Monday, November 1, 2021

चांदण्याना महापूर...

सांजपर्णी शामल धुक्याला
फुटते सोनल भाषा
विझत्या ढगात रूजता
रेंगाळती प्रकाश रेषा

हळुवार अलगद दुरवर
अंबर विझत कलते
रातीचे चांदण अत्तर
अवकाशी बहरून फुलते

निळ दाटते नभातुन
धरतीवर साज निळा
हवा मुक वाहते
मिलनाच्या मुक कळा

चंद्रोदयाच्या घडीला
पाखरात उठते हूल
बिलगत असता फांदिला
एक सुगंधी भुल

नजर पसरते अगाध
शोधते तुला दुर
सांज ओढून घेते
रातभयाचा नूर

पक्षी बघ निघाला!
घेवून माझे शब्द
तुझ्या नजरदिव्यातुन
जळे कवितेचे प्रारब्ध 

मी खरेच आलिप्त असता
पक्षांना मिलनाचे पंख
मी उजवून घेतो बाहू
सजवत मिठीचे डंख

सांजघडीला सजनी
तु पेटवत चांदण दिवे
दुर हाकारत असते
जमल्या प्रतिक्षेचे थवे

ही गडद निळाई नभाची
नित्य खोल साचते
कोण चांदण नजरेने
निळी कविता वाचते?

मी बुडवून सारे शब्द 
चालत निघतो दुर
का येतो ऊंच आभाळी 
निळ्या चांदण्यांना महापूर.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(०२ नोव्हेंबर २०२१)

Wednesday, October 20, 2021

दिगंत बिलगून घ्यावा....

घडवावे ऐसे शब्द
जणू जिव वेचावा
निःशब्द कवितेमधूनी
भाव तिथे पोहचावा

होवून जावे चंद्र 
भारून द्यावा दिगंत
नजरेच्या पोर्णिमेला
अवसेची कसली खंत?

एक गीत पेरावे
हाका-याचे घेवून सुर
झाड जणू बहरावे
माळरानी खुप दुर 

नदीस यावी भरती
सागरास यावे भरते
व्हावे ओथंब अश्रू 
तु ढाळण्या पुरते

दिन असा उगवावा
जणू सांडला बहर
व्याकुळ व्हावे सारे
तुझे अवघे शहर..

हाक घुमावी रानी
थवे परतूनी यावे
मुठीतल्या अंधाराला
चांदण्याने उचलून घ्यावे

रात निघे अनवाणी 
चंद्र नभी दिसताना
तु दिगंत बिलगून घ्यावा
मी समीप नसताना...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(२० ऑक्टोबर २०२१)

Tuesday, October 19, 2021

सांजपक्षी....



चंद्र सांडतो आभाळी
पुर येतो रानी
चांदण्याच्या काळजाला
काहूराची गाणी

लागे सागराला ओढ
लाटा वर येती लाटा
दुर विरून जाती
संधेच्या शामल वाटा

मी ढग सोडले मागे
पुसत निघालो खुणा
एकल्या पाऊलवाटेला 
तेच वळण पुन्हा...

अभंगी आर्ततेचे क्षण
तुझा आभास ओझर
व्याकुळ फुलासाठी
फांदीस फुटावा पाझर

मी रेखत असता मुक
आभाळावर चांदणनक्षी
मनात विहरत असतो
आठवांचा सांजपक्षी...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१८ ऑक्टोबर २०२१)

Sunday, October 17, 2021

फुलसुगंध...

मनी दाटते सय
मज वाटे विरह भय
माळावरच्या धुळीत
माळाचा हो विलय!

दिस मंदावे मुक
रातीत सांज बुडे
चांदण्याच्या छायेतुन
चंद्र निघाला पुढे

हात तुझे उजळले
माळाची स्पर्शून माती
किरणातुन झरणारा जेंव्हा 
चंद्र दिला मी हाती

हवा गोठली वृक्षातुन
वा-यावर गंध पसरे
फुल कोणते फुलले?
फांदीवर सोनेरी हसरे

मनात कल्लोळ गाथा
ये सय लोचनी
नयनांनी अलगद करावी
बहराची आसूस वेचणी

चंद्र तुझ्या स्मरणाचा
पुनव बनून जातो
जिव असा रातीचा
मुक शिणून जातो

तुझा इशारा होता
फुल अलगद गळते
गुज असे का उगाच
परक्याला आपसुक कळते?

माळाची उडती धुळ
माळावर किरण पडलेले
मी उचलून घेई फुल
धुळीवर मन जडलेले...

