Sunday, July 31, 2022

अजब खेळ


पेशीच्या फुलावर
रंग तुझे लागले
स्वप्न तुझे आर्जवी
उशास राती जागले

चंद्र सांडला असता
आसवांची कसली तमा
रात मागते जागत्या
चंद्राची व्याकुळ क्षमा

को-या पानाच्या गंधास
बाधते तुझे नसणे
मी गझलांच्या अंतःकरणी
हुरूप आणतो उसने

मांडव सजे चांदण्याचा
गवाक्षातुन रंग सांडतो
मी दुःख तमाचे गर्द
मातीवरती मांडतो

मातीचे काळीज रडते
भोगत आठव भोग
रातवा कळवळ्याने
मागतो तुझा जोग

झोळीत तुझा आभास
रिते माझे अक्षयपात्र
अवरूध्द शब्दात माझ्या
अंधार उजळतो रात्र

रोज पहावी वाट
अशी तु चांदणवेळ
एकटाच हरतो जिंकतो
आठवणींचा अजब खेळ....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३१ .७. २०२२








Saturday, July 30, 2022

स्पंदते तुझ्या उरी


हे असे कसे ?
तुझी सभोवार दरवळ
जणू लगडते मातीला
पावसा नंतर हिरवळ

तु जाता जात नाही
पाठलाग घेवून हाती
चंद्र जणू सजतो
एकांत आभाळमाथी

येशील कधी तु इकडे?
या रस्त्यास काय सांगू?
प्रतिक्षारत हा जिव
सांग कुठे मी टांगू?

झाले ना आता?
जिव किती हा झुरतो
चातक कधिचा तृष्ण
भरपावसात फिरतो

घे पदरावरती ढग
दे त्याला संध्याछाया
मी येऊ भरून पुन्हा
अंतरी तूझ्या झराया....?

दे ढगास माझ्या हात
पाऊस पडू दे सारा
मी गिणती कशास ठेवू
कोसळताना धारा

चिंब होऊ दे सारे
वाहू दे नभ सरी
मी तोच तो !
जे स्पंदते तुझ्या उरी

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७.७. २०२२







हसरे चांदणे कर


निरंजनाच्या वातीचे
मंद असे ते जळणे
गाभा-याचे मागाहून
प्रसन्न असे उजळणे

देवाला कसली आच
वात एकली जळते
दुःख तीचे का कोणा
शिखराला आपसुक कळते?

मीही लावतो दिप
नित्य तुझ्या दिशेला
प्रकाश अलवार साचतो
निद्रिस्त तुझ्या उशीला

या साचल्या अंधाराला
अर्पाव्या किती वाती?
या फुलांच्या राशीही
निर्माल्य नित्य होती

कळु दे तुलाही थोडे
वातीचे जळून घेणे
समजावे तुझ्या पावलांनाही
माघारा वळून येणे

तु दान कशाचे द्यावे?
कसला मागू वर?
दे शब्द माझे उजळून
त्यांना हसरे चांदणे कर..!!


(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९.७. २०२२












अनंतापार...

हवे असेलच तुला तर
घेवू का दगडाचे रूप?
नकोत मग प्रतिक्षा फुले
ना आर्जवाची धुप.....

तसा ही मी भासच
अनाहूत पसरलेला
की किस्सा बनू अव्यक्त
सहजी विसरलेला?

की होवू आभाळ रिते
ज्यास अंत ना पार?
नको मग ओथंब
ना अश्रुंची धार

की होवू असे काही ?
जे नसेल तुजपासून विभक्त
जसे.. वाहते जिवन
धमन्या मधूनी रक्त

असेही होता येईल
जणू तु तुझेच असणे
आतही अस्तित्व माझे
आणी अनंतापारही दिसणे....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२०.७. २०२२








गर्त


असं अव्यक्त होऊन
मी नित्य वाहतो
रात्रीच्या अंधाराखाली
एक भुगर्भस्त...आणी
मुक झरा बनून...!

शब्दांचे माग काढून
तु अनंत ओलांडत
शब्दांच्या तळामुळातला
हा झरा घेतलास
अलगद ओंजळीत..
आणी दिलंस त्यास
अनंतावर पेरून...

तुला नसेल ज्ञात
माझ्या शब्द खळाळाचे
तसंही कोणाशी सहज
सख्य नाही होत...!
त्यासाठी हे गर्त
पाताळ ओलांडत
यावं लागतं
माझ्या प्रवाहाजवळ....

