Thursday, June 9, 2022

चांदणसखी


आकाशगंगे खाली
रान चांदणे चांदणे
आठवांच्या गहिवराला
स्वप्नांची कोंदणे

सखीच्या डोळ्यात
चांदण्याचे रान
सागराची खोली
चांद होई बेभान

सखी चांदण्याचा भास
सखी शब्दांचा आस
मी समेटून घेई
सखीचा आभास

सखी सांगावा वा-याचा
सखी झुळुक मंद
माझ्या शब्दांचे आत्मे
त्यांना सखीचा तनूगंध

सखी रातव्याचा राग
सखी प्रतिक्षेची जाग
हरवल्या मनाचा
सखी होतसे माग

सखी शब्दांचे लेणे
सखी गजलांचा बंध
सखीच्या चांदण्याला
माझ्या अवकाशाचा छंद

सखी चांदवली रात
सखी दिव्याची वात
सखी उमटला भाव
सांजप्रहरी उरात

सखी आभाळाचे रंग
सखी रचले अभंग
सखीच्या चांदण्याला
माझा अवकाश दंग...

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९ जून २०२२









No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...