Sunday, March 13, 2022

जागर थवा...

प्रतिक्षा कर...
शब्दांच्या गहिवराचे
की थेंब दाटतील नयनी
पहाटेच्या दहिवराचे

ओझरता स्पर्श तुझा
कसला व्रण देती
अव्यक्त होण्याआधी माझे
शब्दही प्रण घेती

दवात भिजती शब्द
हा ॠतु कोणता असतो
शिशिर जणू चैत्रातुन
अजाण मुक हसतो

गवसणी तुला घालण्या
कवितेची येती पक्षी 
तु निद्रेवर माझ्या रेखते
भिजलेली दवात नक्षी

अंधार विरघळू लागे
तु हसता मंद गाली
चांद ढळतो थोडा
चांदण्याच्या पदराखाली 

तु गीत कोणते दिले
पाखरे फांदीवर गाती
किलबिलीच्या धुसर प्रहरी
पुलकीत होते माती

मी निघता तुझ्या दिशेला
सुर्य उगवतो नवा
परतून येत असतो
तुझ्या स्वप्नांचा जागर थवा

▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१३ मार्च २०२२)

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...