सांग!
हा आर्त टिपण्यासाठी
तु एवढं गर्त
का उतरावंस....?

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२०.७. २०२२










लांबता लांबत नाही


आताशा कुठे
ढग जमा होतायत
ओथंबून...

अजून त्यांना
पाऊसपण यायचंय

चकाकतील विजा
होतील गडगडाट
म्हणून का ढगाने
पाऊसपण विसरायचं?

येवू दे भरून अवकाशी
ही गर्द काजळमाया!
काय माहित किती युगाचे
धरतीऋण पावसाला
फेडायचे असेल.....?

सारे चातकही आता
बोलतायत मोरांशी
काळीजगुज....
ही मातीही
धारू पाहत आहे
पावसाचा बरस

काय माहित
ती काय उगवू
पाहत आहे
अंतरात......

तुला माहिती आहे
सृजन तसंही
थांबता थांबत नाही
आणी.....
भरल्या मेघांचा बरस
लांबता लांबत नाही..
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१.७. २०२२





मितवा...


बासरीत दाटून येते
राधेचे उमलगाणे
का व्याकुळ जिव होतो
झाडाहून तुटता पाने?

दुर चांदघडीला
कोण शोधते वाटा?
सावरून श्वासाखाली
निःश्वासाचा बोभाटा

साद दिली ना तरी
कोणाची बोलवे हाक?
का स्तब्धत नाही मुठीत
काळाचे व्याकुळ चाक

हे हंस मनाचे जाती
पिंपळाच्या डे-यावरूनी
प्रत्यंचा कोण ताणतो
पुन्हा पुन्हा फिरूनी?

हा बिलग विलग ना होई
स्मरता तुझा रातवा
तारण तुला मन माझे
चांदण्यातल्या मितवा..


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१.७. २०२२





मुक पुकार..


मी तुटले तार विणेचे
सावरू किती वेळा?
किती अनुभवू आभासातुन
तुझ्या अस्तित्वाचा ठोकताळा?

सारेच धुसर दिशदिशाना
होईल कधी साकार?
स्वप्नांना कळवळ्याच्या
असतो का आकार?

तु आभास भवतालचा
अस्पर्शी निराकार
मी निनादून तुला भारणारा
मुक..आर्त...पुकार....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३० .७. २०२२




काळीज धावा


पाखरे कशास धाडते?
तु ये ना भेटावया
मी कितीदा एकट उमलू?
फांदीवरून तुटावया ....

ते देतात तुझी खुशाली
खिन्न सुरातली......
मग मी ही कविता त्यांना
सोपवतो उरातली ......

घेवुन माझे शब्द
ते निघती तुझ्या गावा..
वेशीत भेटावा त्यांना
तुझा काळीज धावा.....

༄᭄प्रताप ࿐
 
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३० .७. २०२२

Thursday, July 28, 2022

फुलवाटा ....




सर्वात शेवटी वाहुन
होते फुलही  मुक्त
तेथून मग उमटते
समर्पणाचे सुक्त

होतो प्राण व्याकुळ
अर्ध्य त्याचे जाता
श्वासांच्या भासासाठी
गलबलताना माथा

रिते होऊन निघता
मी पुसत माग निघतो
तुझ्या लाटात बुडणारे
मी माझे फुल बघतो

या फुलांचे गंध कधी
प्राशून तुझ्या लाटा
सोडतील किनारे बहुधा
शोधण्या फुलांच्या वाटा  .....
       (प्रताप)


          "रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
         २९.७.२०२२



आर्त धिराने


डोळ्यात लकाके पाणी
मनास कसली धाव?
मी तु की? तु मी?
लागत नाही ठाव

दिठीस दे अलिंगन
जसे कुळ भेटते
झाडास मनाच्या माझ्या
तु मुलाधार वाटते

धाडून दे ना इकडे
बहराचे व्याकुळ रावे
गंध फुलांचा इथला
मी जततो तुझ्या नावे

मी ही बिलगुन येईन
तूला अनावर उराने
मी चालू कुठवर निर्वात?
नसणा-या आर्त धिराने...

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८.७. २०२२








Friday, July 15, 2022

आस..


दोन स्पंदनाच्या लयीत
उमटतो एक भाव
स्वप्नांना शोधत येतो
तुझ्या मनाचा ठाव

पसरून सारी स्वप्ने
मी शोधतो तुझ्या खुणा
हातास मग लागतो
ऋणानुबंध तो जुना

मी अनावर वेळी
स्पर्शतो तुझा भास
देतो नभात पेरून
मग ओली एक आस

पाऊस होऊन आस
तुझ्या घरावर दाटते
आभाळाचे काळीजही
कुंद होऊन फाटते

आस पेरते ओल
आभाळ मंद विरते
बंद तुझ्या नयनी ती
रातव्यात नित्य झरते

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५.७. २०२२








सांयतारे....

