Thursday, January 30, 2020

प्राचीन कविता.......

आत्म्याला कोरून
उभारावा एखादा स्तंभ
आणी करावा मग
एका कवितेचा प्रारंभ!!

मनाचे गाभारे खोदावेत
एक ताम्रपट लिहावा
माझ्या अनवाणी हृदयाचा
मग शिलालेख व्हावा

त्यातील लिपीला तु वाचावे
तुला प्राचीन साद यावी
अनंत जन्माच्या बेफिकरीची
तुला पुसट याद यावी

तु धिक्कारल्या शब्दांचे
मी लिहावे महाकाव्य
मी प्राचीन बासरीतुन
व्हावे गीत श्राव्य !

शब्दांच्या कत्तलीचे
सोहळे अनेक झाले
माझ्या कवितेचे इरादे
आता नेक झाले

मी तुला संदर्भात ही न घेता
कविता लिहावी खास
भोगावा तु मग माझ्या
पुरातन शब्दांचा त्रास

तु सापड मग एखाद्या शब्दात
बनून पुरातन मूर्ती
माझ्या कवितेची वाढेल मग
कालातीत किर्ती!!
(प्रताप)
"रचनापर्व"
30/1/2020
prataprachana.blogspot.com 

Wednesday, January 22, 2020

काहीच नव्हते.......आर्त....

शब्दांच्या आत्म्यावर मी
लिहावे एखादे अजोड काव्य
आणी दर जोडाक्षरात
पेरावे अनाम गीत श्राव्य

श्वासांनी पेरावीत शब्दे
त्याला गंध आत्म्याचा यावा
तुझ्या तगमगीने करावा
मग माझ्या कवितेचा 'धावा'

मी तुला वगळून लिहावे
तरीही तुला तुझाच भास व्हावा
माझ्या कवितेचा बाज आता
असाच 'खास' व्हावा!

शब्दांना तुझा स्पर्शही नसावा
तरी तु 'अहिल्या' व्हावे
नुसत्या या शब्द आभासाने
तुझे 'शिळापण' जावे..

कवितेच्या गाभा-यासाठी
तु तुलाच घडवून घ्यावे
या शब्द बहरासाठी तु तुझे बहर
पायदळी तुझ्याच तुडवून घ्यावे...

माझ्या शब्दधुक्याच्या ओढीने
तु लगबगून यावे
धुक्यात विरता चाफा पाहून
तु अखंड तगमगून जावे

तु दान मागावे तुझे......
माझ्या शब्दांनी तुला नाकारावे
दुर गेल्या माझ्या शब्दांना
तु आत्म्यातुन पुकारावे.....

दर शब्दाचा तु लावावा
मग नव्याने पुन्हा अर्थ
काहीच नव्हते तुझ्या धुक्याचे
या कवितेसम आर्त......

शब्दांना आता मी
आभाळी रुजवत आहे
माझ्या वाटणीच्या चांदण्यांने
सारे अवकाश सजवत आहे.

तुला मनाई नाही!!!!
तु या शब्द चांदण्यात फिरत रहा
तुझ्यासाठी नसल्या या उजेडी
एकलीच झुरत रहा.....!
(प्रताप)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com
23/1/2020




































Tuesday, January 21, 2020

धुकेरी तृष्णा......

ही मुक धुक्याची चादर
झाडांची सळसळ ओली
मुक मनास बोले
इशा-याची मुक बोली

हे वळणदार रस्ते
मुक्काम चुकलेले
झाडांच्या फांदीवर
बेमोसमी बहर रूकलेले

स्तब्ध इमारती...
संवादाचा सौदा
मुक बोलण्याचा
कसा अजब फायदा

लपेटून धुके अंगभर
रस्ता चालत जावे
गुज मनाचे रंगीत
धुक्यास बोलत जावे

दिर्घ निःश्वास भरून
हरवला रस्ता शोधावा
अनंताला भेटण्या
मनाचा तळ शोधावा

तळ गाठावा
शिखर अनुभूती घ्यावी
स्वतःच्या तगमगीवर
स्वतःचीच सहानुभुती घ्यावी

धुक्याला उसवत असता
स्वतःस लख्ख पहावे
अंतरी साचले धुके निवळतो
शांत मख्ख रहावे...

निरंक व्हावे मनातुन
नको ते खोडावे
सा-या फसव्या हव्यासाला
धुक्यातच सोडावे....

आलाच कानी हुंदका धुक्यातुन
मागे न फिरावे
झुरवणा-या हव्यासाने तिकडेच
धुक्यासह विरावे.........

शाक्यमुनीच्या निर्धाराने
तृष्णा त्यागावी
धुके पसरवणा-या धुक्यानेच
स्वतःची नियती भोगावी......
(प्रताप)
22/1/2020 एक धुकेजली सकाळ
"रचनापर्व"
Prataprachana.blogspot.com








Monday, January 20, 2020

शब्दांच्या जखमा ओल्या.....

शब्दांच्या कत्तलींचे
झाले सोहळे साजरे
खंजीराचे हात ही
आज लाजुन बुजरे

शब्द देणारी घटिका
लाजून मुक झाली
पुका-याची साद देणे
ओठांची चुक झाली

शिंपल्याचे हिशोब चुकले
मोती निघती खोटे
पाते कधीच झालेले
बोटात गुंफली बोटे?

मनावर घातले मुखवटे
चेहरा उघडा पडतो
चांदण्यांचा मुखवटा
पुनवेला गळून पडतो

फुलांची मिजास अशी
उतरून जाते राती
गंधविहीन निर्माल्य
ओढ्यास मुक वाहती

उभारलेल्या मंदिरी
पाषाण बसत नाही
प्रत्येक दगड खरंच!
ईश्वर असत नाही

शब्दांच्या जखमा ओल्या
त्यावर कोणाचे बहर फुलती
मनाच्या वेलीवर कशी
बेमोसमी फुले झुलती

बगीचे मोडायलाच हवेत आता
तण फोफावले आहे
थव्यांचा करून सौदा
पाखरू झेपावले आहे

आता फांद्या छाटून घ्याव्यात
ऊंच वाढण्यासाठी
आता देवू नये जमीन कोणास
रांगोळी  मोडण्यासाठी

फसव्या धुक्याने आता
न दिशा हरवून जावी
न झुळकीने वादळाची
मिजास मिरवून घ्यावी...

तो खंजीर सापडलाच मला कधी
तरी तो दुष्टावा मिळणार नाही
तुझ्या मनाचा दिवा काळा
रात्रीस जळणार नाही.....
(प्रताप)
"रचनापर्व"
20/1/2020
prataprachana.blogspot.com






























Sunday, January 19, 2020

विना पैंजण नाचे.......

श्वासांच्या फुलावर
अगणित काजवे
गंध तनाचा मंद
रातराणीस लाजवे

प्रकाशाचा कवडसा
ओंजळीत सांडे
रातीच्या मनावर
नक्षी चांदण्याची मांडे

दिवा हुरहुरतो
पहाट दवात ओली
जळती वात शोधते
खोल अंधाराची खोली

या पहाटेच्या भुपाळी
अशा संथ विसावतात
तुझ्या माझ्या रेशीमगाठी
मुक्याने उसवतात

अंधाराचा प्रवाह
चालत राहतो उजेडाची वाट
चांदणेही नाही सोडत
चंद्रबनाची पाठ

मी एक बासरी सुराची
धुन उसनी मागून घेतो
राधेचा पदर मयुरी
गोकुळ त्यागून येतो..

माझ्या अंगणात रूतते
घुंगरू पैंजणातुन निखळलेले
मी शोधतो राधेचे राधापण
कृष्णात वितळलेले

दिव्या सोबत रात्रही विझे
नयनात काजळी साचे
आठवणीच्या पहिल्या प्रहरी
राधा विनापैंजण नाचे

ताल आकाशी भिडतो
ती कृष्ण बनून जाते
अंतरी शोधत मोहन
राधा शिणुन जाते
(प्रताप)
19/1/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com
(फोटो- नेट वरून साभार)











Tuesday, January 14, 2020

बेमोसमी कापलेले.....

मनावर एक चौकी बसवावी
आठवणीवर 'झिजीया' करावा लागू
तु बसवले असता पहारे
मी मुक्ती कशास मागु?

काळे कातळ नजरेत घेवून
तु जादू सारी पसरली
शुभ्रधुक्यात पाखर थवे
वाट त्यांची विसरली

प्रतिक्षेच्या काळजावर
चित्त तुझे कोरले
पुनवेच्या चांदो-यात
श्वास तमांचे झुरले

नाचरा मोर गातो
पिसा-यातुन गाणी
लांडोर कशास आळवे
दिलखेच विराणी

वाहत्या पाण्यास
ही मुरड का पडते
तुझ्या आभासाने
तारांगण का झडते

गझल पांघरून मी
शब्दांना कवेत भरतो
यमक होवून फितुर
अंधुक एकला झुरतो

मी कविता रेखाटतो
प्रतिमा अंधुक होते
मनाच्या खोल गाभारी
ठेवला संदुक होते

मी शोधत राहतो ठेवा
मन तळात तो मिळतो
दर कवितेगणीक नव्याने
मीच मला कळतो

मी मनापार तुला
पाहतो उभी अधोमुख
शब्द सांडत्यावेळी
अनुभवतो तुझे सुख!!!