फुलास लगडलेला
मातीचा किरण गंध
चंद्र पेरतो अवकाशी
तुझा फुलसुगंध.....!!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१७ ऑक्टोबर २०२१)

Saturday, October 16, 2021

न लागे ठाव..

स्वप्नावर सांडे चंद्र
चांदण्यास आला पुर
घर कुणाचे दुर?
झोंबे काकुळतीचा सुर

रातीवर येऊन सावली
अंधार दसदिशा वाही
मोडून पडता ग्वाही 
वाट कुणाची पाही?

नजरेवर दाटे आस
चंद्र उदासे झरतो
वारा उधाण फिरतो
बहर असा का झुरतो?

माळरानावर माती
वा-यावर अलगद उडते
दाराला हाक अडते
रातीला स्वप्न पडते

चंद्र निघाला सजने
चांदण्या पडती मागे
रात अशी का वागे?
उसवत निद्रा धागे

घर धुक्यात हरवे
गुंतुन जाती वाटा
पायरव हा खोटा
स्वप्नांच्या अनंत लाटा

चांदण्याचा घेवून रंग
ढग निघाले गावा
गोकुळ करते धावा
मुक जाहला पावा

आस मनास लागे
रात अशी ही वैरी...
कालिया डोहात जहरी
यमुनेत कृष्ण लहरी

भास असा सुरीला
राधा घेई धाव
मनात कृष्णभाव
लागे त्याचा न ठाव.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१६ ऑक्टोबर २०२१)


Sunday, October 10, 2021

व्याकुळ एक अभंग....

झाडांनी चंद्र नेसला
चांदण गंधफुले
बंद जाहल्या नयनी
सांजघडी ही खुले

ढग गोठल्यावेळी
धुक्यास दाट पिसे
ओंजळीत कुणाच्या
चंद्र, सांजबावरा दिसे?

गाव अंधारी बुडला
फुलवातीचे दिवे
गाई पेरत गेल्या
आर्त कापरी दुवे..

दुर निमाल्या हाका
अंधार कंच निथळे
नंदादिपाची सावली
गाभारा मुक वितळे

हिरवटीचा मोसम
धुक्यात हरवून जाई
कोण निघाला गावा?
वाट विराणी गाई

दिवे पेटले सजनी
पानातुन थंडी झरते
वातीच्या काळजातुन
ओंजळही ...थरथरते....

मंद वाहतो चंद्र
रातीत दडले रंग
कवितेला फुटतो मग
व्याकुळ एक अभंग...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(१० ऑक्टोबर २०२१)


Sunday, September 19, 2021

चंद्र निघाला पायी...

रस्ते दुर निघाले
गाव तुझे की मागे
अंधार विणावा काळा
घेवून चांदण धागे

हाक तमातुन उमटे
जोगी गीत गाई
चांदण्याच्या सावलीने
चंद्र निघाला पायी

शिण दाटल्या आवाजाची
उमलून येते ओवी
बहर फुलांचा फुलणारा
मातीच्या कवेत धावी

नक्षिच्या आडोशाने
नक्षत्र बघ उगवते
सरावलेल्या नयनांच
अंधारात खोल बघवते

या काळ्या अंधारात
अभंग तुझा बघ बुडतो
हा देव कोणता काळा
भक्तासाठी रडतो?

दुर दिवा निमाला
प्रकाश इकडे साचतो
मी तमात बुडल्या पानावर..
ऊजेडाची कविता रचतो

कवितेच्या अंतरंगी
काजव्याचे अक्षर ठसे
बंद कुणाच्या डोळ्याआड
थेंब अश्रुचा हसे....

दुर जाणारा रस्ता
तुझी साथसंगत
शोध तुझा हा अबोली
तमास आणतो रंगत....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१९ सप्टेंबर २०२१)

Thursday, September 16, 2021

मोरपिसांचे ठसे....

पाऊस एकला रानी
मुक असा का पडतो?
ढगव्याकुळ मोरपिसांचा
रंग झाडावरती चढतो

साद अशी मग ओली
शिळ बनून घुमते
काळीज ढगाचे ओले
मातीत खोल रमते

या ओल्या पाऊसवेळी
मनात ढगाचे फिरणे
शित हवेच्या भुलव्याने
हरणे..अलगद झरणे...