सांजपावसावेळी
मी गाऊ कुठले गीत?
तु शिकवत असता मजला
दुराव्याची नाजूक रित

मी आठवत असता तुजला
हा भिजपाऊस पडतो
ढग अनोळखी कुठला
कुठल्या मातीसाठी रडतो

वारा दरीत घुमतो
पाऊस वा-यावर फिरतो
ढग तुझ्या आठवणीचा
एकला संथ झुरतो

थेंबास कसला भाव
असा बिलगून येतो
ढगात पाऊस अनाहूत
बेभान शिलगून येतो

तो कोसळे होऊन धारा
मातीला ओल देतो
भाव तुझ्या मनाचा गहिरा
गर्त खोल होतो

तु शोधून घे ना मुळ
पावसाच्या माझ्या सारे
दुर अंतरावरचे बघ
ओलावले सांयतारे!


(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५.७. २०२२




बहरून दाटे


मला उमगते काही
तु शब्दही न बोलता
काहीच हिशोबी नसते
जगरहाटी तोलता

तरीही देतो सारे
शिल्लक बाकी नाही
हिशोब हे बेहिशोबी
देतात अचूक ग्वाही

चांदणे जसे अगणीत
तसेच आभाळ सर्वत्र
कोणाचे कोण आपण?
कोणते निभवतो पात्र?

आत्म्याचे दुभंग संपले
एकात्म सारे वाटे
जणू आभाळाच्या कुशित
चांदणे बहरून दाटे....


(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.७. २०२२

व्याकुळ जागवे



सा-याच कळ्यांना गंध
तुझ्या फुलांचा कसा?
दे भरून आभाळाला
चांदण्याचा शुभ्र पसा

हा आठवणींचा मोर
पाहे नक्षत्र नभी
ही वाट चांदण्याची
चालण्या दुर उभी

दगडातला मुर्तिभाव
कोण देईल आकार?
या निर्वातात कसले
घोंगावती आर्त पुकार?

नभाआडचा चंद्र
गातो व्याकुळ गझला
कोणता उसासा दिर्घ?
अनावर घडीत निजला

व्याकुळाचे बन सजले
मुरलीचा सुर वाहे
चांदण्याच्या पदराखाली
आभाळ मुक वाहे

असतो नभाला जणू
दुराव्याचा प्राचिन शाप
उगवून चांदणे वाटते
तमास उजेडी उ:शाप

अशा उजेडी वेळी
नक्षत्र हळुवार उगवे
हे कसले तुझे गीत?
रातीस व्याकुळ जागवे?

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.७. २०२२







हळवे गाव....


कसले हे भास
स्पंदनात दाटून येती
आत्म्यापार स्वप्ने
तुला भेटून येती

चल युगापल्याड जाऊ
काळाचे खोलत प्रस्तर
देवू त्यास अनंती
सहअस्तित्वाचे अस्तर

तुझ्या साजणसमयी
मी सुर समर्पी छेडले
जेंव्हा प्रण दुराव्याचे
अनाहूत आपण सोडले

नभास या रंग
चांदण्याचा तुझ्या लागे
शब्द निघती लगबगीने
तुझ्या पावला मागे

घे ओंजळीत बिलगुन
हे निशिगंधी माझे भाव
या शामल चांदण्याखाली
स्वप्नांचे हळवे गाव...

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१३.७. २०२२



अढळ ध्रुव


तुझ्या सांजदिव्याला
पाहून पक्षी येतो
चांद आभाळाचा
चांदणनक्षी होतो

असे आभास तरीही
तु साकार उभी पुढे
रातीच्या अनवट वेळी
निशीगंधाचे पडती सडे

गंधमाग घेत वारा
दिशेस तुझ्या रमतो
मी शिळ रातपक्षाची
अवकाशी बनून घुमतो

दे प्रतिशिळ मलाही
कधी उजळ चांदणराती
शब्द माझे त्याच्यासाठी
अढळ ध्रूव होती.....

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१३.७. २०२२❤❤





चांदणभास

परतलो रित्या हाती
मागे काय राहिले?
ते फुल असे का हसते?
जे राऊळी वाहिले

तु गाठ राऊळ तळ!
भेटेल तुला तुझेपण
दे अर्पूण पुन्हा तुला
माझ्यातले हे तु पण !