शब्द, प्रतिमा, प्रतिक
सारे तुच व्यापलेले
मी पाहतो कवितेचे पिक
बेमोसमी कापलेले...

मी धृपद गातो तुझे
रातीला रंग येतो
माझ्या शब्दांचा पसारा
हळवा अभंग होतो
(प्रताप)
14/1/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com







Monday, January 13, 2020

मुक एकल्या चंद्राखाली......

मुक एकल्या चंद्राखाली 

उंबरठ्यावर लटकते
वेल फुलांची गंध पसरत
तु गेल्या वाटेवर
रस्ता असतो दिशा विसरत

धुळ उडवत्या खुरांना
गोठ्यात विसावा वाटे
हंबरणा-या वासराला
पान्हवली धेनु चाटे

सूर्याच्या कुंचल्याला
लागतो नित्य काळा डाग
चंद्र काढे हळुवार
मग चांदणीचा माग

पारावरील पिंपळ जेंव्हा
पाने मिटत असतो
वेलीवरील रातराणीचा
धीर सुटत असतो.

कभिन्न अंधार मग
अलगद सावध उतरतो
ढगांच्या सावलीला
चांदही फितुरतो

मी आठवणींच्या दिव्यात
वाती बुडवत असतो
विव्हल पैंजणी पाय तुझा
फुलांचे सडे तुडवत असतो

मी पाहतो इंद्रधनू
अंधारात बुजलेला
गोंदणसजला ठिपका
तुझ्या तनुवर सजलेला

तुझ्या आठवणींच्या चांदण्याने
माझे आभाळ भरून जाते
मुक एकल्या चंद्राखाली
नि:शब्द रात सरून जाते
(प्रताप)
"रचनापर्व"
13/1/2020
prataprachana.blogspot.com

Friday, January 10, 2020

आठवणींचे जत्थे .....





मनाच्या मरूस्थळी
सुक्या आशेच्या वेलीवर
बहरून येते कळी

रुतता भाले मनाला
ही वेदना खोल उसवते
ओल्याआठवणीचे साऊलबन
रूक्ष नजरेस हसवते

मी चंद्र कवेला घेवून
तुडवत राहतो रस्ते
पायी घुसल्या काट्यांचे
आभार मानत आस्ते

मी चांदण्याचे शिवार
खुडत राहतो राती
बंद डोळ्यांच्या आत
पेटवत तुझ्या वाती

मी वा-याला भिडतो
त्याला मुठीत धरतो
माझ्या बोटांच्या पेरावर
गंध तुझा उरतो

मी अढळध्रुव हलवतो
त्याला सोबत घेतो
चकोराच्या चोचीने
आर्त विराणी गातो

मी सुर्य पेटवतो पहाटे
तुझे अस्तीत्व कळण्यासाठी
घेवून फिरतो तुझा आभास
मलाच छळण्यासाठी
(प्रताप)
10/01/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

Thursday, January 2, 2020

माई....

माई....
तुझ्या पदराने तु
किती पोरके झाकले
तुझ्या बाराखडीत माई
आम्ही आयुष्य शिकले

तुझ्या वटवृक्षावर आता
फुलती स्त्रिमुक्तीचे पाने
तु झेलल्या शेणीतुन
उगवले आजचे सुखी जिणे

तुझे चंदनधुपाचे झिजणे
'ज्योती' प्रकाशीत झाला
वांझोट्या स्त्रीवादास
पान्हा शिक्षणाचा आला

तु ज्योतीबाची ज्योती
तु सुर्य अंधार सारणारा
शरमतो तो हातही आता
तुला दगड मारणारा

तु ऊभी होतीस दरवेळी
ज्योतीबाची बनून सावली
विधवांच्या पोरासवे तु झालीस
सा-या माऊल्यांची माऊली

हौद खुला होताना तु
मनही केलेस खुले
काटे सारे पदरात घेवून
तु दिलेस आम्हा 'फुले'

तु मिणमिणती पणती
आमचा अंधार जाळणारी
आमच्या आयांना शिकवून
आमचे जगणे पाळणारी
(प्रताप)
"रचनापर्व"
माई सावित्रीच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

अज्ञात प्रस्थान...



अज्ञात प्रस्थान.....


माझ्या समर्पणाची ओंजळ
तुझ्या मुठी भरल्या
वाहून गेली फुले
खुणा गंधाच्या उरल्या

मी पसरल्या बाहुचे
हे खुले मोकळे रान
कोणाच्या मधुगंधाने
या दिशा जाहल्या बेभान

माझ्या झोपेचे दान
तुझ्या पापण्याला
चांदण्याचा गहन आडोसा
रातीस लपण्याला

ही धुक्याची चादर
ढगाने ओढलेली
शहा-यांची रांगोळी
रोमांचावर काढलेली

हे शब्दांचे कवडसे
ही भावनांची किरणे
या रातींनी असे
अंधारात फिरणे

या रातींना येतो चांदणबहर
फुलांना येई गंध भरते
ही हवा मंदमंद कुंद
तुझ्या परिघात फिरते

हे आठवणींचे काफिले
हे बेमोसमी मरूस्थान
तुझ्या अज्ञात दिशेला
नित्य होणारे प्रस्थान

पाखरांच्या पंखाना
ही चंदेरी लकाकी
तुझ्या चांदण्याने येते
या रातीस चकाकी

रात ओसंडुन वाहताना
ही शब्दांची पेरणी
कवीतेस का लागावी
प्रतिकांची झुरणी?
(प्रताप)
"रचनापर्व"
दिनांक 2/1/2020
prataprachana.blogspot.com













Wednesday, January 1, 2020

धुक्याचा आलाप.....


धुक्याचा आलाप. ....

सांजेची गोठणवेळ
धुके अपार दाटलेले
संधिप्रकाशाचे कवडसे
असे ढगात नटलेले

झाडे चिंब गारठलेली
थेंब अबोल मुके
पाण्याच्या तळातही
थंड पहुडले धुके

निपचित पडला गाव
गारवा एकटा वाहतो
दुर जात्या पायवाटेला
ढग निरखुन पाहतो

झाडाच्या फांदिवरही
धुक्याचा कंदिल टांगलेला
बहरल्या सायंकाळी
सांजप्रकाश पांगलेला

गार हिरवा फुलोरा
थंडीची शिरशिर झुलते
माझ्या मनीची कविता
तुझ्या मनात फुलते

तु धुक्यातून असा
आभास पेरलेला
धुक्याचा एक कोपरा
मी पाहिला झुरलेला

हे धुके विरेल
तुझे होईल घनदाट
आजही हरवेल का
मग रोजची पायवाट?

रस्ता गात राहील
तुझ्या धुक्याचा आलाप
सांज विरघळत्या वेळी
मनी दाटून येईल मिलाफ....
(प्रताप)
1जानेवारी 2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com


Friday, December 6, 2019

तु आभाळ दिलेस........



तु आभाळ दिलेस...
झेपावण्यासाठी पंख दिलेस
मानवतेचा निनाद करण्यासाठी
हाती आत्मभानाचे शंख दिलेस

तु दिशा दिलीस
तु मती दिलीस
खचल्या आयुष्याला
तु गती दिलीस

तु दान दिलेस जगण्याचे
तु आमच्यासाठी पाणी पेटवलेस
नष्ट करण्या गुलामी तु
मानवमुक्तीचे हाकारे उठवलेस

तु एक हाताने संघर्ष
दुस-याने बुध्द दिलास
"मुकनायकास" सा-या
तु "प्रबुध्द "केलास

तु झिजलास चंदन होवून
माझ्या पिढ्यांना सुगंध
तुझ्या महापरिनिर्वाणाने रे
माझा सुर्य झाला मंद

तु पुसला जात नाहीस
माझ्या धमन्या तुला वाहती
तुझ्या सावलीत रे अनंत पिढ्या
लख्ख प्रकाशकिरण पाहती

तु माई रे वंचिताची
तु शोषितांचा रे पिता
मोकळे केलेस रे श्वास
तु आयुष्याचा दाता

तु काळाचा कालातीत ठसा
तु मानवतेचे गोंदण
आमच्या सुखासिन आयुष्याचे
तु संजीवक कोंदण

तु मानवतेचा सागर
तु ज्ञानाचा अथांग
वाहून रे सा-या पिढ्या
न फिटे तुझे पांग...

तुझ्या महापरिनिर्वाण दिनी मानवमुक्तीचे स्फुल्लिंग चेतो....
तुला भावपुर्ण वंदन..
(प्रताप)
"रचनापर्व"
6/12/2019























Sunday, December 1, 2019

ओंजळीत पडणे...

हा रस्ता,
हे सांज व्यापले धुके
कोणाच्या आठवणीने
काळीज ठोका चुके???

हे गवत,
ही कुजबुजती हवा
भारून येते संध्या
हा गंध कोणता नवा???

