पंखाची घेवून झेप
नित्य तुझ्या दिगंती
गझलेची माझ्या खेप

मी उधळल्या शब्दांचे
होते बिलोरी चांदणे
तु नक्षून मनावर घेतलेले
हे स्फटिकांचे गोंदणे....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३१ मे २०२२



राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...