थेंबास दे शिंपला!
होऊ दे त्यास मोती
ढग वाहून दुर नेती
झाडा खालची माती

दरीत ढग उतरता
सुर्य डोंगरी निजतो
पहाडमाथी पाऊस 
मोरपिसारी सजतो

मी धुक्याधुक्याने शोधी
तुझ्या ढगाचे ठसे
तु निघताना सांडलेले
ओली मोरपिसे

घन भारून येता पुन्हा 
मोराला हुरूप चढतो
ढग व्याकुळ होऊनी
थेंब फुलातुन झडतो.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१६ सप्टेंबर २०२१)

Wednesday, September 15, 2021

अनवाणी पाऊसझड...

फुल वाहिले शब्दांचे
कवितेस तुझा गंध
अनवाणी पाऊसझडीला
ये तुझा सुगंध ...

घनघोर वाहतो नभ
तुषार ढळीचा राग
बहर फुलांच्या अंतरीचा
काढून घ्यावा माग...

(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(१५ सप्टेंबर २०२१)

Tuesday, September 14, 2021

जळणा-या मुक वाती...

साचल्या अंधारघडीत
तरंगणारे दिवे
अंधारही जळे सन्यस्त
मुक वाती सवे

धुकेरी,चंदेरी
कधी भिन्न काळा
चुकवे अंधार असा
दिव्याचा ठोकताळा

मनातला ओला अंधार
नजरेचे दिवे जळताना
मी वळत जाव्या वाती
चटके कळताना

कधी तु अंधार गर्द
कधी मी व्हावे दिवा
मागत राहू असाच
स्वर्ण प्रकाशाचा दुवा....

तुझा अंधारक्षण उजळे
माझ्या प्रकाशराती
तु अगणीत पेटवलेल्या
जळणा-या मुक वाती....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१५ सप्टेंबर २०२१)

Saturday, September 4, 2021

पावसाची कविता....

पाऊस गेला दुरदेशी
ओल त्याची राहीली
कोण ही थेंबाची ..ओली
भावकथा वाहिली........?

अंधारबनाच्या वाटेवर
थेंबाच्या पाऊलखुणा
मातीचा हुरूपून येतो
भावबंध खोल जुना

झाडाची झडली साल
हिरवळ नेसून बसली
झरून गेल्या ढगात
आर्तता अशी का दिसली?

रित्या ढगाच्या हाका
पाऊस मौन न सोडे
थेंब घालती सृजनाचे
मातीला हिरवे कोडे

दुर अंबरी पेटती
विजेच्या लख्ख मशाली
मातीचा गंध वा-यातुन
ढगाची येते खुशाली...

कुंद हवेला मंद
मिठी एकांताची पडे
पाऊस वेचुन घेई
नभातील... चांदणखडे

हवा नाही का बोलत
ती ही तुजसम मुकी
ढगात पाऊस नसणे
पावसाची ना चुकी

तुझा असावा पाऊस
माती असता माझी
मोसम तुझा असावा
ढगास माझ्या राजी

किती लिहावा पाऊस?
घनघोर शब्दांचे ढग
डोळ्यात तुझ्या अवतरे
पावसाची कविता बघ....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(४ सप्टेंबर २०२१)

Thursday, September 2, 2021

नदी अनवाणी....

सुर्यबुडीच्या कुळातुन
संध्यादोय हो मुक्त
अंधाराच्या काळजावर
चांदण्याचे रेखत सुक्त

फुल बाधता बहर
खच फुलांचा पडणारा
शोधावा तो हात सुबक
ताटवा खुडणारा.....

तमाच्या वृक्षास
चांद फुलाचे ताटवे
दुर जात्या वाटेला
पैंजण कुणाचे आठवे?

पाण्यावर सांडे उजेड
संथ जाहल्या गाई
नदी निघाली सागरा
रानावनातुन पायी

बकुळ फुलांच्या राशी
सुगंध मनी का आठवे?
यशोधरेच्या सांत्वनाला
सिध्दार्थ अबोला पाठवे...

दिर्घ चालला तांडा
तुडवत निर्जन वाटा
नदीच्या अलिंगनाला
सागर वाहतो लाटा

चंद्ररंगाचे पाणी 
नदीस अनावर ओढ
हे नदीच्या आत्म्या...!!
तु पात्राच्या सिमा तोड....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(2 सप्टेंबर 2021)

Sunday, August 29, 2021

आठवणीचा शुक्रतारा....

