Monday, March 28, 2022

....भारले !!

मखमली स्पर्श तुझे
अंतरंगी मनात फिरले
झाल्या विलग सावल्या
मनात आभास उरले

ही नयनसाजीरी घटीका
डोळ्यांनी टिपले डोळे
जणू रेखीव चेह-यावरले
तीट काजळी काळे

हा गंध तुझा गुलाबी
सांजेला देतो रंग
की भास तुझा मखमली
मोरपिस ही दंग!

बोटांनी बोटावरली
टिपून घेतली नक्षी
जणू बहराच्या फांदीवरती
उतरे रंगीत पक्षी

तु असता अवकाशी
सारे असते भारले
डोळ्यांच्या पापण्याने
क्षण गुजरते सारले

हव्यास भेटीचा दाटे
सांज चढत असता
मी चंद्र पाहतो नभी
गालाच्या मनात हसता

तु गेल्या वाटेवरती
बहर बघ कोसळे
दोन मनाचा अवकाश
एक दिगंती मिसळे

घाटावरती वाहते
तुझ्या मनातील पाणी
एकांताला माझ्या
फुटते तुझीच वाणी

हे काय शिल्लक आत?
हे कोण रंग पेरले?
मी दिल्या मनाला तु
अलगद..अलवार..भारले!

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८ मार्च २०२२









No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...