सांज गहीरी होताना
तम गोठले होते
तुझ्या स्पर्शाचे चांदणे
ते ढग कोठले होते?
रस्ता बुडत होता
मन माघारा धावले
तु गेल्या रस्त्यावर
अजूनही माझी पावले
तुझा आभास चांदणरंगी
पाहती नभातुन पक्षी
तु स्पर्श गोंदणे रेखले
शब्दांना माझ्या नक्षी
तु हसता पक्षी हसले
सावरत रंगीत पिसे
तु चांदणपेरा केला
जणू सागरमोती जसे
दुर चंद्र निजला
रात अशी का जळते?
वातीची उजेड भाषा
वा-यास नव्याने कळते
हवेला गंध कसला
ही आर्तता कसली दाटे?
निशीगंधाचा सांगावा येई
तुझ्या तनाच्या वाटे
न बोलता एकही शब्द
सारे उमजत गेले
तु दिल्या कळ्यांचे सारे
मनात अत्तर झाले
ही अत्तरओली वेळ
तुझा निरव दुरावा
मी प्रतिक्षारत राती
नभी ठेवला चंद्र पुरावा
चंद्र जळताना नभी
वातीत चांदणे दाटते
या खुल्या आभाळाखाली
आसपास असावे वाटते...
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(७ मार्च २०२२)
No comments:
Post a Comment