हवेच्या अंतरातुन
गंधित झुळुक वाहे
बंद डोळ्यांनी तीस
व्याकुळ मन पाहे

हे सुरांचे चांदणक्षण
चांद असा का निजला?
दिप तेवता एकटा
रातीतुन मुक विझला

गवतास फुटता भाषा
निशीगंध ही बोले
स्तब्ध जाहल्या पावलाने
वाट कुणाची चाले?

हाक तुझी मुकी
चकोरा नभी वाहू दे
ढगाआडच्या चंद्राला
घन व्याकुळ होऊ दे

रात जळु दे अशी
जसे जळावे चंदन
सैल होऊ दे चांदणे
ओलांडून घनबंधन

दर्या ही गाई लाटांचे
आर्त गहिवर काव्य
तुझ्या स्पंदनाचे नाजूक
गीत जणू ओले-श्राव्य

आभाळात रेखू दे
तुझ्या कांतीचे चांदणे
दे उसणे भरण्या रंग
तुझे नक्षत्राचे गोंदणे

रातीस वाहू दे
तुझ्या बहराचे फुल
गहि-या नजरेची
गहिरी जादूई भुल

अखंड बुडू दे
या अंधाराच्या धारा
मी प्रकाशेन नभी तुझ्या
आठवणीचा शुक्रतारा.....
(Pr@t@p)
" रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
29/8/2021














Thursday, August 26, 2021

सोड अंधाराचा धाक....

पारिजाताच्या दारात
तुझा सुगंध सांडे
कोण दिले हाकारे
कुठे निघाले तांडे?

भिंत एक उभी
मधे तुझ्या माझ्या
खुणा तिच्यावर 
सावलीच्या ताज्या

डोळ्याच्या डोहात
आठवकुळाचे पाणी 
कोण झंकारते
आर्त पुका-याची गाणी

दुरदिशेला सोनकळी
एकाकीच उमले
कलत्या रातीवर
चांदण्याचे इमले

सांजगीताचे साजनी
स्वर रिते फोल
दुर देशीच्या ढगांना
तुझ्या आठवांची ओल

कुलीन रातीला लागे
चांदण्याचा डाग
चंद्र नभीचा धुंडाळे
तुझा सोनकांती माग

भिंती अल्याड मी
रेखाटले तुझे चित्र
आभाळाने घनव्याकुळ
दिले चांदण नक्षत्र

नक्षत्राच्या खाली
तुझ्या आभासाचा वारा
मी नभी पेरलेला
एक खुणेचा शुक्रतारा

घे पुका-याचा अदमास 
दे ओली मुक हाक
रात टाक झळाळुन 
सोड अंधाराचा धाक...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(27 ऑगस्ट 2021)

Monday, August 23, 2021

वाहत आलेले पान...

गोठल्या चंद्राचे
निळसर ओल धुके
ओल्या चंद्राखाली 
ताल सरींचा चुके

किती निमाल्या वाती
दिवे थरथर करती
मी उजेडाचे शब्द वाहीले 
धुक्यातल्या चंद्रावरती

तुझ्या शब्दांचे चांदणे
तुझ्याच तमात बुडाले
कोसळत्या पाऊस राती
थवे मुक उडाले

ओल्या पंखाना घेवून
भर पावसात पक्षी
विज काढते कडकन
काळ्या ढगात नक्षी

दुर निघाले रानी
आठवणीचे थवे
डोळ्यांचे झरते ढग
कोसळ सरींच्या सवे

तु बांध मातीची खुण
थेंबाच्या झेलत सरी
वाट विसरत नाही 
वाहून गेली तरी

नजरेने उचलून घ्यावी 
नजरेची ओली दिशा
पाऊस वाहून नेतो
तमात भिजली निशा

थेंब एकदा झेल
तळहाताच्या रेषी
पक्षी दुर विसावती
आठवणीच्या देशी

ढग तुला दिसता
थेंबाचे माग दान
उचलून घे तु अलगद
वाहत आलेले पान...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(23 ऑगस्ट 2021)

Saturday, August 21, 2021

सखीची कविता

सखीच्या दारात
चंद्र उजेडी आरास
गोंदणाच्या चांदणीला
पुनवेचा भास

सखीच्या मनाला 
पुनवेची आस
फुलत्या कळ्यांना
साजन सुवास

सखीच्या अंतरी
साजनाची ओढ
फुलांना बिलगे
रातराणीचे झाड

सखीला पाहण्या
चांदव्याची घालमेल
मोहरून फुले
रातराणीचाही वेल

सखीची नजर
हरीणाची जोडी
एक सुगंधी कटाक्ष
साखरेची गोडी

सखीचा भुलवा
पडे चांद भुल
उठे व्याकुळ मनात
आर्त एक हूल

सखीचा पुकारा
भाव शब्दांचे गहीरे
पण सुंदर सखीचे
जणू मन बहिरे.....

