Thursday, March 17, 2022

गुलाबी आसमंत..

की रंग तुझा गुलाबी 
आसमंती संध्याकाळी 
रात सजवत असते
पुनवेची चंद्रहोळी

रंगाचे तुझ्या गालबोट
मग आठवणीही रंगीत
हवेत पसरते अलवार
व्याकूळ आर्त संगीत

कोणता सजवू रंग?
तुझ्या आभास राती
तु निरोप दिलेली पाखरे
गीत कोणते गाती?

पंखावर त्यांच्या चंद्र 
चांदणे साजरे सजते
तुटलेल्या ता-याआड
स्वप्न रंगीत रूजते

तु तुटला तारा घेवून
उगवतीच्या दिशेस निघते
सप्तर्षी ता-याआडूनी
हे कोण खोलवर बघते?

गर्द साचल्या तमात
मी वेचत असता तारे
निरोप तुझा आभासी
घेवून येती वारे

मी नभाच्या अंतःकरणी 
मग एक तारा ठेवतो
सुर्य उगवतो तोवर तो
अखंड जागा तेवतो

विझता तारा अर्पूण
रात उजळते अवकाश
रंग तुझा गुलाबी 
व्यापतो मग सावकाश...
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१७ मार्च २०२२)

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...