Tuesday, March 29, 2022

डोळ्यात सजलेल्या...

मज तुझी आठवण येते
या भरल्या संध्याकाळी
घरट्यास बिलगती पक्षी
देवून अवकाशाला टाळी

मज तुझे गीत आठवते
श्वासाच्या अंतरावरूनी
जणू हाक मला बिलगते
आभाळात उंच फिरूनी

मज तुझे स्पर्श खुणवती
मोरपिसांच्या रेषे मधूनी
तुच अवतरे मुलायम
माझे अंतरंग भेदूनी

मज आठवती तुझे डोळे
जणू गहिरा काजळ डोह
मी रोखुन धरतो तळव्याने
तुझा आभासी मोह

मज तुझा पुकारा येतो
माझे अनंत भारणारा
मी वारा होवून जावे
गंध तुझा पेरणारा

मज आभास तुझे बिलोरी
भेटावयास आले
सांजेच्या काळजाचे मग
पाणवठे गहिरे झाले

मज वाटे तुझ्या दिशेला
पेरावा एक तारा
अवकाशी फिरणा-या पाखरा
जणू मिळावा चारा

मज भासे तुझे रितेपण
मज वाटे तु यावे
मुक माझ्या शब्दांचे मग
दिर्घ महाकाव्य व्हावे

मज वाटे तु गाव्यात
या ॠचा भिजलेल्या
मी पहाव्या माझ्या कविता
तुझ्या डोळ्यात सजलेल्या.....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२९ मार्च २०२२










No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...