मी विभक्त होत नाही
अशा एकट भाववेळी
मी वेदांना देत असतो
अमिट माझ्या ओळी

तु वाच माझे स्तवन
बन पावन आरती
बनतील भाव माझे
तुझ्या प्रवाहाचे सारथी

मी उदास होत नाही
ओसंड माझा वाहतो
चांदण्याचे रूप साजर
माझ्या चंद्रतळात पाहतो

मी उचलून आभाळ देतो
तुझ्या चांदण्याला
मी हळवी शपथ होतो
तुझ्या गोंदण्याला

मी नाही विझत कधी
तु मालवताना दिवे
मी प्राचिन युगाचे स्वप्न
पडणारे नित्यनवे

मी करत नाही दावा
ना दर्शवतो माझी आस
माझ्या लकाकीस पुरेसा
तुझा चांदण भास....

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२.७. २०२२






साऊलमिठी

आभाळ दाटते अवचित
चांदण्याच्या उत्सुक दिठी
शब्दास हळुवार पडते
कवितेची साऊलमिठी




(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२.७. २०२२









Monday, July 11, 2022

भाव...

येतात तुला हाकांचे
पक्षी भेटण्या दुर
कसला पडे पाऊस
त्याला ओला ओला पुर

वाहते तुझे मनोगत
येते माझ्या कडे
कि भाव असा आर्त
थेट काळजा भिडे

होता अनावर सारे
ढग हळुवार झरती
माझ्या मनास बिलगे
तुझ्या मनाची भरती

मी होई चिंब झाड
थेंबाचा होई पाझर
दृष्ट दिगंती माझी
भेटते तुला ओझर

मी बंद करून डोळे
घ्यावा तुझा ठाव
पापण्याआड तु येवून
निरखुन घे हा भाव!

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.७. २०२२





निर्जन रस्ता...


क्षितीजाची वेळ मिटता
चांदणे हळुवार निघते
वाट त्याची आभाळ
व्याकूळ होवून बघते...

शब्दांना भरते येते
आभाळ होते खुले
निघण्यापुर्वी चांदणे
फुलवून जाते फुले

मी अडवत नाही कधी
चांदण्याचे निर्जन रस्ते
चांदणेही ढगासाठी आर्त
वाट अडवून बसते...

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.७. २०२२




Sunday, July 10, 2022

आभाळ..


आभाळासही असतो जिव...तेही तुझ्या माझ्या सारखं !!...रानावनावर हरखणारं..डोंगरमाथी थिरकणारं..मातीसाठी तगमगणारं.. चांदणओटी झगमगणारं...धरतीसाठी झरणारं...वा-यावरती फिरणारं....ते धरतं प्राण तुझ्या माझ्या माथ्यावर....कधी चांदण्याखाली... कधी अंधारात ते शोधतं त्याचं चांदणमुळ...ते चांदणं धारून घेतं..कधी मन मारून घेतं..ते तगतं ते जगतं...कधी स्तब्ध होऊन ते तुझ्या शहराच्या डोंगरमाथी थांबतं...उघडेल तुझ्या खिडकीचे दार आणी पडेल त्यावर तु पेटवल्या दिव्याचा प्रकाश म्हणून....खरंतर तो प्रकाश पेरायचा असतो त्याला अनंतावर.....ते हिरमुसत नाही तुझ्या बंद खिडकीवर ते तुझा चांदणआभास घेवून निघतं....वारा तसाही त्याला लोटत असतो..अज्ञाताकडे.....
ते झोपली गावं पाहतं...ते जागते पक्षी पाहतं...ते निजल्या जंगलाचे अदमास घेत येतं अरण्यावर...आणी एखाददुकट निशाचर त्याला पाहत निघतो प्रवासास...आभाळ काही बोलत नाही...ते चांदणआसी मनानं हळुवार चालत निघतं....ते व्याकुळ आठवणीत ओथंबतं..ते घनव्याकूळ होवून झरतं...ते विजात अनवाणी फिरतं...ते उतरतं मोरपिसावर...आणी मातीला स्पर्श करतं....ते झाडातुन उगवतं...ते हिरवाई तगवतं....ते जातं तुझ्या मुळ गावी..ख्यालीखुशाली देतं...गडकिल्ले,मंदिर,दर्गे..तु आल्या गेल्यावाटा..तु स्पर्शिलेले झाड झुडूप सा-यांना दुरून पाहतं...
आभाळ तुझी ओंजळ होतं.....आभाळ तुझ्या प्रार्थनारत हाताचे दुवे बनून...तुझ्या चेह-यावर पसरतं...आभाळ तुझं हसरं स्मित पाहून अवकाशही विसरतं...आभाळ हसतं..आभाळ रडतं....आभाळ एकाकी कुढतं..आभाळ आर्त जिव बनून तुझ्यावरती जडतं.....तुझ्या तळहातावर ते प्राजक्त बनून पडतं.....तुझा आर्त भाव घेवून ते शब्दांनाही भिडतं....तुझ्या आभासी पाखरपंखावरून दुरदेशी उडतं.....