सखीची कविता 
सखीलाच वाही
चांद पुनवेचा 
मंद मंद होई....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(21 ऑगस्ट 2021)

Wednesday, August 18, 2021

आभाळाचा बंदी...

चंद्र ओला होई
पावसाच्या सरी
सर एक ओथंबे
आभाळाच्या घरी

तेजाळतो दिवा
हवा असे कुंद
झडीच्या पाऊस
होई सुगंध सुगंध

तहानला ढग
वा-यासंगे वाही
तुझ्या खिडकीला
तो ओथंबून पाही

वाहत्या पाण्यात
ओल्या चंद्राचे बिंब
पाहता तुला
सर होई चिंब

सर पावसाची झेल
ओंजळीला भर
धन्य होईल आभाळी
ढगाची ही फेर

माझ्या मनीचा पाऊस 
त्याला तुझी आस
माझ्या सरींना बिलगे
तुझा तनू भास

तनू भासातुन सर
होई सुगंधी सुगंधी 
माझ्या मनातला पाऊस 
तुझ्या आभाळाचा बंदी

(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(19ऑगस्ट 2021)

Tuesday, August 17, 2021

आभाळाचा पुर....

आभाळ का गरजे?
रात निजता दाराशी
पाऊस बसे एकला
गर्द पिंपळ पाराशी

दिवेलागणीच्या वेळी
तु गीत कोणते पेरले?
घन विझल्या अंधारात
कण विजेचे उरले

घन बरसे व्याकुळ
तुझ्या ओथंब दारात
भिज लागला पाउस
ओल्या एकांत पारात

हे ओले ओथंब क्षण
ढगी कोण अंबरले?
थंड हवेच्या झोताने
घनव्याकुळ हंबरले

मौन होई बोलके
तुझ्या बरसत्या वेळा
कोण हाकतो अंबरी
सरी पावसाचा मेळा

दे अंतरीच्या सरी
पाऊस भिजू दे
खोल ढगाच्या तळाला
थेंब चकाकी सजू दे

तुझ्या पावसाचे गाणे
माझ्या भरलेल्या नभी
कोसळत्या पावसात
तु ओल्या नजरेने उभी

आला सईचा पुकारा
ढग निघाले खुप दुर
माझ्या मनात ओथंबे
तुझ्या आभाळाचा पुर..
(Pr@t@p)
" रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
17/8/2021










Monday, August 16, 2021

कवितांचा फुलप्रहर....

या चंद्रउजेडी वेळी
पानाची होई गळती
निनाद अबोली हवेचे
वेलीला अपार छळती

पर्णगळीच्या वेळी
मी जपतो फुल ताटवे
असल्या आर्त वेळी
गीत तुझे का आठवे?

निघून गेल्या चंद्राचे
शोधावे चांदणठसे
दुर रानी पडतो सडा
निपचित मोरपिसे

तो दुर निघाला ढग
कोणाचे काळीज वाही?
एक चांदणी अस्तंगत
दुर उभ्याने पाही

रातीच्या गर्द कुशीला
आस कुणाची बिलगे?
जंगलाच्या गाभ्यातुन
बहराचा वणवा शिलगे

हे आस दाटले रस्ते
धरती तुझी दिशा
या ओढीला साक्षी
चांदसजवती निशा

रातीला हा कसला
शाप आठवणीचा लागे?
रान चालत निघते
तुझ्या पावला मागे

शब्दांच्या ताटव्याला
तुझा लगडतो बहर
मी सावडून वाही तुला
कवितांचा फुलप्रहर..
(Pr@t@p)
" रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
16/8/2021

Sunday, August 15, 2021

चंद्रफुलीच्या वेळी....

आठवणीचे चांदणे
व्यापला त्यांने माळ
चंद्रकलेसम वाढे तुझ्या 
प्रतिक्षेचा काळ

अंधूक काळ्या राती
दाटे चाहूल भिती
मोडून पडल्या फांदीला
फुले लगडती किती!

नदी उतरते अलगद
वळणाचे चुकवत स्पर्श
शब्दाला माझ्या बिलगे
आठवणीचा हर्ष

दुर दिसे एक समई
वातीतुन जळताना
चंद्र उदास पाहे
ढग मुके पळताना

चंद्र उगवता नभी
ओंजळ तुझी भरते
दुःख चकोरी आर्त
कोणाच्या नयनी झरते?

