Sunday, July 10, 2022

आभाळ..


आभाळासही असतो जिव...तेही तुझ्या माझ्या सारखं !!...रानावनावर हरखणारं..डोंगरमाथी थिरकणारं..मातीसाठी तगमगणारं.. चांदणओटी झगमगणारं...धरतीसाठी झरणारं...वा-यावरती फिरणारं....ते धरतं प्राण तुझ्या माझ्या माथ्यावर....कधी चांदण्याखाली... कधी अंधारात ते शोधतं त्याचं चांदणमुळ...ते चांदणं धारून घेतं..कधी मन मारून घेतं..ते तगतं ते जगतं...कधी स्तब्ध होऊन ते तुझ्या शहराच्या डोंगरमाथी थांबतं...उघडेल तुझ्या खिडकीचे दार आणी पडेल त्यावर तु पेटवल्या दिव्याचा प्रकाश म्हणून....खरंतर तो प्रकाश पेरायचा असतो त्याला अनंतावर.....ते हिरमुसत नाही तुझ्या बंद खिडकीवर ते तुझा चांदणआभास घेवून निघतं....वारा तसाही त्याला लोटत असतो..अज्ञाताकडे.....
ते झोपली गावं पाहतं...ते जागते पक्षी पाहतं...ते निजल्या जंगलाचे अदमास घेत येतं अरण्यावर...आणी एखाददुकट निशाचर त्याला पाहत निघतो प्रवासास...आभाळ काही बोलत नाही...ते चांदणआसी मनानं हळुवार चालत निघतं....ते व्याकुळ आठवणीत ओथंबतं..ते घनव्याकूळ होवून झरतं...ते विजात अनवाणी फिरतं...ते उतरतं मोरपिसावर...आणी मातीला स्पर्श करतं....ते झाडातुन उगवतं...ते हिरवाई तगवतं....ते जातं तुझ्या मुळ गावी..ख्यालीखुशाली देतं...गडकिल्ले,मंदिर,दर्गे..तु आल्या गेल्यावाटा..तु स्पर्शिलेले झाड झुडूप सा-यांना दुरून पाहतं...
आभाळ तुझी ओंजळ होतं.....आभाळ तुझ्या प्रार्थनारत हाताचे दुवे बनून...तुझ्या चेह-यावर पसरतं...आभाळ तुझं हसरं स्मित पाहून अवकाशही विसरतं...आभाळ हसतं..आभाळ रडतं....आभाळ एकाकी कुढतं..आभाळ आर्त जिव बनून तुझ्यावरती जडतं.....तुझ्या तळहातावर ते प्राजक्त बनून पडतं.....तुझा आर्त भाव घेवून ते शब्दांनाही भिडतं....तुझ्या आभासी पाखरपंखावरून दुरदेशी उडतं.....

ते थकतं...शेवटी तुझ्या कुशीला येतं.....तुझ्या हस्तस्पर्शाने...ते हसरं चांदणं होतं....

आभाळ येतं...जातं...
आभाळ तुझे गीत गातं...
आभाळ मग निभवतं तुझं चांदण नातं.....


...प्रताप ‿✶
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१० .७. २०२२

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...