ते थकतं...शेवटी तुझ्या कुशीला येतं.....तुझ्या हस्तस्पर्शाने...ते हसरं चांदणं होतं....

आभाळ येतं...जातं...
आभाळ तुझे गीत गातं...
आभाळ मग निभवतं तुझं चांदण नातं.....


...प्रताप ‿✶
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१० .७. २०२२

आत्मबोधी शोध


तुझा 
शोध
आत्म-
बोध

(प्रताप)
९.७.२०२२

सृजनमोल


असे बरसते काही
त्वचेस पांघरणारे
हे थेंब शहारे बनती
मनात झांजरणारे

कोसळ चालला दुर
सागरा अलिंगन देण्या
मी ही कोसळुन घेतो
विशाल सागर होण्या

ही झड कसली चाले
ओल्या आभाळाखाली
थेंब शोधतो व्याकुळ
मातीची सृजनखोली

ढगाच्या गवाक्षातुन
मी ओळख माझी सांडतो
भाव मनाचे माझ्या
तुझ्या अंगणी मांडतो

हात घेवून खिडकीबाहेर
थेंबाशी क्षणभर बोल
तुझ्या स्पर्शाने पावसाला
येईल सृजन मोल.....


(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१०.७. २०२२


शुभसंकेताचा तारा

पुर्वसंचितातली कविता
मी दिली आभाळा आंदण
आभा तीला देते
अलवार उगवलं चांदण

अर्थ तिचे लावता
अवकाश व्यापून उठतो
अन् तारा शुभसंकेताचा
तुझ्या दिशेला तुटतो....


(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९ .७. २०२२

ओला ग्रंथ

आला बघ ढगाला
व्याकूळ सरींचा पुर
थेंबात निनादे रूनझून
माझ्या हाकांचा सुर

धरतीला सुचती ऋचा
ओला ग्रंथ कुठला?
की बांध मनाचा माझ्या
धो धो कोसळत फुटला..

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०९ जूलै २०२२




चांदणकविता

निखळ चांदण्या खाली
मी शब्द तुझे वेचतो
संभवाचा पसरून पिसारा
भाव मनात नाचतो

एक पंख त्याचे कोसळे
मन व्याकुळ गाते
हळव्या त्या गीताची
चांदणकविता होते

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०९ जूलै २०२२




सुटल्या कवितेचे नाव

देशांतर माझे थकले
शोध किती हा घेवू?
शोधत असता तुजला
शोध तुझा का होवू?

कळतील हाकांचे अर्थ
वर्तेवर उमटवत चिन्ह
पाऊस जेंव्हा कोसळेल
होऊन ढगावर खिन्न

उमटून येईल जेंव्हा
इंद्रधनूचा बाक
रंग मुठभर त्यावर
उधळून तु टाक

रंग तुला भासतील
माझे शब्दभाव
देवून टाक त्यांना
सुटल्या कवितेचे नाव....

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०९ जूलै २०२२





बरस....

तुझ्या आठवणींच्या विरूध्द
मी उभे करतो आहे
घनघोर निश्चयी पहाड
पण.....
हा तुझा भिजपाऊस
त्यावरही कोसळतो अव्याहत..

आता पहाडावरही तुझ्या
आठवणीचे बन मुळ धरून
बनेल एक जंगल...
आणी त्या जंगलात
येतील तुझ्या स्वप्नांची पाखरे
हसरी शिळ घालत......
ते आणतील तुझे रंगीत
निरोप आणी मग
जंगलही स्वप्नाळेल....

रहा बरसत.....
तसं ही मी तुझ्या पावसाचं
काहीच करू शकत नाही...!!

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०९ जूलै २०२२






सिगल

कशी चितारू अवकाशी
तुझी चांदण नक्षी?
झाड मुक एकले
उडून जाता पक्षी

दुर निघाले गलबत
उंच उभारून शिडे
दुर तिकडे काठावरती
कोण हमसून रडे?

