शुभ्रधवल फुलासम
तुझे उगवून येणे
फुलाच्या स्पर्शाने
मग शहारून येती पाने
प्रतिक्षारत रान उभे
आभास गळतो नभी
आस दाटल्या नयनांना
मिटण्याची कसली खुबी?
हात बोलतो हाताशी
रस्ता असता सूना
मी शोधत असतो तुझ्या
तळव्यावर माझ्या खुणा
शब्द असता मुके
मन अखंड बोलत असते
हे कोण असे हृदयाला
ओंजळीत झेलत असते
का करावी प्रतिक्षा?
का निघावे दुर...?
मन का आळवते
तुझ्यात भिजले सुर?
यावे की निघावे?
कसला अजाण प्रश्न
की तळे भासते अनादी
शतजन्माचे तृष्ण
पुन्हा पुन्हा वाटे
तुझा बहर धारून घ्यावा
तुझ्यातला अनंत मजकडे
तुला सारून यावा
या केसांच्या लयीने
रात सळसळे मनी
सावरून तुला घ्यावे
भान हरवल्या क्षणी
मनास लागे ओढ
तु गेलेली दिशा
हाका दाटती आसमंती
गोकुळ व्याकुळ जशा...
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(१५ मार्च २०२२)
No comments:
Post a Comment