Saturday, July 30, 2022

हसरे चांदणे कर


निरंजनाच्या वातीचे
मंद असे ते जळणे
गाभा-याचे मागाहून
प्रसन्न असे उजळणे

देवाला कसली आच
वात एकली जळते
दुःख तीचे का कोणा
शिखराला आपसुक कळते?

मीही लावतो दिप
नित्य तुझ्या दिशेला
प्रकाश अलवार साचतो
निद्रिस्त तुझ्या उशीला

या साचल्या अंधाराला
अर्पाव्या किती वाती?
या फुलांच्या राशीही
निर्माल्य नित्य होती

कळु दे तुलाही थोडे
वातीचे जळून घेणे
समजावे तुझ्या पावलांनाही
माघारा वळून येणे

तु दान कशाचे द्यावे?
कसला मागू वर?
दे शब्द माझे उजळून
त्यांना हसरे चांदणे कर..!!


(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९.७. २०२२












No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...