डोलकाठीच्या टोकावरती
कोणता निरोप बसतो?
दिपस्तंभ हा जखमेचा
माझ्या दर्यावरती हसतो

हे कोणते वल्हवगीत
हवेत ऊंच फिरते?
दुर किना-यावरती
मन कुणाचे झुरते?

येईल असे का वाटे
भेटीस तुझा किनारा
मी कापत पुढे निघतो
माझ्याच काळीजधारा

हा अनंताचा प्रवास
जिव सागरा वरती
तुझ्या निर्वातामधूनी
आर्त माझे निनादत फिरती

आलाच सिगल किनारी
दे एक जखम तु त्याला
सागराच्या गाभ्याखाली
जिव..गर्त...विशाल..ओला
(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०८ जूलै २०२२







नाममात्र...


उचंबळाची आवर्तने
ढळतात आवेगी वेळी
शब्द संन्याशी होती
पसरून अपेक्षा झोळी

बहरभराचे पाणी वाहे
ढग निनादून झरतो
हा कुठला भाव तुझा
अंतरात माझ्या फिरतो?

रोमातील आर्त हाकांचे
अन्वयार्थ कशाला लावू?
प्रदिर्घ अंतराळात फिरता
कुठल्या दिशेस जावू?

दे हाक! चांदण्याची
हे शब्द बनोत नक्षत्र
तु होवून काव्य माझे
मी उरावे नाममात्र.....



(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०८ जूलै २०२२






निराकाराचा साकार

तु प्रत्ययास यावं
असं कुठलंच चिन्ह
आसपास दिसत नाही
कुठलाही संकेत
कुठलीही खुण
तु या ढगावर
डोंगरावर
माळावर
ठेवली नाही...

तुझे अदमास घेत
मी फिरतो आहे
आदिम काळापासून
कुठल्यातरी गुहेत
तु एखाद्या उत्सूकवेळी
चितारले असेल एखादे
अमिट रंगाचं चित्र..
किंवा उत्खननात सापडेल
तुझा एखादा शिलालेख
अगम्य भाषेत तरी...
एखादी प्राचिन मुर्ती
जी जपून ठेवेन मी
घराच्या मध्यभागी...
पण .....
तुला धुसर रहायला
हवंच आहे.....
रहा...

मी ही माझा शोध
नेईन तुझ्या
अंतिम रोमापर्यंत
तुझ्या अनोळखी
गडदपणावर
तुझा आभास कोरंत.....
होशील कधीतरी
तु साकार...
आणी मी मग
लिहीन तुझ्यावर
एखाद महाकाव्य....!

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०७ जूलै २०२२



नजरेचा ऊर....

या निराकार धुक्यावर
चितारू तु? तुझे असणे
की घेवू झडती त्याची
वा भोगू तु नसणे....?

मी भांडत नाही त्यास
त्याचीच मला संगत
या निरंगी धुक्यास देई
आभास तुझा रंगत

तु निराकार माझ्या
शब्दास आकार देशी
भाव घुटमळे माझा
तुझ्या कवितेपाशी

पाहीन जेंव्हा तुला
युग दाटून येईल
की उर माझ्या नजरेचा
अलगद फाटून जाईल.....
(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०७ जूलै २०२२









Tuesday, July 5, 2022

भाव...


पान तुझी ओंजळ
त्यावर माझे भाव
फांदीवर तुटल्या फुलाची
पानाच्या कुशीत धाव

तो बिलग करतो घट्ट
पाऊस असा ओला
कृष्णकमळाच्या पाकळीचा
भाव...राधा..झाला..


(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०६ जूलै २०२२


आर्त उभी

उतरावेत तुझे नभ
कधीतरी माझ्याही गावी
की तुझ्या ढगांची माझ्या
मातीशी भेट व्हावी

व्हावे सृजन ऐसे
शिवार व्हावे हिरवे
बहर तुझे साजिरे
मी मनात माझ्या गिरवे

पाऊस तुझे अनवाणी
निघती अनवट वाटे
खुण त्याच्या पावलाची
मनात माझ्या दाटे

मन व्याकुळ होते तैसे
भरून ये तु नभी
ही वाट पावसासाठी
कधिची आर्त उभी.....

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०६ जूलै २०२२






मनसुबे

घनभारी पावसाचे
मेघ असे का उभे?
भिजवणे कंच की...
वाहून देण्याचे मनसुबे?





