फुलवत असता सांजेला
आठवणीचे मळे
अजाण दाटून येते
वृक्ष जणू उन्मळे
या शिळेत अहिल्या राहते
भाव स्पर्शासाठी आसूस
शब्दांनी पुसून घ्यावेत
दगडातुन पाझरते टिपूस
हे जडबंधी पावले
उचलून कुठे निघावे?
की आत दडल्या तुझे
घ्यावेत मुक सुगावे?
हे आक्रंदाचे अरण्य
हा कसला वणवा पेटे?
दुर असा हा चंद्र
इकडे भरती मनात दाटे
काळोखाच्या आडोशाने
हे आठवणीचे वारे
मी तुडवत माळरान निघतो
सांडलेले जमीनभर तारे
आतली विण उसवते
मी मला नव्याने पाहतो
मनात दाटल्या अजाणाला
मग एक कविता वाहतो
कसे घ्यावेत अदमास?
वाराही गुणगुणत नाही
लिहून सारे सारे...
तरी उरते मनात काही
हे अपूर्णतेचे अरण्यरूदन
काळोख अंधारी जळतो
लिहून झाल्या कवितेला
हा कुठला ध्यास छळतो?
कधी दिर्घ निःश्वासाचीही
कविता बिलोरी होते
जात्याच्या ओवीमधूनी जणू
माहेरवाशिण गीत गाते.......
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(५ मार्च २०२२)
No comments:
Post a Comment