Friday, March 18, 2022

मनात उरावी ओवी....

ती जखम गर्दगहीरी
भिंतीवर लिहल्या गझला
शब्दांचे रंग कोसळले 
दिप देवळीत निजला

हे झाड वडाचे उभे
गाव सारा पाहते
निघून गेल्या पावलाचे
पैंजण मागे राहते

शेतभरारी घेवून
वारा निरोप आणतो
मातीचा मगदूर ओला
जात पिकाची जाणतो

वेशीवर रातसमयी
कोण पेटवले दिवे?
नदी तिरावर उमटती
तरंगाचे खोल थवे

खडा फेकला कोणी?
नदीत दाटली हाक
जणू रणी उसासे कर्ण
उपसत रूतले चाक

काल पुनवेच्या राती
चंद्र होता दाटला
आज भरल्या राती
तो क्षिण असा का वाटला?

कोण फिरवली नजर?
चंद्र असा का झरतो
उजेड त्याचा अनवाणी
नदी तिरावर फिरतो

हाक येता येत नाही 
रात सरत निघते पुढे
भिंतीवर पुन्हा पडतील
शब्दफुलांचे गंधीत सडे....

चंद्र पसरता झोळी 
त्यास कविता द्यावी
अभंग अर्पूण सारा
मनात उरावी ओवी....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१८ मार्च २०२२)

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...