हे शिलालेख
ते दगडाचे तुटके शब्द
धुळीत उमटते धुसर
कुठल्या राजाचे प्रारब्ध???

हा पिंपळपार
ही रिकामी जागा
चांद उगवत्या दिशेला
का मिळत नाही धागा???

हे झडले मोरपंख
त्याचा चकाके डोळा
का दाटून येतो मनात
मयुरपंखी सोहळा???

हे हुरहुरीचे गाणे
व्याकूळ व्याकूळ संगीत
कोणाच्या आभासाने
हा अंधार होतो रंगीत???

हे संध्याकाळचे येणे
जणु मृगजळाचे पाणी
का वाटते ती चांदणी
चमकते दिनवाणी???

हा टिमटिमता काजवा
त्याचा प्रकाशी कयास
का भिडत जाते मन
अंधाराच्या भयास???

हे शब्दफुलांचेअसे
नित्य नित्य झडणे
का टळत नाही कवितेचे
तुझ्या ओंजळीत पडणे???
(प्रताप)
"रचनापर्व"
दिनांक 1/12/2019
Prataprachana.blogspot.com










Saturday, November 30, 2019

स्वप्नांशी नित्य....


स्वप्नांशी नित्य...

माझ्या भासात ,माझ्या संभ्रमात
आठवणींचा साचे पाणवठा
तुझ्या गही-या डोळ्यात उमटे
माझ्या थकल्या हाकेचा शिणवटा

मी पेरले गाईचे हंबरडे
मी धुन हवेची चितारली
गोकुळातील बासरीधुन
कवितेत माझ्या उतरली

मी सांज धुक्याचे मृगजळ
आकाशावर सांडताना
हाताशी धरले इंद्रधनू मी
तमोरंग मांडताना

मी चेतवल्या चांदण्या
चंद्रमाळ ती पेटली
झिळमिळती रेशीमगाठ
अलवार अलगद सुटली

फुलांचे गंध झिरपती
हा बहरही शित झरतो
मावळे चंद्रकोर नभी
मनात चांदवा उरतो

गारवा शिलगतो अलगद
हवा जणू स्तब्ध होते
मनीचे गीत माझे तुझ्या
असण्यावर लुब्ध होते.

मी रातमग्न पहाटे
उघडावी चांदण्याची पेटी
रातीच्या कुशित व्हाव्यात
तुझ्या स्वप्नांशी नित्य भेटी
(प्रताप)
"रचनापर्व "
दिनांक 30/11/2019
prataprachana.blogspot.com












Monday, November 11, 2019

पसाभर चांदणे


पसाभर चांदणे

ओंजळीतुन ओघळणारा चांदवा
आभाळी माळताना
रातीच्या काळ्या कवडशाला
प्रकाशाने जाळताना

धुक्याच्या सांजवाती
मनात भिजवताना
समईचे तेवणारे लावण्य
नजरेत रूजवताना

मी माळावा निशीगंध
तुझ्या गंधाचे बहर पेरावे
फुलांचे आत्मेही मग
फांदीवर झुरावे

मी चकोराला ओढ द्यावी
मी द्यावी नदीला भरती !
हृदयी ऊचंबळणारा सागर
मी शिंपावा तुजवरती

मी चांदणे रंगवावे
मी चंद्रप्रकाशास सजवावे
तुझ्या ओल्या हाकेत
सारे आभाळ भिजवावे

मी माळ व्हावा अनंत
मी अनंतातुन तुजवर सांडावे
पसाभर चांदणे घेवून
तुझ्या अंगणी मांडावे....

मी हवेला तुझी
दाखवावी पायवाट
मातीवर उमटावा तुझा
पाऊलपैंजणी थाट

मी गवताच्या अंगावर
रानफुले पसरावे
दिवेलागणी वेळी
मी गावकुस विसरावे

मी शांत एकले व्हावे
मी उधाण पेरून द्यावे
खुल्या आभाळाखाली
मनी चांदणे भरून घ्यावे.
(प्रताप)
"रचनापर्व"
दिनांक- 11/11/2019
prataprachana.blogspot.com

Saturday, November 9, 2019

मनीचा समुद्र नदीकडे वाहतो...



मनीचा समुद्र नदीकडे वाहतो....

सांजधुक्यात ओलावलेला चांद
सांजेने स्पर्श केला
सोनतमाच्या किरणासवे
चंद्र धुक्यातून आला

मी टिपुन घेतला चांदवा
सांज सोनेरी झाली
मी शोधत राही माळरानी
तुझ्या धुक्याची खोली

झिरमीर झाल्या सायंकाळी
हि हुरहुरीची हवा
भारून उडतो आभाळी
क्लांत पाखरांचा थवा

लालीमेचे धुसर पट्टे
आकाशी कोण रेखले
प्राजक्ताचे कोसळले फुल
गंध पेरते एकले

दिवेलागणीचा प्रकाश धुकेरी
संध्या हळुवार दाट होते
आठवणींच्या ओहोळाची
मग रौद्र लाट होते

चंद्र ऊभारतो मग
तुझ्या कांतीचा मनोरा
भांबावल्या मनास माझ्या
न लाभतो किनारा

मी चांदण्यात न्हातो
मी चंद्रात तुला पाहतो
माझ्या मनीचा समुद्र सारा
तुझ्या नदीकडे वाहतो
(प्रताप)
"रचनापर्व"
दिनांक...कधिही, कोणत्याही दिवशी...
( 9/11/2019)
prataprachana.blogspot.com

Tuesday, October 8, 2019

अत्तरगंधी चंद्रकोर......



सांजनभिच्या शुक्रता-या
चमकत रहा नभी
साठवून घेईल नयनी
दारात रात ऊभी

ही अत्तरगंधी चंद्रकोर
झिरमीर झिरमीर वारा
चिंब सुगंधी झाल्या
नदीत वाहत्या धारा

गवत हिरवे डोले
प्रकाश चंदेरी पाहता
ही झुळुक का धुंदावे
तुझा गंध वाहता

पुलकीत होतो माळ
का सरसर फुटून येते
कृष्णाच्या आभासात
तुझी राधा दाटून येते

धुके पसरल्या राती
हा चांद धुसर होतो
उधाणल्या चंद्रप्रकाशी
स्वतःचा विसर होतो

हे रानभारले चांदणे
असे खुलुन येते
तुझ्या निव्वळ आभासात
मन भुलुन जाते

रान जागल्या होवून
देतो आठवणींचे हाकारे
रात्रीच्या अंधारात घुमती
चकोराचे पुकारे

मनाच्या बासरीला
मग सुचते तुझे संगीत
स्फटिकाच्या चांदण्याखाली
सावळी रात्र होते रंगीत...
(प्रताप)
"रचनापर्व "
8/10/2019
हिवाळ्याच्या चाहुलीचे शब्दबन...

Wednesday, October 2, 2019

गांधी मरत नाही:मारला जातो

गांधी मरत नसतो
तरीही तो मारला जातो
ईथे 'बुध्द'ही सोयीने
पोखरणात पुरला जातो

'बुध्द' मान्य नसणारे 'किडे'
पहा त्यांचे विषारी फुत्कार
आईन्स्टाईनलाही भारलेस
असा तु भारक चमत्कार

तुला पुसणारे अशांती हातच
करत असतात तुला अजुन रंगीत
यांच्या आरोळ्या, घोषणा, समर गीते
या सा-यावर वरचढ तुझे मानवता संगीत

तुझा द्वेषच त्यांच्यात खोलवर
तुला ठसवत असतो
तुला नाकारणारा हर एक
नेमका कोणाला फसवत असतो?

बुद्धाप्रमाणे तुझ्यावरही
इथे रोज होते चढाई
महत्व प्राप्तीसाठी करावीच लागते
त्यांना तुला मारण्याची लढाई

तरी तु उद्ध्वस्त होत नाहीस
तु बुडुन जात नाहीस
मानवता खुडणा-या हाताने
तु खुडुन जात नाहीस

तु बहरत जातोस आमचे हंगाम
तु महावीर ,महामुनीचे झाड ऊगवतोस
तुला पायदळी घेवून ऊंच होणा-याचे
खोटे महात्म्य ही तगवतोस

तु मोडत नाहीस तुटतही नाहीस
तु होतही नाहीस नामशेष
मानवतेच्या कणाकणातुन
दिसतात तुझे अवशेष

तु अमिट तुझ्या आत्मबलाने
आमच्या साठी मरून गेलास
गरजेप्रमाणे धावून येतोस
गरज संपता सरून गेलास

तु कोणाचा तरी अनुनय केलास
कोणी बुध्दाचाही करतो
कदाचित याच कारणाने ते आणी तु
ईथे द्वेषपात्र ठरतो

विषपेरत्या हातांना
नकोच असते तुझी सावली
तुला टक्कर देण्यासाठी ते शोधतात
एक नित्य नवी बाहुली

तु तथागताप्रमाणेच नेमका
अनुयायात नाहीस दिसत
लाठी धरला तुझा हात असतो
कुठेतरी दिनांचे अश्रू पुसत

तु आमच्या मिठ, कपडे, शेती
आणी देशासाठीही लढलास
तुझ्या मिठाला न जागणा-यावरही
तु कधीच नाही चिडलास

स्वातंत्र्य आले त्यावेळीही
तु आग विझवत बसलास
"हे!राम" म्हणताना ही
तु खुन्यावर हसलास

तुझ्या नावाने अनेकांचे
धंदे चालतात काहींचे चालत नाहीत
नफेखोरीच्या हव्यासाने
कोणी बोलतात कोणी बोलत नाहीत

तुझ्या नावाने, आणी नावावर
अनेक पिढ्या जगत आहेत
तुझा चष्मा घेवून ऊधार
आमच्या छात्या फुगत आहेत

तुला आजही आम्ही सोयीने आणतो
सोयीनेच करत असतो तुझा खुन
तु आपला गात रहा नेमाने
मानवमुक्तीची धुन, मानवतेची धुन


ता.क.