(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०५ जूलै २०२२


कवितेचा हक्क

उतरतात तुझे
मयुरथेंबी ढग
मनाच्या कातळावर
आणी देतात
कंच ओली चाहूल
माझ्या शब्दांना..!!

भिजून वाहत्या
निराकार शब्दांना
मी करतो प्रयत्न
तुझा आकार
देण्याचा...

ते वाहतात
तुझ्या रानावनातुन
तुझ्या घरखिडकीवर
तुझ्या पाऊल रस्त्यावर
जिथे जिथे तुझी
नजर टेकते तेथेही

आणी झिरपून स्वतः
देतात ते तुझ्या
मातीला मोल
येतात ते उगवून
झाड बनून
तुझ्या दिशेने येत्या जात्या
पाखरांचे होतात ते आधारवड
आणी तेच होतात
माझ्या मुक मनाचे
संदेशवाहक...

तुझ्या शहराच्या
डोंगरकुशीत जर
रेंगाळलाच एखादा ढग
विनाकारण तर ...
दे एखादा संकेत ओला
बरसेल तो ईकडे
माझ्या कवितेवर....
आणी येईल वाहत
तुझ्याच दिशेस...
तसाही तुझ्या
ढगावर माझा
फक्त कवितेचा हक्क....

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०५ जूलै २०२२






चांदण नुर

तु कोरत रहा तुझेपण
माझ्या शब्दास दे नक्षी
अंधार उजळत्या चांदण्या!
चकोर तुला बघ साक्षी

शांत निवाल्या मनात
तु शब्दांना बिलगुन ये
लक्ष दिव्यासम कांतीने
अलवार तु शिलगून ये

सार मनाचे तम
दाटल्या एकट राती
दे मनास ऐसे मंथन
अमृत लागो हाती

तु फुलते निरव राती
जेंव्हा जग शांत निजते
चांदणे तुझे फुलबहरी
शब्दात माझ्या रूजते

निघती शब्द तुजकडे
खिडकीला स्पर्शतो वारा
निरोप घेता मागपावली
कळवळतो मग तारा

मी येवून पुन्हा बसतो
तूझ्याच चांदण्याखाली
शोधत माझ्या शब्दांची
भावगर्भी व्याकुळ खोली

अर्थ तुझे नव्याने...
चांदण्याला येतो पुर
शब्द उजेडी होती
तुझा घेवून चांदण नुर...


(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०५ जूलै २०२२













शब्दांचे तारे

चांदण्या!!


निरोप तुझा देवून
थवा दुर पांगला
तुझ्या आभाळी दानासाठी
चंद्र नभी मी टांगला

तुझा न ठावठिकाणा
अंतरिक्ष कुठले पाहू?
की बनून व्याकुळ वारा
तुझ्या दिशेस वाहू?

स्पर्शिल तुजला वारा
मग आठवून येईल सारे
मग माझ्या आभाळी उगवतील
तुझ्या शामल शब्दांचे तारे....

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०३ जूलै २०२२





तृष्णेचे कोडे

अशा सांजवेळी येते
आठवणीची सय
मग कवितेस मिळते
तुझी अंधूक लय...

हा मोह कसला दाटतो?
भान हरपते थोडे
झाडाखाली हसतो बुद्ध
सोडवत तृष्णेचे कोडे

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०३ जूलै २०२२






Sunday, July 3, 2022

अनोळखी होण्या अगोदर...

तुझे शहर तसे आता
मला कदापिही
अनोळखी वाटत नाही
रोजच मी फिरतो तिथे
स्वतःला शोधत....

मी असतो
रेंगाळत तिथे
तु जाते त्या
तळ्याकाठी
कधी महावृक्षाखाली
कधी अवकाश जवळून..

कधी तुला पाहणारा
पिंगळाही हसतो मनोमन
माझ्या कडे पाहत...
आठवतात तु उचललेले
नुकतेच झडले प्राजक्त
सकाळच्या प्रहरी ...
तु दिलेली शुभ्र हाकही
मी भुपाळी मानतो

तुझ्या घरावर
दाटून येणारा पाऊस
येतही असेल कधी
माझी वार्ता घेवून...
कधी तरी तु
आर्त होऊन
होशील चिंब
या आशेवर...

तुझे वाचनालय
तुझी रोपवाटिका
सारे लख्ख दिसते
जेथे असतो तुझा
चांदणगंधी वावर...

