तु गेल्या संध्याकाळी
भासते सारे रिते
तळव्याच्या उंचवट्यावर
तु लिहलेली आर्त गीते
मी शब्द गीतांचे पाही
त्यांना तुझीच नक्षी
बहराच्या छायेखाली
निःशब्द हळवे पक्षी
खंत कसली जाचते?
निःश्वासाची भाषा
पहा तुझ्या हातावर
तळव्याची माझ्या रेषा
निरोप कसला घ्यावा
ठेवून मागे सारे?
असेल रात तर अवकाशी
अलवार उगवतील तारे
जरी नसला आभाळी चंद्र
तरी आभास त्याचा असतो
हर वळणाच्या पल्याड
एक सुंदर रस्ता दिसतो
मी दिगंत शोधत असता
गहीवर तुझा का यावा?
तु दिल्या निरोपी निर्माल्याचा
रंगीत वसंत व्हावा.....!
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(९ मार्च २०२२)
No comments:
Post a Comment