(त्यांनी लिहून घ्यावे आत्म्यावर
'महात्मा' मरत नसतो
काजव्याच्या टिमटिमीने
सुर्य झुरत नसतो!)


आदरणीय बापुस त्यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त 'सविनयी' व 'सत्याग्रही' भावांजली!
(प्रताप)
"रचनापर्व"
2ऑक्टोबर 2019
(प्रहर: गांधीभक्तीची सकाळ )

Sunday, September 29, 2019

रंग बरसत असेल......


रंग बरसत असेल.....

आज खुप दिवसांनी 
"इंद्रधनू" एक पाहीला
सांजेसवे बुडून गेला 
आभास नुसता राहीला

आभाळल्या क्षितीजावर 
त्याने उधळले सप्तरंग
मनात उठले अनाहूत
ओले माळरानी तरंग

तुझ्या आभासाचे इंद्रधनू 
माझ्या आकाशी पसरले
अंधार गडद होवूनही ते
लुप्त होणे विसरले

काळ्या ढगांनी पावसाच्या
हा रंग कसा उधळला
नुसत्या तुझ्या आभासाने
माझा सांजकाल उजळला...

मी रंग घेतले तुझे
आठवणी केल्या रंगीत
भुरभुरणारे थेंब तुषारती
ओल्या पावसाचे संगीत 

मी थेंबझडीत ऊभा
तुजरंगाचा वर्षाव पाहीला
मनात माझ्या ओसंडून
का पाऊस असा वाहिला 

तो अल्पावधीतच असा
तुला पेरून गेला
रिक्त पोकळ्या मनात माझ्या
तुला भरून गेला

बहुधा पुढच्या मोसमात
तो असाच अवचित दिसेल
कोसळणारा पाऊसही मग
रंग बरसत असेल..
(प्रताप)
"रचनापर्व "
माझी पावसाळली कविता....
29/9/2019
prataprachana.blogspot.come

Thursday, September 26, 2019

?



तु भ्रम की वास्तव?
धुक्याला माझा प्रश्न
पावसाच्या ओलाव्याने
का होते मन तृष्ण

तु सुगंध की सुगंधी स्वप्न?
का लहरते हवेत ही दरवळ
डोंगर माळावर पसरून
का व्याकुळते ही हिरवळ

तु संगीत की गीत ओले?
की कृष्णाची बासरी
का दाटून येते मनात
एक आर्त कळ हसरी

तु एकांतातील स्वप्न की
स्वप्न पाहण्याचा एकांत?
मौन संधेच्या बोलक्यावेळी
का मनात दाटे आकांत

तु पडलेला विसरक्षण?
की येणारी आठवण
जणू पावसाळ्याच्या शेवटी
होते त्याची अपरिहार्य  पाठवण

तु आलेला दुरावा
की मनी दाटली जवळीक?
तु सरळसाधे जगणे की
आयुष्याची आगळीक
(प्रताप)
27/9/2019
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

Friday, September 20, 2019

आठवणी धावून येतात....


निर्जीव लोखंडी कांबीला
एक वेल बिलगली होती
बहराच्या धुंदीत मग
फुले विलगली होती

अप्राप्य सागराच्या ओढीने
एक नदी तरसली होती
पावसाची सर मग
आभाळधुंद बरसली होती

जिवलगा भेटण्यासाठी
एक रस्ता आतुर होता
शकुनाचा कावळा मात्र
फितुर फिरत होता

फुलपाखरांचे पंख
आभाळ झाकत होते
पावसाचे थेंब त्यांचे
रंग राखत होते

माती भिजत होती
सृजन झेलत होती
बहर झडली आमराई
वा-यात झुलत होती

वासुदेवाची गाणी
मनास भिडत होती
एक कोकीळा सुर लावून
मुक कुढत होती

पावसाची सकाळ अशी
उगाच दाटून आली होती
तु नसल्याची आठवण अशी
आभाळ फाटून आली होती

दिवस सारे आता
असेच वाहून जातात
पावसाच्या सरी सवे
आठवणी धावून येतात
(प्रताप)
"रचनापर्व "
21/9/2019
prataprachana.blogspot.com



Thursday, September 19, 2019

चांदणे भिजव....

चांदणदिवे जळताना
मी चंद्र टांगला नभी
सोनप्रकाशी सावलीत
दिसे निशा आतुर ऊभी
विसावलेले हंबरडे मुके
घरी पोचल्या गाईचे
सुस्तावलेले मंद गंध
सडे पडल्या जाईचे
लुकलुकतात गावभर
नुकतेच पेटले दिवे
मान खुपसून पंखात
निज झाले थवे
चंद्राच्या साथीने मग
माझे सुरू होते जागणे
आठवणींच्या व्याकुळ प्रहरी
असे बावर वागणे
तु गेला तो रस्ता
मला खुणावत असतो
चंद्र ही त्याच दिशेला
मंद पेटला दिसतो
मी हाक देत नाही
मला अवगत भाषा मुकी
बोलत असतो अंधाराला
होवून चंद्रमुखी
तुलाही फुलतुटलेपण येत असेल
अशा व्याकुळ रातवेळी
पसरत असशील प्रकाशासाठी
माझ्या चांदण्यासमोर झोळी
खुडुन घे काही चांदण्या
तुझेही दिवे सजव
सा-या माझ्या चांदण्याला
नयन किनारी भिजव
(प्रताप)
20/9/2019
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

नित्य भेटत राहील.....

आभाळ पांघरून रात्र
चंद्र वरती टांगलेला
चांदण्यांचा पसारा
नभावर सांडलेला

हळुच ढकल दरवाजा
कळ्यांना येईल जाग
मुक चंद्रही काढेल मग
सुगंधी पावलांचा माग

मी नसेन तेथे
तु रिकामा अंधार पहा
अंधारात आठवत मला
मग सुन्न ऊभी रहा

काहीच न सुचुन मग
तु घे दिर्घ श्वास
खुल्या डोळ्यानी पहा तुझा
मोडुन पडता हव्यास

तुला 'फुलतुटलेपण' येईल
रिकाम्या फांदीसम वाटेल
चालत निघ मग तु
जिकडे रस्ता फुटेल

रस्त्यावर शोध मला
तु चांदणेही ढवळून काढ
अंधारात पाहून घे
ऊभे एकले झाड

आठव तुझे बहराचे दिवस
व्यक्त कर मग पोरकी खंत
परत निघ आपल्या वाटेने
टाकत पावले संथ

थकल्याने तु झोपण्याचा
प्रयत्न करत रहा
बंद-उघड्या डोळ्यांनी
फुलला चंद्र पहा

झोप लागेल बहुधा तुला
मला मनातुन पुसल्याने
तुझ्या झोपमोडीचे मलाच पातक
मी स्वप्नात पुन्हा दिसल्याने

तगमगीने उठुन बस
आभाळ पेटून येईल
तुझ्या तगमगीत असा मी
नित्य भेटून जाईल
(प्रताप)
"रचनापर्व"
19/9/2019
prataprachana.blogspot.com

Tuesday, September 17, 2019

प्रकाश माझा वाहिला....



मी पेरले
बागेत तुझ्या तनुचे गंध
मनाला माझ्या येई
तुझा सुवासी सुगंध
मी रेखाटले आभाळी
हे मुग्ध पिवळेचांदणे
शहारते रातीला मग
माथ्याचे लाजरे गोंदणे
मी डोळ्यात माझ्या
भाव तुझा रुजवला
हा चंद्र असा कोणी
ओल्या दवात भिजवला?
मी रात जागवली
मी पहाटेला पाहीले
तुझ्या गंधाचे निशीगंध
मग दारात वाहिले
मी आजही अनावर
तुला आठवून घेतले
रात्रीच्या अंधाराला
काळजात साठवून घेतले
मी दिशा जळताना पाहीली
मी सुर्य ऊगवताना पाहीला
अंधारातील तुझ्या प्रतिक्षेला
सारा प्रकाश माझा वाहिला....
(प्रताप)
"रचनापर्व"
17/9/2019
prataprachana.blogspot.com

Tuesday, September 10, 2019

संदूक.....

संदूक....