तु चंद्रफुलीच्या वेळी 
दिवे नको ना विझवू!!
ओथंबओल्या आर्जवाने
चांदणे नकोस भिजवू

दुर जात्या ढगांना
का लागे तुझा लळा?
व्याकुळ झाल्या हृदयाला
गाईच्या हंबर कळा

मालवलेल्या दिव्याला
चंद्राचा उजेड जाचे
टक्क जाग्या पापण्यांनी
अंधार कोण हा वाचे?

रातघडीचे रंग
दारात तुझ्या पडलेले
वेल जणू फुलांचे
काल ..मुक ...रडलेले...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(15 ऑगस्ट 2021)

Saturday, August 14, 2021

भेद हृदयीचा मिटे.....

तुटल्या सा-या बेड्या...
अवकाश जाहले मुक्त
हे तिरंग्या! तुझे..
रूधिरात माझ्या सुक्त

भिड ऊंच नभाला 
दे मांगल्याची छाया!
तुझ्या कारणी झिजावी
शतजन्मी ही काया

थोर गोडवा तुझा
ओठी सदा असावा
माझ्या अस्मितेवरही
रंग तुझा दिसावा

फडकत रहा सदैव
तुच आमची आशा
हर भेदाला आमुच्या
फुटो तुझीच भाषा...

तिन्ही रंग एकात्म
चक्राची त्यास गती
पाखंडाचे धर्म बुडो!
मिळो तया सन्मती!!

ऊंच तुझा रे माथा!
सारे सारे थिटे
तुला नभी पाहता
भेद हृदयीचा मिटे....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(14 व 15 ऑगस्ट 2021)

Thursday, August 12, 2021

एक गोंदण फुली....

पायतळाला चंद्र उगवला
चांदणी नभी हसते
शांत वाहत्या नदीकाठावर
चंद्रकिरण हसते

रात वाहते भाव अनामिक 
पक्षी मुक निजले
काठ उशीचे भरजरीचे
दवात ओल्या भिजले

गंध दाटतो असा विभोरी
भरून जाई दरवळ
माळ एकला मुक मुक्याने
सजवत राहतो हिरवळ

चंद्र कवडसे भेटण्या आले
खिडकी ठेव खुली
मोहरून जाईल चितारलेली
एक गोंदण फुली

पहाट फटफट पक्षी उडती
दुर देश गाठण्या घाई
स्वप्न तुझे ते भावबिलोरी
उशास भुपाळी गाई....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
13/8/2021

Saturday, August 7, 2021

शब्दांना गुलाब गंध....

हाक तडकते आर्त
झड शब्दांची होते
मुक सुरांची मुकी
मी लिहतो शब्दगीते

फुलझडीच्या वेळी 
शब्दांना बहर कसले?
तु पाहील्या पुसटवेळी 
हळुवार झाड हसले

बहराची घेवून काया
गंध पसरतो रानी
झाडाच्या पायतळाला
फुल पडे अनवाणी 

एक चांदणी हसते
उजळत ढग सुने
अंधाराच्या तपशिलाला
देत रंगरूपडे जुने

मी कृष्णभुलीचा रंग
आभाळ करतो अर्पण
निजल्या सुर्यफुलाला
सुर्याचा देवून दर्पण

चंद्र बुडून विझता
दिप असे का जळती?
वा-याच्या अंतःकरणाला
वातीचे मसले कळती

रंग उडाल्या संदूकाला
का येतो गुलाबगंध?
तु दिल्या वहीला आजही 
तुझा गुलाबी सुगंध 

बुडत्या रातीतुन
हे कसले तरंग उठती?
तुझ्या आर्त कवितेला
शब्द माझे फुटती......
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
7/8/2021

Friday, August 6, 2021

गळून पडले पंख.....

दुर दिव्याचे जळणे
वारा वाहत नाही 
धुक्याळला चंद्र ही
तारा पाहत नाही 

गर्द धुक्याला फुटते
किरणांची मंद लकाकी 
दुर डोंगरमाथी...
झाड उभे एकाकी

तु चंद्रनिजीच्या वेळी 
विलगुन फुलांचे ताटे
ओंजळीत माझ्या 
सुगंध अनामिक दाटे

पहाट ओले दव
रातराणी गंध ओला
मंद जाहल्या दिव्याला
झुळुकीने स्पर्श केला

रात झडीचे तारे
हळुच होती मंद 
ता-यांना बिलगुन जाई
तुझा अबोली गंध

वारा शिलगून देतो
उगवतीचे कोने
तुझ्या सुगंधी ताटव्याचे
उजळून लख्ख होणे

दुर भूपाळी गुंजते
कुठला रावा गातो?
थवा एकला ओढीने
कुठल्या गावा जातो?