तरीही एक काम कर
भेटलोच कधी मी
तुला एखाद्या वळणावर
हरवलेला
तर देवून टाक
माझ्या शहराचा पत्ता मला
माझं शहर
मला अनोळखी
होण्याअगोदर...
(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०३ जूलै २०२२





ताटातुट

भेटावं म्हणतोय
स्वतःशी
खुप दिवस
झालेत
ताटातुट
होऊन...!!

म्हणूनच तु
यावंस क्षणभर
समक्ष....
म्हणजे
तुझ्यातील
मला भेटता
येईल
कडकडून

माहितेय...?
त्याचवेळी
हरवलो होतो
मी ....
जेंव्हा
तुला
पाहिले होते.....


(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०२ जूलै २०२२

Friday, July 1, 2022

चर्चबेल

मी निघतो अंतरी शोधत
तुझी आत्माबिलग वेल
दुरवर निनादत असते
त्यावेळी..चर्चबेल.....

मी हसतो मुक एकला
हे कसले दैवी पुकार?
भासाच्या माळरानावर
स्वैर स्वप्न निराकार....

मी आकार देत नाही
तुझ्या स्वप्नांचे ढग
नयनात माझ्या साचते...
तुझे सारे व्याकुळ जग

होता अनावर सारे
ढग तुझे मंद झरते
कोण अशा व्याकुळसमयी
कोणाचा धावा करते.....

तु येता येत नाही
तरीही पेरत राहतो सुर
हा निनाद चर्चबेलचा
तिकडेही निनादे..दुर

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०२ जूलै २०२२
ग्रेस सरांचे ऋण.......









गुलाबी सय

तुझ्या गुलाबी तळहाती
प्राजक्त शहारतो अंग
पांढ-या त्याच्या तनास
बिलगे गुलाबी रंग

रंग गुलाबी झरतो
माती चिंब ओली
ही बहरघडी स्पर्शाने
सय गुलाबी झाली

मी पाहतो रूप तुझे
जणू गाभारा भरलेला
तु भाव असा मनी
मातीत पाऊस झरलेला

तु नित्य सकाळी बहर
प्राजक्तांचे पाहते
तु गेल्या पावलावर
मन माझे व्यापून राहते

तुझ्या पाउलठशाचे प्राजक्त
अंगणी माझ्या येवो
तुझा ओंजळीचे झाड
माझे फुल होवो

निर्धास्त तुझ्या ओंजळी
नसे निर्माल्याचे भय
तु घेतल्या प्राजक्ताला ये
हळवी गुलाबी सय....
(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०१ जूलै २०२२












शब्दांचा शुक्रतारा...

चालत निघाला आत्मा
तुझे बैरागी बन
मनात माझ्या साचलेले
मयुर पंखी घन

मी गीत तुझे चितारे
घनाच्या ओथंब घडी
पाऊस तुझ्या आभासाचा
देई सांजवेळी दडी

मी माग ढगाचा घेतो
ते शहरावर तुझ्या थांबले
पाऊस माझ्या हिरवाईचे
असे दिर्घ लांबले

दे सरींचे ईकडे दान
बनून पाऊस सरी
की मृग पेरता व्हावा
तुझे स्पंदन माझ्या उरी

तु वहावे माझ्या अंतरी
बनून उधाण पाणी
मनात माझ्या घुमती
पेरणीची लावणगाणी

तु पेरावे असे काही
मृगात या साली
शब्दांनी माझ्या बिलगावी
भिजली माती ओली

मुळ असे धरावे
येवोत हिरवे बहर
मी झेलून घ्यावेत अंगी
तुझ्या आभासाचे प्रहर

येशील का अशा वेळी
होऊन पाऊस धारा?
की चिंब होईल ढगाआड
शब्दांचा शुक्रतारा......
(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८ जून २०२२










पुकार....


पुकारावे आर्त की
रहावे उगा शांत?
की मुक सजवून
घ्यावा आतला आकांत?

नसते शिल्लक काही
सारे वाहून देता
नजरेशी बिलग न होण्या
अधोमुख हा माथा

शांत हृदयातली आवर्तने
मोजती स्पंदनाचे गर्त
तरी शांत शामल वेळी
बहरे सुर हा सांजार्त

यावे न यावे गोकुळी
कशास द्यावी बाधा
मथुरेच्या मध्यभागी
उभी ठाकते राधा

सांज परतते गोठी
गायीचे हंबर पसरे
मी जोजवून घेई
नित्य दुःख हे हसरे....

þrå†åþ☂
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८ जून २०२२

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...