तो संदूक ऊघड
ऊकल ती परीटघडी
आठवणींच्या गंधाने मग
पाणवतील नयनथडी....°
खोलवर श्वास घे
मी अंतरी रूजेन
प्रतिक्षारत नयनात मग
मी धुसर सजेन....°°
आठवणींच्या वेलीस मग
फुले येतील लगडून
मिळव तो मिलनगंध
फुलांशी झगडून.....°°°
एक एक वस्तू मग
तु अलगद अलवार काढ
"त्या" भूतकाळास मग
"या "वर्तमानाशी ताड...°°°°
उसवेल मग जखम
तिला मनसोक्त वाहू दे
निर्जीव पडल्या वस्तुंना
तुझी सजिवता पाहू दे...°°°°°
डोळे मिटून घे हळुच
संदूक राहू दे उघडा
सुरू होईल तुझ्यात मग
अपूर्णतेचा झगडा...°°°°°°
आळवून घे मनसोक्त
मी असणार नाही
गंधाळुन जाईल रात्र
फुल दिसणार नाही..°°°°°°°
सवयीप्रमाणे मग तु
उघडा संदुक बंद कर
अंधाराशी झगडण्यासाठी
वात दिव्याची मंद कर.....°°°°°°°°
(प्रताप)
"रचनापर्व "
दिनांक 10/9/2019
prataprachana.blogspot.com

Sunday, September 8, 2019

काहूर बनाचे सडे...



सांज उगवती वेळ
राऊळी गलबल चाले
बुडत्या सुर्यात खुपती
काळ्या अंधाराचे भाले

चकोर गोंदण माथी
डोळा चांदणीची हाक
आभाळास मग येते
तुझ्या डोळ्यांची झाक

मी चांदणे पाही
भासे नयनांचा स्पर्श
चंद्राच्या कोरीस मग
सोनप्रकाशी हर्ष

चंद्रउगवत्या वेळी
तुझ्या हाकेचे पारायण
राऊळाच्या गाभारी
हेलावे नारायण

तुझा माझा ओढा
चंद्राकडे जातो
एक चंद्र दोघांकडे
उंचावरून पाहतो

तु तेथून मी येथुन
चंद्राला घालतो साकडे
स्पर्श करण्या ऊंचावले हात
पडतात मग तोकडे

चंद्र चांदण्या खाली
तु ऊभी स्तब्ध, शांत
तुझ्याच सारखा इकडे
माझा एक मुका आकांत........

ही सांजबहराची वेळ
काहूर बनाचे सडे
चांदण्याच्या प्रकाशात
मिळती आठवणींचे धडे.....
(प्रताप)
"रचनापर्व "
(8/9/2019)
prataprachana.blogspot.com

Tuesday, September 3, 2019

ते तसे तुझे होणे.....



  • ती सारंगी धुन
  • ते मखमली गीत
  • ते व्याकुळ शब्द
  • ते समर्पी संगीत

  • तो थिरकता पाऊस
  • ते थेंब नाचणारे
  • पावसाच्या क्षणात असे
  • हुरहुर शब्द सुचणारे

  • ती हिरवळ
  • ते शिवार बहरलेले
  • तुझ्या माळरानावर
  • माझे थवे विहरलेले

  • ती रोमांची हवा
  • तो तुझा गंध
  • स्पर्शाच्या मखमलीचे
  • सैलावणारे बंध

  • ते कुजबुजीचे निनाद
  • ते मुके बोलणे
  • स्वप्नांच्या धुक्यात मग
  • तरंगी चालणे

  • ते ओळखीचे जुनेपण
  • ते अगणित नवेपण
  • नसल्या क्षणात असे
  • दाटून येणारे हवेपण

  • ते रस्त्याचे वळण
  • तेथे स्वप्नांचे सांडणे
  • अशा अवेळी मग
  • अवघडे शब्दांचे मांडणे

  • ते पिंपळबन
  • ते पाखरांचे गाणे
  • हिरव्या पावसात मग
  • कंच ओले होणे

  • ते तसे तुझे होणे
  • स्वतःस विसरून जाणे
  • हिरवळ बनून तुझ्या
  • ओल्या मातीवर पसरून जाणे

  • (प्रताप)
  • 3/9/2019
  • "रचनापर्व"
  • prataprachana.blogspot.com











Monday, September 2, 2019

प्राजक्तबन.....

तुझ्या प्रतिक्षारत डोळ्यांना
रिक्ततेची सवय करून घे
सुर्याने पाठ फिरवल्याने
आला अंधार भरून घे

मी कधी लावलेल्या पणतीची
उरली वात पेटवून घे
ऊजेडाची तिरीप अशी
अलगद डोळ्यात साठवून घे

त्या रस्त्याच्या पाऊलखुणा
मनावरती कोरून घे
न उमटणारा माझा पायरव
कल्पनेने चोरून घे

निशीगंधाचे पडले सडे
अलगद तु सावडून घे
हृदयी भरला विरहगंध
नाईलाजाने आवडून घे

उगवलाच कधी चंद्र तर
त्याच्या कडे पाहून घे
गलबलणारे चांदणे येईल
एक चांदणीत राहून घे

ओळखीचा कधी सापडलाच शब्द
माझी कविता आठवून घे
अनंतव्यापी हाक दाबून
महाकाव्य तुझे पेटवून घे

एकाकी पणाच्या सांजवेळी
प्रतिक्षेचा दिवा जाळुन घे
आलेच कधी ओठी नाव
क्षण तेवढा टाळुन दे

मनावर तुझ्या शिल्प कोरले
त्याची घडण पाहून घे
फुललेच कधी प्राजक्तबन
तर...एक फुल वाहून घे

(प्रताप)
2/9/2019
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

Sunday, September 1, 2019

मी एके मी......

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 19: मी एके मी...!

पुर्वपरिक्षेचा निकाल आल्याच्या दुस-या दिवसा पासूनच मी मुख्यपरिक्षेच्या सखोल अभ्यासाला सुरूवात केली..काहीच माहिती नव्हती..सोबत अभ्यासाला कोणीच नव्हतं..जे करायचं ते स्वतःच करायचं..फक्त एक आत्मविश्वास होता " आपण मुख्यपरिक्षेचे पेपर चांगलेच लिहू"..निव्वळ या भरवशावर मी जिव ओतून अभ्यास करत होतो.पुर्व परीक्षेच्या क्लासला शिकवायला गेल्याने ब-यापैकी नाव झाले होते. खुप मुलांचे रिझल्ट आल्याने सगळ्यांची मागणी होती मी मुख्य परीक्षा पण शिकवावी.आणी लातुरात प्रथमच कल्पनेपेक्षा जास्त निकाल आले होते त्यामुळे सर्वांचा आत्मविश्वासही वाढला होता. मी मुख्यपरिक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवायला जाणे आणी अभ्यास करणे यात गढून गेलो होतो. आजही तो दिवस आठवतो, मी पहिल्यांदाच मुख्यपरिक्षेचे सामान्य अध्ययन हा विषय शिकवायला गेलो , वर्गात जातो तर वर्गात अनेक दिग्गज बसलेले, त्यात अनेक पोस्टहोल्डर पण होते..पण मैदान दिसले की जसे घोड्याला फुरफुरायला होते तसेच झाले..मी न दबून जाता शिकवायला सुरूवात केली..अगोदर सर्वांनी साधारणपणे प्रतिसाद द्यायला सुरूवात केली..काही सिनियर व अनुभवी मंडळी समोर असल्याने प्रश्न अथवा चर्चा करायची तरी पंचायत! पण मी ठामपणे व नाविन्यपूर्ण मुद्दे व मांडणी सह शिकवायला सुरुवात केली आणी वर्गात हळुहळु मग सिनीयर्सनी पण दाद दिली..त्यांच्या नोट्स मधे पाॅईंट्स व प्रेझेंटेशन चे मुद्दे अॅड करायला सुरूवात केली. माझा आत्मविश्वास खुप वाढला...सिनीयर्सनी लेक्चर संपल्यावर विशेषत्वाने कौतुक केले.
मी त्यांच्या मोठेपणाने भारावून गेलो आणी ही लय व दर्जा घसरणार नाही याची दक्षता घेण्याचे ठरवले.

दिवस पुरत नव्हते, प्रचंड वेगाने अचुक अभ्यास, मांडणीचे नविन मुद्दे व पद्धती, लिहिण्याची विशेष शैली व समर्पकता या धर्तीवर मी अभ्यास करत होतो..माहिती नव्हतं की माझा अभ्यास कुठल्या दिशेने जात आहे. तपासण्याचे काही साधन नव्हते. फक्त एक माहिती होतं आपण निव्वळ अॅव्हरेज लिहून येणार नाही..वाचन, नोट्स काढणे, त्याला विशीष्ठ सादरीकरण देणे, उत्तर रेखीव व भरदार होण्यासाठी त्यात माहिती व इतर कंटेंटचा ऊपयोग करणे असे चालले होते..मी अभ्यासाव्यतिरीक्त करावे असे काही नव्हते आणी असले तरी ती चंगळ परवडणारही नव्हती. मी अक्षरशः खपत होतो..रूमवर ही जाणे कमीच झाले होते..जेथे अभ्यासाला बसायचो तेथेच रात्री लोखंडी खुर्च्या एकमेकांना जोडून मी झोपायला लागलो..कारण ती इमारत एका टोकाला होती आणी त्या भागात साप असल्याने खाली झोपणे योग्य नव्हते.

