Thursday, June 23, 2022

भावमुक्त.....

तपासतो आहे
मी शब्दांचे आत्मे
न उगवल्या चांदण्याखाली
करतो आहे त्यांची
तपशिलवार वर्गवारी
शाकारतो आहे त्यांचे
अंतरंग विस्कटलेले...

त्यातील...
आवेगी,भावगर्भी,उत्सुक,
अलवार,स्नेही,आर्त
आणी हळव्या शब्दांना
मी ठेवतो आहे बाजूस
ओंजळ असो वा नसो
असावेत ते गाठीला
म्हणून....

आणी घेतो आहे तपशील
घसरल्या,टोचल्या,दुरावल्या,
दुख-या, विसंगत आणी
असंगत शब्दांचे नव्याने...

या निर्वाताच्या झाडाखाली
माझ्या कवितेचे कलेवर
मुक्त होत आहे
त्यांचे सनातन दुःख
कधीच विजनवासात गेलंय..

मी निःशब्द होवून
निघालो आहे तमाकडे
फिक्या शब्दांना आत्मा
मिळवण्याच्या मनसुब्याने

आणी एक दरवेशी धुके
विसर्जित करते आहे
माझ्या कवितेचे साऊलबन
हळुवार..

या झाडाखाली आता
शब्द रूजतील ही शक्यता
कधीचीच आहिल्या होऊन
निपचित पडलीय

आणी तीस पाउल लागुन
ती सजीव होईल म्हणून
मी प्रार्थनाही करत नाही...

माझं शब्दवैराग्य
आता मुक्तीपथावरून
निघालं आहे
कवितेस भावमुक्त
करत धिराने.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३ जून २०२२











No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...