Sunday, March 27, 2022

शब्दांची भुल....

हे भावविभोर होणे
कुठून येते मनी?
जणू पेटवल्या मझारी
दुव्यात बुडल्या धुनी

गीत उशाशी बसता
वाळवंटी रेत उडते
हरवल्या काफिल्याला
मृगजळी श्रध्दा जडते

मी अंधारव्रताचे चांदणे
मुठीत घेतो भारून
हे कोण आतुन येते?
शब्द सुनेपण सारून

रेतीवर उमटे नक्षी
आभास तुझा हळवा
निघून गेल्या काफिल्याला
ध्रुवाचा तारा कळवा

कोण अवलिया लिहतो
मरूद्यानाचे हिरवे गाणे?
रेतीला खुपते अंतरी
काफिल्याचे निघून जाणे

हवा आणते दुरून
लोकगीताची हाक
गीतातल्या शब्दांना त्या
अवलियाची येते झाक

गीत झरते,रेत उरते
तांडे धरती दिशा
वा-याचा स्पर्शाने होती
झुळुकी वेड्यापिशा

कण नभाला भिडता
चंद्र पसरतो झोळी
मी शोधतो हिरवे बन
वाळवंटी उमटती ओळी

काफिले गात निघती
माझ्या शब्दात दडले गाणे
तुझ्या मरूद्यानाच्या तरूला
मग लगडून येती पाने

काफिले गाती गोडवे
तुझ्या बनाचे फुल
अखंड रेतीवर पसरते
शब्दांची माझ्या भुल....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२७ मार्च २०२२














No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...