एके दिवशी एकटाच अभ्यास करत बसलो होतो.अचानक संतोष गोरड सर , जे मला काॅलेजला सिनीयर होते, (सध्या तहसीलदार, तत्कालीन नायब तहसीलदार) ते मी अभ्यास करत असलेल्या ठिकाणी आले. त्यांना अरूण पोतदार यांना भेटायचे होते. कारण त्यांनी पुण्यात मिळून अभ्यास केला होता. त्यांनी विचारपूस केली..आणी मला विचारले "तु काय वाचत आहेस?" मी त्यांना सांगितले "सर, मी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत आहे". त्यांनी कौतुक केलं, आस्थेने विचारपूस केली आणी मी काय वाचत आहे हे त्यांनी पाहिले. मी त्यांना माझ्या नोट्स दाखवल्या,विचारलं सर, मी योग्य अभ्यास करत आहे का? त्यावर त्यांनी सगळं पाहिलं आणी मला म्हणाले" यु आर ऑन राईट ट्रॅक!!" त्यांनी खुप शुभेच्छा दिल्या , ते गेले , पण मला एक आत्मविश्वास आला मी जे करत आहे ते योग्य आहे..त्या हुरूपाने मी अभ्यास करत राहिलो.

मुख्यपरिक्षेच्या अनुषंगाने संदिप येत रहायचा, तो सांगत रहायचा, करत रहा ! होशील पास! .तांदळे सर कधी तरी यायचे..बोलणे व्हायचे. मी टिकून होतो. मुख्यपरिक्षेचे हाॅलटिकीट आले. लगबग सुरू झाले. आयुष्यात पहिल्यांदाच औरंगाबादला जायचे होते. एकीकडे अभ्यासाचा दबाव तर दुसरीकडे तेथे कोठे राहणार? किती पैसे लागतील याचे टेन्शन..कशीतरी जुळवाजुळव झाली पण दबाव होताच कारण तेच ! उसनवारी आणी तुटपुंजे पैसे! .संदिप पण तयार झाला मुख्यपरिक्षा देतो म्हणून. मी आणी संदिप जायचे ठरले. मी अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात होतो..अभ्यास पुर्ण झाला की नाही हे कळत नव्हते. पण तरीही एक गोष्ट होती जी टिकवून ठेवत होती..."मुख्यपरिक्षा नापास होईल असे कुठलेच कारण नाही, म्हणून आपण पास व्हायचेच, आणी त्या शिवाय आपल्याला पर्यायही नाही हा स्वतःला दिलेला शब्द "


औरंगाबादला जायच्या अगोदर गावी जावून आलो, आई वडीलांनी चांगली परिक्षा दे म्हणून सांगितले, मी एक जबाबदारीचं भान घेवून निघालो..दोन दिवस अगोदर जायचे ठरल्याप्रमाणे आम्ही औरंगाबादला गेलो. एका लाॅजवर मी आणी संदिप थांबलो. संदिप अस्वस्थ होता..मलाही दडपण आले होते. दोघेही रिव्हिजन करत होतो. एकमेकाचा आत्मविश्वास वाढवत होतो. आमचे परीक्षा केंद्र वेगवेगळे होते. पेपरच्या आदल्या रात्री झोप येत नव्हती. डोळ्यासमोर उद्याचा पेपर येत होता..परिक्षा येत होती....नुसती तगमग...आणी सरतेशेवटी ती रात्र सरली..सकाळी आम्ही निघालो आपापल्या दिशेने..... एकट्याने लढावे लागते ,आपली वाट आपणच चालावी लागते हे जाणवणार क्षण..मी निघालो..खुप दडपण, अनोळखीपण, एकटेपण यावर मात करण्याच्या धडपडीत केंद्रावर पोहचलो..तेथे चालणारी एक गंभीर लगबग पाहून मीही गंभीर झालो...कोणीही ओळखीचे नाही ठार एकटेपण...आणी मनात येणारी अस्वस्थता, घालमेल, उत्सुकता, मुख्यपरिक्षेला पोहचल्याचा आनंद, पेपर कसा येईल याचा तणाव... रिव्हिजन....विचार..काय काय सुरू होते..माहिती नाही.....बेल वाजली...मी वर्गाकडे निघालो..वर्गात पहिले पाऊल टाकले..आणी...मन भरून आलं..या टप्प्यापर्यंत येण्यासाठी झुंज दिलेला सारा काळ क्षणात मनात दाटून आला....स्वतःला आवरून मी बसलो..स्वतःला बजावलं ..स्वतःतील सर्वोत्तम द्यायची वेळ आहे भावनाशिल होवून चालणार नाही...

पेपर आला..मराठीचा पेपर...हात फुरफुरायला लागले...त्या भारावल्या क्षणात मी निबंध लिहायला घेतला.."साहित्य व समाज सुधारणा"...लिहीत गेलो..पुस्तके समाजाला कसे घडवतात..माझ्यासारखे कसे घडतात याचा अंश घेवून मी स्वैर लिहीत होतो..इंग्रजी, हिंदी, मराठी, भाषेतील साहित्य, लोकसाहित्य, अनुवादित साहित्य, समाज घडवलेल्या महान धुरीणीचे साहित्य ...मी लिहीत गेलो..पेपर सोपा गेला..परत आलो खुशीत होतो..संदिपला पण सांगितले, तु अवघड विषय निवडलास..फारच कमी पोरांनी हा विषय निवडला..पण काळजी करू नको अवघड विषय लिहिल्यास शक्यतो चांगले मार्क येतात..त्यात तु साहित्यिक भाषेत लिहीले आहेस चांगले मार्क मिळतील असे म्हणून त्याने आत्मविश्वास वाढवला..नंतर इंग्रजीचा पेपर दिला ...तो मात्र अवघड गेला टेन्शन आलं...पण त्याचा परिणाम पुढील पेपर वर होणार नाही याची काळजी घेतली. सामान्य अध्ययनचे पेपर संपले..मी सर्व पेपर सोडवत होतो..लिहीणे शिल्लक राहत नव्हते..सर्व प्रश्न अॅटेम्पट केल्याने आत्मविश्वास येत होता ..आता फक्त दोन ऐच्छिक विषयाचे पेपर होते..साधारणतः सहा दिवस परिक्षा शिल्लक होती..

आणी अचानक संदीपने सांगितले मी पुढचे पेपर देणार नाही..लातुरला परत जात आहे..धक्काच बसला..कसेतरी तगत होतो..एकमेकांना आधार देत होतो..हिम्मत ढासळू देत नव्हतो ..तर हे मधेच...मला दुहेरी टेन्शन आलं..परिक्षे बाबत एकटेपण तर आलेच होते..पण घेतलेली रूम , तीचे भाडे शेअर होत होते..आता अशा अचानक घटनेमुळे संकटंच आले होते..बोलता ही येत नव्हते...पण न बोलता ही कळेल असे जिगरी दोस्त असल्यानेच तर मी संकटांना तोंड देवू शकत होतो...संदिपने मला सांगितले, मी माझ्या मित्राला बोललो आहे, त्याचे क्वार्टर आहे तेथे तु शिफ्ट हो, सध्या त्याची पत्नी गेल्याने तो एकटाच आहे तुला व त्यालाही डिस्टर्ब होणार नाही...कारण तो सकाळी ऑफिसला निघुन जाईल तुला अभ्यास करता येईल....पण तरीही मी खुप अस्वस्थ झालो...औरंगाबाद मधे एकटेच अनोळखी ठिकाणी राहून राज्यसेवा मुख्यपरिक्षा द्यायची वेळ आली होती संदिपला शिव्या घालाव्या की त्याने परस्पर अडचण सोडवली म्हणून आभार मानावे कळत नव्हतं....तो लातुरला आला आणी मी त्याच्या मित्राकडे रहायला गेलो..एक अदृश्य हात पुन्हा मदतीला धावून आला होता...

मी माझ्यामुळे त्याच्या मित्राला काही त्रास होईल असे काही होवू नये याची काळजी घेवून तिथे अभ्यास करत होतो..आणि तो बिचाराही माझी तेवढीच काळजी घेत होता..मी अभ्यास व एकटेपणाचे दडपण काय असते याचा घेतलेला हा सर्वात भयानक अनुभव...त्या वर्षी बॅंकिंग हा विषय खुप जणांनी घेतला होता त्यापैकी मी एक तो पेपर झाला..ठिक गेला..लोकप्रशासन हा माझा दुसरा ऐच्छिक विषय होता दोनशे मार्कांच्या या पेपर साठी दोन उत्तर पत्रिका मिळायच्या शंभर शंभर मार्कांचे लोकप्रशासन व दुसरी व्यवस्थापन या विषयासाठी, हा विषय या कारणामुळे खुप कमीजण घ्यायचे..मी तो घेतला होता..पेपर चांगला सोडवले..एकंदरीत मुख्यपरिक्षा ही ठिकच्या पातळीपेक्षा खुप चांगली गेली होती..मी संदिपच्या मित्राचे आभार मानले.. एक मोठा टप्पा पुर्ण करून मी परत निघालो..

