Saturday, June 25, 2022

फुलखुणांचे माग

रातीच्या घनगर्दीतले
चांदणे हळुवार सरले
प्रतिक्षारत वाटेवरती
मन भिरभिर फिरले

सांडल्या फुलांचे
अविनाशी गंध रिते
मी शब्दात सोसतो आहे
तु पाठवलेली गीते

गीत तुझे बिलगते
शब्दास मौन बाधते
ही कसली काळीजवेळ
सय तुझी साधते

मी परत निघतो ठेवत
फुलखुणांचे कोमल माग
खिडकीत पक्षी गातो
येईल तुला का जाग?

येवू दे परतून मजकडे
मी तुला दिलेली हाक
त्या हाकेस यावी आर्त
तुझ्या प्रतिहाकेची झाक

थरारूदे बन मनाचे
येवू दे आभास धारा
ओळख कुणाचे स्पर्श
घेवून वाहतो वारा?

दुर अंतरावरूनी
सांधून घे दुरावा
भाव उदास विरहाचा
अलगद दुर सरावा....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६ जून २०२२








No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...