Tuesday, June 14, 2022

गीत तुझे मिठीला...

मी पाहतो तोच चंद्र
तु ही बहुधा पाहते
मग ही कसली चंद्रधुन
आपल्या अंतरी वाहते?

या बावर सांजवेळी
मी धुके तुझ्यावर पसरे
तु पेरते नभात माझ्या
चांदणे तुझ्यातील हसरे

हसत्या चांदण्याच्या
डोळ्यात कसले पाणी?
माझी कविता गाते
तुझ्या मनातील गाणी

गाण्यास तुझ्या बिलगती
शब्द माझे अनावर सारे
तुझ्या मनातही असते
धुंद बोलके वारे

वारा होतो भाव
दोघेही मुक जळतो
तुझ्या दिव्याचा प्रकाश
वातीस माझ्या कळतो

दिवा ,वात,जळणे यावर
दोघेही बोलत नाही
प्रकाशाचे मुळ आपल्या
दोघेही खोलत नाही

दिसती प्रकाश वाटा
अंधार सरतो मागे
तु निजता तुझ्या घरा
माझे शब्द राहती जागे

जाग्या शब्दांची माझ्या
पहाटे भुपाळी होते
गीत तुझे मिठीला
येथे सकाळी येते....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५ जून २०२२




No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...