Sunday, July 3, 2022

अनोळखी होण्या अगोदर...

तुझे शहर तसे आता
मला कदापिही
अनोळखी वाटत नाही
रोजच मी फिरतो तिथे
स्वतःला शोधत....

मी असतो
रेंगाळत तिथे
तु जाते त्या
तळ्याकाठी
कधी महावृक्षाखाली
कधी अवकाश जवळून..

कधी तुला पाहणारा
पिंगळाही हसतो मनोमन
माझ्या कडे पाहत...
आठवतात तु उचललेले
नुकतेच झडले प्राजक्त
सकाळच्या प्रहरी ...
तु दिलेली शुभ्र हाकही
मी भुपाळी मानतो

तुझ्या घरावर
दाटून येणारा पाऊस
येतही असेल कधी
माझी वार्ता घेवून...
कधी तरी तु
आर्त होऊन
होशील चिंब
या आशेवर...

तुझे वाचनालय
तुझी रोपवाटिका
सारे लख्ख दिसते
जेथे असतो तुझा
चांदणगंधी वावर...

तरीही एक काम कर
भेटलोच कधी मी
तुला एखाद्या वळणावर
हरवलेला
तर देवून टाक
माझ्या शहराचा पत्ता मला
माझं शहर
मला अनोळखी
होण्याअगोदर...
(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०३ जूलै २०२२





No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...