निरोप माझे पंख
हवेत घेती झेपा
किती जाहल्या अगणीत 
तुझ्या दिशेस खेपा?

नित्य सकाळ करते
रितेपणाचा डंख
तु उचलून घ्यावे अलगद
गळून पडले पंख....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
6/8/2021

Thursday, August 5, 2021

थेंबाचा पाऊस करणे...

घननिळ बरसला 
वेगे
उसवत रेशीम 
धागे

थेंब जाहले
मन
तु बनता व्याकुळ 
घन

आस पावश्या 
झाली
मृदगंधाची दाटे
खोली

बरस असे रे
घना!
तृप्त होवू दे 
मना

मनात हिरवळ
राई
थेंबाची कोसळ
घाई 

तुझ्या ढगाचे 
झरणे
थेंबांचा पाऊस 
करणे.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
5/8/2021

रचनापर्व

Tuesday, August 3, 2021

ओल्या फुलांचे दिवे....

हलत्या झाडफांद्या
गवताचे माळ ओले
काल बरसल्या पावसाला
माती बिलगून बोले

ऊंच ऊडाला रावा
सांगावा देती फुले
पंखाला त्याच्या असती
बहर फुलती झुले

झाडाची काया अशी
पान फुलांनी डवरे
झुळुकीच्या ठायी फिरती
गंध फुलांचे भवरे

हा सुगंध अनामिक कसला
भारून जाते हवा
का उगाच जाणवे ?
तुझा नजरपाखरी थवा

दुर अंतरावरती तु 
लावले ओल्या फुलांचे दिवे
ओंजळीतल्या फुलांना 
इकडे गंध लाभती नवे

दुरदेशी एक ढग
पाऊस घेवून फिरतो
तुझ्या आभासी झुळुकीने
त्यात पाऊस शिरतो

कुठे पडावा पाऊस?
फुलास पडते कोडे
घेवून जा तु सरी
मी जपले थेंब थोडे

पावसाचे असे व्याकुळ ढगारे
इकडून तिकडे फिरती
तुझे पाऊस क्षण असे
चिंब भिजण्या उदास झुरती.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
4/8/2021

Saturday, July 31, 2021

चांद घडीचा शकून...

शब्दांच्या अंतःकरणी 
ध्यान कुणाचे लागे
जोडण्या तुला मी...
हात कुणाचे मागे?

माग कुणाचा काढत
मन निघे अनवाणी 
फुलकळ्याच्या खोल 
आतवर सुगंध ओल्या धुनी

हाक दाटले डोळे
आणिक कटाक्षाची दिक्षा
तुझ्या क्षणांना अनंत ...
द्यावी प्रतिक्षेची भिक्षा

चांदघडीचा शकून साजे
हवेस हुरहुर वाटे
रात एकल्या एकटवेळी
सय कुणाची दाटे?

रात झडीचे थेंब घेउनी
पाऊस असा का पडे?
मातीच्या काळजावर
हलक्या थेंबाचे ओरखडे

बहर असा हा उठवत जाई
मृत फुलांच्या राशी
गंध कुणाचा भटकत राही
माझ्या एकांताच्या पाशी?

थेंब जणू की अत्तर अत्तर 
सागर हो सुगंधी...
दे हाकारा!....स्वतःवरली
उठवून दे तु बंदी!

सांजप्रहरी सागर गाई
पावसाची गीते
घेवून नदीच्या अंतरातील
पात्र...भरले...रिते...!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
31/7/2021

Sunday, July 25, 2021

नदीचे प्रारब्ध.....

भरून ओथंब येत्या 
घन सावळ्या मेघा
भरून घे ओंजळीत 
पडलेल्या तृष्ण भेगा

देवून जा सरीची
चिंब ओली धुन
फांदीवर चंद्र गोंदुनी
दे त्याला हिरवी खुण

वाहत्या नदीस भेटे
मातीचे ओघळ गाणे
भिजपावसी तृष्ण
झाडाची हिरवी पाने

झर सरीचा पाऊस 
मनास ओल फुटते
काळीज नदीचे अवखळ 
हर वळणावर तुटते

दाटून येता ढग
हवेस कसली व्यथा?
तो घेवून पुन्हा झडतो 
वाहून गेली कथा

मातीला कसला गंध
सर कोणती झरते?
वाहून सारे पाणी
ढगात व्यथा उरते

कंप दाटली फांदी
थेंबाचे घेईल उखाणे
ओघळेल मातीत तो
मग समर्पणी सुखाने

तो वाहील तो पाहील
तो न बोलेल शब्द
शोधेल सागराच्या अंतरी 
तो नदीचे प्रारब्ध....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
25/6/2021

Sunday, May 23, 2021

सांजदिव्याची गीते...


