Sunday, March 20, 2022

शाकारले शब्द..

रोज बुडतो सुर्य
रातीची शोधण्या खोली
कविताही उमलून येते
घेवून शब्द अबोली

झांजरसंध्या बसते
झाडाखाली दूर
रात काहूरी छेडते
गोकुळछंदी सुर

ही पडली पाने निश्चल
प्राण फुंकतो वारा
झाडाखाली उतरतो
एक आसमानी तारा

ता-याला कळते दुःख 
पाने झडून गेली
चिमणी दुःखभराने
मुक उडून गेली

जाता जाता तीने
एक ठेवले गाणे
त्याच्या सुरात कविता 
व्यापत असते पाने

कविता गीत होते
शब्दाला काळोख डसतो
मी ता-याच्या दिशेस पाहून
चंद्राचे डाग पुसतो

डाग तरीही राहतो
चंद्र तरीही उगवे
शाकारल्या शब्दात माझ्या
दुःखाचे डोंगर नागवे....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(२० मार्च २०२२)

No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...