Saturday, March 12, 2022

चांदणे राख...

ही गहन स्मरणे येता
मनात चांदणे सजले
तु हवेत पेरले गंध
ताटवे फुलांचे रूजले

फुलांची झड सांडते
तुझी चाहूल लागता
मी बहर देतो अर्पून
तु मिलनाचे दुवे मागता

तु असता चंद्र उगवे
नसता तमाचे पर्व
चांदण्याचे रान स्मरते
रातीचे भोग सर्व

तु डोळे मिटवून पाहते
स्वप्न कोणते रंगीत?
समईच्या खोल तळातुन
वाजते व्याकुळ संगीत

ही धुन चंद्रओली
ही बावर होती घडी
तरंग अलिंगन देती
शांत नदीच्या थडी

हा सारस काय वेचे
पाण्यातले चांदणे..?
की मनावर उमटलेले
तुझ्या आभासाचे गोंदणे?

हा रात बावरा वारा
कोणाचे डोळे आणतो?
डोळ्यात दाटल्या स्वप्नांचा
मी शब्दातुन शेला विणतो

तु बोल जरा मनाशी
चांदण्यातुन मिळेल उत्तर
वा-याच्या अंतर आत्म्याला
मग बाधेल तुझे अत्तर

या अत्तरगंधी वेळी 
अंतरी उमटते हाक
नयनाच्या पापण्याआड
तु माझे चांदणे राख.....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१२ मार्च २०२२)

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...