ज्या गाडीत मी होतो त्याच गाडीत मला काॅलेजला लोकप्रशासन शिकवणारे ठोंबरे सर ही भेटले, त्यांनी विचारपूस केली, पेपर पाहिले..सोपे पेपर आले होते ..व्हाल पास म्हणून शुभेच्छा दिल्या..मी आभार मानून माझ्या जागेवर बसलो..औरंगाबाद मागे पडत होतं..मी आजपावेतो या टप्प्यापर्यंत येण्यासाठी खुप खस्ता झेलल्या होत्या..रोज याच कारणाला घेवून मी दिनक्रम आखला होता. आता मुख्यपरिक्षा पार पडल्याने त्या दिनक्रमात बदल होणार होता..रोज जे करत होतो ते आता बदलावे लागणार होते..माहिती नव्हते काय होणार होते..मी ही विचाराची आणी येवू घातलेली अनिश्चितता झटकली..व निकालाच्या अनिश्चिततेत स्वप्नरंजन करू लागलो... गाडी धावत होती रात्र गडद होत चालली होती...आणी मी त्या अंधारात दुरवर दिसणा-या हर लुकलुकणा-या दिव्यात माझी प्रकाशवाट शोधत होतो.......(प्रताप)
(क्रमशः)




Saturday, August 31, 2019

....मुक्ती....?


तुलाही तगमगून यावे कधी
गुलाब सुकला  पाहून
तु हळुवार तपासावेस मग
माझे गेले शब्द  वाहून

तु शोधावीस माझी कविता
माझ्या शब्दांनी अदृश्य व्हावे
तुझ्या निःश्वासानी मग कळवळून
आर्त विरहीणी गावे

जो जो तु करावा पुकारा
गीत माझे मुके व्हावे
शोधणा-या तुझ्या नजरेत
मग धुके ओले दाटून यावे

माझी आर्जवे अव्हेरल्याने
तुझ्यात रितेपण भरून यावे
तुझ्या अवेळी धैर्याचे मग
जितेपण सरून जावे

छळावा तुला आजही
त्या ठेवल्या गुलाबाचा गंध
पौर्णिमेचा चंद्र ही भासावा
जणू जळता दिवा मंद

त्या तुझ्या जुन्या वहीला
माझ्या कवितेचा भास व्हावा
दोन ओळीत नसलेला शब्दही
मग तुजसाठी खास व्हावा

नसलेपणाची व्यथा काय असते
मग तुलाही नक्की  कळेल
माझ्या अमर्याद अंधारात जेंव्हा
तुझे ऊभे चांदणे जळेल

तु फाडशील वही, साधशील तु
हा गुलाब चुरगळून युक्ती
पण तुझ्या आत्म्यात रूजल्या
शब्दगंधापासून कशी मिळवशील मुक्ती......?

(प्रताप)
31/8/2019
"रचनापर्व"

Friday, August 30, 2019

प्राजक्त सडे...

               


झडले प्राजक्त सडे
                             गंधाची हलकी दरवळ
                             मातीच्या ओलाव्यातुन
                            अंकुरे अलगद हिरवळ

     सुर्य उगवण्या पुर्वी
     हा प्रकाश फुलून येतो
     रातीचा सखा हा असा
     तिचा तत्पर निरोप घेतो

                           रातीचाही न निघे पाय
                           न प्रभाप्रकाश दिर्घ राही
                           सूर्याच्या किरणापुर्वी प्राजक्त
                           त्यांचे धुसर मिलन पाही

    संध्याप्रकाश बनून मग पुन्हा
    तो रातीस भेटण्या येतो
    स्वतःत भरून तमगंधास तो
    रातीत मिसळून जातो

                           हर सकाळी विलगताना
                           दोघेही व्याकुळ थोडे
                           या व्याकुळ क्षणांचे साक्षी
                           हे कोसळलेले प्राजक्त सडे
(प्रताप)
31/8/2019
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com







Wednesday, August 28, 2019

आठवणींचे हाकारे....

आठवणींचे हाकारे......

पावसाच्या तुषाराचे
हे असे ओढ़ गाणे
वा-याच्या झुळकीने
भिजुन जाती पाने

साद ओली आर्त
थेंब थेंब मग कोसळे
ढगांच्या आतखोलवर
ओला पाऊस ऊसळे

ही भुरभुरणारी आठवण
आज शिंपली कोणी
हलक्या तुषारांतुन मग
रंग सांडला बेभानी

शब्दांनाही ओल फुटे
हिरव्या रंगास ओढ लागे
कोसळणा-या सरी का विणती
ओल्या आठवणींचे धागे

कानी मनी घुमती
तुझ्या मुक सादेचे पुकारे
पाऊस असा हा ओला
ऊठवी आठवणींचे हाकारे
(प्रताप)
29/8/2019
"रचनापर्व"



Saturday, August 24, 2019

भिजकी वही.....



भिजकी वही....
शब्द ही झाले ओले
वाहिल्या फुलांचे
जणु निर्माल्य जाहले

वाहून गेले शब्द ठसे
राहिल्या भाव खुणा
धुसर शाई मांडे ठळक
आपुला ॠणानुबंध जुना

तो पिंपळ ही मुका
हुरहुर नुसती वाहतो
आभाळाच्या सांजकडेतुन
एक ढग पाहतो

ती वाट अधिरतेने
का अनंताकडे चाले?
फुलांचा पडला सडा
का सुगंधातुन बोले?

झुळुक सुगंधी होवून
ओल्या वहीला स्पर्शते
निर्माल्याचा घेवून गंध
का काव्य हर्षते?

शब्दवेड्या कवितेस लागे
भिजल्या वहीचे पिसे
शब्दावर मग ऊमटून घेते
तुझे गोंदण ठसे

हृदयाच्या आत खोलवर
'तु ' पण रूजुन गेले
अमिट तुझे असणे असे
जरी शब्द भिजुन गेले...
(प्रताप)
"रचनापर्व"
25/8/2019





Saturday, August 17, 2019

ओल्या आठवणींचे झुले....




ओल्या ओल्या वाटा
मंद चंद्र भिजलेला
ओल्या पाखरांचा थवा
पंखाआड निजलेला

ओल्या ओल्या झुळुकीतुन
एक पुकारा येई
चिंब भिजल्या वाटेवर या
भास कुणाचा होई?

ओल्या ओल्या फांदीवर
पानांना येई शहारा
शिलगत्या अंधारावर या
प्रतिक्षेचा पहारा

ओल्या ओल्या रातीच्या
अंधाराआड प्रकाश दडे
आकाशातुन चंद्र पाझरे
सोनसरीचे सडे

ओल्या ओल्या क्षणात
सय दाटून येते
निशीगंधाची साद बावरी
श्वासात गोठून जाते

ओल्या ओल्या डोळ्यांना
पावसाचा येतो रंग
इंद्रायणीत तरंगे मग
एक आर्त अभंग

ओल्या ओल्या रातव्यात
असे सारे होते ओले
चंद्राला भिडतात मग
ओल्या आठवणींचे झुले.....
(प्रताप)
18/8/2019
" रचनापर्व "
















Sunday, August 11, 2019

बेभान पावसा...लक्षात ठेव...!!

(• महाराष्ट्रात आलेल्या महापुराशी भिडलेल्या सर्व झुंजारूना समर्पित•)
.
आम्ही केली तुझी आर्जवे
नांगरून ठेवली होती शेती
पावश्या करवी पुकारून तुला
रापवून ठेवली माती

हिरवे स्वप्न पाहताना
तु मात्र पेरून गेलास गाळ
शिवारासह कोलमडले घर
वाहीला रानोमाळ

घर बुडाले सारे
गुरे गेली वाहून
सुन्न झाली मती
तुझे तांडव पाहून

तु फिरलास सगळा गाव
अडगळीतही आमच्या आलास
कळसावर चढून ऊंच तु
मंदिर धुवून गेलास

तुला शाळेतही यावेसे वाटले
तु वर्गात बसलास ठाण मांडून
'ये रे,ये रे पावसा 'म्हणना-या
चिमुकल्यांशीही गेलास भांडून

नेलेस जरी तु सारे वाहून
तरी आम्ही ऊभे राहू
आमच्या झुंजीने देवू टक्कर
कोण थकते ते पाहू.

हाताला हाताचा आधार आहे
खांद्याला भिडलाय खांदा ईथे
डोळ्यात अपार घेवून आशा
गाताहोत आम्ही समर गिते

आम्ही गाळ ऊपसु
आम्ही बांधुन घेवू गावे
खोडून काढू आम्ही तुझे
मोडून पडण्याचे दावे

अशा अनंत सुल्तानी आस्मानी
आम्ही भोगल्या आहेत
तेंव्हाच "स्वराज्याच्या पताका"
महाराष्ट्रात लागल्या आहेत

आम्ही हे समर ही जिंकु
तुझ्या नजरेतही अभिमान असेल
पुढच्या मोसमात आमची माती
जेंव्हा रापुन तुझ्यासाठी हसेल...