दुर धुक्याचे रस्ते आणी
सांजेचे हळुच येणे
रात धुक्यावर पसरत जाई
चांद दवाचे गाणे

धुक्यात बुडल्या आठवलेणी
कसला आभास पसरे?
शांत धुक्यावर उमटून येते 
मन कुणाचे हसरे?

उडून गेले पाखरथवे
मागे शिल्लक रस्ते
डोंगरमाथी गडदराती
पुनव चकाकी दिसते

किती लिहावे आठवगाणे
धुक्यात शब्द विरती
शब्द गिताचे सांज धुसर
अर्थासाठी झुरती

दुर डोंगरी साजन वेळ
वाट कुणाची पाही?
वारा असला भलत्यावेळी
गंध कुणाचा वाही?

धुक्यात बुडल्या फांदिला
ही कसली बहर फुले?
उडून जात्या पाखराला
आकाश असते खुले

वाट निघाली अस्ताला
चंद्रउगवत्या वेळी 
कोण मुसाफिर पसरून धरे
चांदण्याची अंधूक झोळी?

दुर दिशेला एक खिडकी
हवेस खुली भेटते
त्या खिडकीला चांद उगवेल
असे उगा का वाटते?

धुके मुक्याने झरून जाई
रात बहरत जाते
खिडकीच्या अंतरंगी मग
सांजदिव्याची गीते
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
23/5/2021

Saturday, May 15, 2021

पुनव चांद....

हवेत उडतो सुगंध
बनून सांज धुळ
मी चंद्रकोरीच्या हृदयी
शोधतो तुझे कुळ

हा पसरला माळ
ही तप्त मातीचे असणे
मी वळिवाचे थेंब घ्यावेत
तुझ्या आभासातुन उसने

हा पोपटथवा निघे 
कुठल्या दुर देशी
वारा थबके क्षणभर
न ओलांडता गाववेशी

दुर निरंजन लकाके
संध्या समय साजरा
खुण दाटते नयनी
संधेत बुडाल्या नजरा

मी चांदण्याचे लामणदिवे
आभाळास भेट देतो
पारिजाताच्या फांदिवर 
मग चंद्र थेट येतो

तुझ्या निरंजनाचे कवडसे
चंद्र सोन्यात सजतो
चांदण्याचा जिव मग
फुल दवात भिजतो

अंधार हळुवार वितळे
चांद ठिबकता मनी
तुझ्या चांदण्याखाली
मी प्रकाशाचा हो धनी

सांज भुरभुर वाहे
चांदण्याचा आभास
चंद्र निरखुन घेतो
मुक्त शितल नभास

कधी चंद्र बनून ये
खिडकीच्या गवाक्षी
रेखु दे तनावर तुझ्या
शितल चांदण नक्षी

मनीचा चंद्रध्यास
आभाळास भिडतो आहे
चंद्रकोरीत निमुळत्या
पुनव चांद घडतो आहे....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
15/5/2021

Friday, May 14, 2021

ओंजळीतले लिली फुल....

चंद्र जणू हा
प्राषूण सोने
उजळत राही
अंधार कोने

ढग जणू की
भुल मंतर
सांधत राही
अवनी अंतर

सांज जणू की
बहर माया
रातीस बिलगे
चांदण काया

शब्द जणू की
व्याकूळ ओवी
चंद्रसुरातुन 
आर्त गावी

तु जणू की
सांज हाकारा
पाखरचोची
धुंद पुकारा

मी जणू की
एकट फुल
सांजरंगी
काहूर भुल

नजर जणू की
गीत पारवा
पुकारणारा
सांज गारवा

आठवण जणू
झाड फुले
फांदिवर लगडती 
स्वप्न झुले

झुळुक जणू की
स्पर्श आभास
चंद्र बिलगे
निल नभास

सांज जणू की
तुझी भूल
ओंजळीतले
लिली फुल.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
14/5/2021

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...