Thursday, March 10, 2022

तुझ्या दिशेचा तारा....

एक रम्य सायंकाळी 
रस्ता अनाहूत भेटला
जणू मंदिराच्या गाभारी
नंदादीप पेटला....

लख्ख चांदणे ओंजळी
कोण पेरत चालले?
हे अस्तर चंद्रमाचे
अलवार कोण खोलले?

या संध्याकाळी बिलगे
झाडाला एक वेली
नयनात दाटलेली
सांज एक मग ओली

थबकत्या पाउल वेळी 
रस्त्याला फुटती फाटे
भरल्या सांज वेळी मग
रिते रिते का वाटे ??

ही हळवी हाक कुणाची
मनात गुंजत राहते
बंद डोळ्या आडूनी 
कोण चांदणे पाहते?

रेशीमबंधी स्पर्शाचे
मऊ मखमली आभास
गुंफल्या हाताचा
अबोल दिर्घ प्रवास 

एक रम्य सायंकाळी 
जिव असा लागतो
निद्रेच्या तमाखाली
चंद्र निरव जागतो

या सांज समयी वाहे
आठवणीचा वारा
मी रिक्त मनाने पाही
तुझ्या दिशेचा तारा...

▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१० मार्च २०२२)

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...