Saturday, March 26, 2022

जिव तयांचा जळतो....

दुर... सुर्य बुडतो
सांज मंद शिलगे
तमास माझ्या गर्द
तुझे चांदणे बिलगे

हो जडशिळेचे दिव्य!
वनास मुक्ती मिळते
की दुःख दगडशिळेचे
पावलास आपसुक कळते

वारा स्तब्ध असता
पक्षाची लयीत गीरकी
व्यथेत गळली पंखजोडी
झुळकीला हो पारखी

हे एकाकी उधाण
सांजेचा तळ गाठते
चंद्र बनाच्या अंतरी
कोण व्याकुळ दाटते

या अनंत अवकाशाला
भास रित्याचे होती
दुर पाखरे दिगंती
सुर कसले देती?

अस्तर चांदण्याचे
हळू हळू मग ढळते
नदी झुळझुळणारी
गावावरून वळते

माग नदीचा घेता
चंद्र दाखवी वळणे
मग अगाध संगमावरती
दोन नद्यांचे मिळणे

शिणता तमाचे डोळे
सुटतो नदीचा माग
नदी वाहवत नेते
चंद्र उजेडी भाग

हा चंद्र नदीत वाहीला
सागरा असाच मिळतो
पुनवेच्या भरती वेळी
जिव तयांचा जळतो.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(२६ मार्च २०२२)




No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...