(प्रताप वाघमारे, तहसीलदार नागपुर-● 9422642842)
●"रचनापर्व"●















Saturday, August 10, 2019

○ कवितेचे थवे...○



स्वतःच्या अस्तित्वाचे
विस्कटलेले धागे शोधण्या
प्रतिमेचे औजार घेवून
निघतो तमगर्भ खोदण्या

तमअदृश्य सावली
मी सोबतीला घेई
अभिव्यक्त होण्याची
मग दाटून येते घाई

चेतवतो मग असे
मी प्रतिकांचे दिवे
हाकारतो आर्जवाने
कवितेचे थवे

अंधार गहिरताना
मनिचा प्रकाश झुंजत राहतो
मी धागे भावनांचे
हळुवार पिंजत राहतो

मी लढतो, मी भिडतो
मी शोधत राहतो शब्द
भोवतालच्या अंधारातुन
मी टिपतो कवितेचे प्रारब्ध

अंधाराच्या काळजावर
नित्य देतो मी शब्दांचे ठसे
संपत नाही तरीही
स्वअस्तित्व शोधाचे पिसे...

●(प्रताप)
10/8/2019
"रचनापर्व "●


















Tuesday, August 6, 2019

हिमतीचा द्यावा टाका



नसतो कधी प्रकाश!
संधिप्रकाशावर भागते
अंधाराच्या काळजावर
मग एक पणती लागते.

फाटलेच कधी आभाळ तर
हिमतीचा द्यावा टाका
अपार सा-या कष्टाने
लांघावा हरण्याचा धोका

घडत नसेल नशिब
तर द्यावेत घणांचे घाव
जिद्दीने कोरावे मग आपण
त्याच्याच कपाळी नाव

येतात अनंत अडचणी
तरीही द्यावी पावलांना दिशा
मरू न द्यावे कधी मनातील
झुंजण्याची नशा

कर्तृत्वाचा कैफ न येवो
जमीनीवर सदैव रहावे
जिंकण्याच्या जल्लोषातही
हरणा-याचे दुःख पहावे

नाही पोहचत आवाज तरी
देत रहावी साद
उधळून द्यावे समर्पण
अन् रहावे निर्विवाद

होते तरीही कधी टिका
त्यास टाकाचे घाव मानावे
गाळून स्वतःतील दगडपण
स्वतः सुबक बनावे.

निर्भय होवून मानवतेचे
गित सदैव गावे
फुलून येण्या सारे
स्वतः पाऊस बनून जावे
(प्रताप)
7/8/2019
"रचनापर्व "









Monday, August 5, 2019

सडा फुलांचा उरतो..






आज पुन्हा पक्षी भिजले
सर अनाहूत आली
भिज मनाने झेप घेवूनी
चिवचिव झाली ओली..

साद भिरभिरे अनंतात
ओल्या ओल्या हाका
पंखांच्या ऊबेआड मग
अवकाश होई मुका

अंधारातून ढग वाहतो
समर्पणाची धारा
मोहरून जाते दिशा एकली
सरसरतो हा वारा

फुल ऊमलते मुक्यामुक्याने
सुगंध मातीत झरतो
सकाळ होता ऊंच भरारी
सडा फुलांचा उरतो...
(प्रताप)
6/8/2019
"रचनापर्व "

Sunday, August 4, 2019

मातीचा टाहो फुटावा...



काळ्या ढगात दडलेले
हिरवे कंच गाणे
सर बनून कोसळताना
मन उधाणून येणे...

भिजलेले रस्ते अन्
ओली ओली वाडी
झाडाच्या फांदीखाली दिसे
प्रतिक्षारत बहर घडी

थेंबाथेंबाने सारे
अवकाश चेतून गेले
हिरवे हिरवे स्वप्न अनोखे
मातीत रुतून आले

बहर मनाचा उमलून आला
गंधाळल्या पाऊस धारा
चिंब भिजल्या मातीचा
रंग हिरवा सारा..

मी थेंबगाणे ऐकत
मुका एकला ऊभा
तुझ्या -हृदयी रूजण्याचा
माझा अव्यक्त मनसुबा

बहर यावेत नात्यांना
विश्वासाचा पाऊस यावा
तुझ्या माझ्या मनाला मग
मातीचा टाहो फुटावा
(प्रताप)
5/8/19
"रचनापर्व "






Friday, August 2, 2019

पावसा.....


पावसा...

तु आलास घेवून असे
हिरवे पालवीचे गाणे
ओल्या मातीत अंकुरले
मग सृजनाचे उखाणे

पावश्याने असे आर्त
गीत रे कोणते गाईले ?
ढगांचे अंतःकरण असे
कळवळून कोसळून वाहीले

मातीचा ओला पुकारा
तुझ्या थेंबातुन झरतो
एक ओला पक्षी अवकाशी
तुला झेलत फिरतो..

ओक्याबोक्या झाडांनी
तुला अलगद धारण केले
उजाड माळरानांचे मग
क्षण हिरवे झाले...

कोसळणे तसे वाईट
पण तुझे मात्र भावते
तुला पेरण्या कवितेत
शब्दांचे भले फावते..

माझ्या खिडकीचा कोपरा
तुझ्या रिपरिपीचे गाणे
तुझ्या ओल्या सरी सोबत
मन गाव शिवारात जाणे

तुला अनंता पासून शिवार बनून
मी दर मोसमी पुकारतो
तुझ्या सरीचे दान हिरवे
ओल्या ओंजळीत स्विकारतो..

कुंद एकल्या मनातही अशा
तुझ्या बरसाव्यात सरी
जगण्याची हिरवळ फुलुन यावी
हर मलूल झाल्या ऊरी...

( प्रताप)
4/8/19
"रचनापर्व"



















Sunday, June 23, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 18: निकालाने दिलेला चकवा....!



स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 18: निकालाने दिलेला चकवा....!


         परिक्षा खुप जवळ आली होती.PSI च्या परिक्षेची तयारी करणारे सर्व मित्र पुन्हा राज्यसेवा कडे वळले. आता त्यांना खुप कमी दिवस मिळत आहेत राज्यसेवा पुर्व परिक्षा तयारी साठी याची जाणीव झाली. माझ्याकडच्या मी काढलेल्या नोट्सला घेण्याची झुंबड व्हायची ,रिव्हिजन साठी व एकत्रित सारेच मुद्दे जवळपास त्यात होते त्यामुळे सर्वांनाच फायदा व्हायचा. मी ही त्या देत असे कारण मला ही त्यात नविन काही अपडेशन करायला मिळायचे. सर्वांचा अभ्यासाचा झपाटा वाढला. पावसाळ्याची चाहूल लागल्यावर मुंग्या जशा वारूळ बनवायला भिडतात!! तसे सर्व जण अभ्यासाला भिडले होते. मीही त्यात सामील झालो. अभ्यासात, अभ्यासाच्या कालावधीत व अभ्यासाच्या दर्जात मी कुठेच मागे पडत नव्हतो. तो अक्षरशः झपाटलेला काळ होता!! एकाच 15×15 च्या खोलीत आम्ही सगळे जण अभ्यासाला बसायचो, पण रात्री सगळे गेल्यावर झोपताना कोण कुठल्या रंगाचा शर्ट घातला होता हे आठवायचा प्रयत्न केला तर तो आठवायचा सुध्दा नाही!!! कारण काय? तर अभ्यास करण्याच्या चक्कर मधे तेवढीही उसंत व सैलपणा घेतलेला नसायचा. भारून जाणे काय असते जर कोणी सांगत असेल तर मला तोच काळ आठवतो आजही!!!! अभ्यासाच्या ठिकाणी कोण येत आहे, कोण येवून गेले? काही लक्ष नाही. एके सायंकाळी रूम बाहेर निघताना दाराच्या जवळच्या लोखंडी खुर्चीवर डझनभर केळी असलेली एक पिशवी ठेवलेली दिसली..प्रत्येकाला वाटले आमच्या पैकी कोणी आणुन ठेवली असेल..!! रात्री रूमवर गेल्यास भावाने सांगितले वडील येवून गेले होते..! आणी जाताना सांगुन गेले होते. "जपून अभ्यास करायला सांग त्याला , जास्त ताण घेवू नको म्हणावं! " मला हुरहुर लागली! रात्री आपोआप डोळ्यात पाणी आलं..रात्रभर विचार..डोळ्या समोर पावसात गळणारं घर..आई वडीलांचा चेहरा.. अभ्यासाच्या विषयातील मुद्दे, नोट्सच्या कोप-यात वेगळ्या शाईने लिहिलेले चालू घडामोडीचे मुद्दे... रूम वरील ओढाताण..सगळंच दाटून येत होतं..स्वप्न झोपू देत नव्हतं.........!!!!



          शेवटच्या टप्प्यात अक्षरशः अभ्यासा व्यतिरिक्त काहीच केलं नाही. माझी रूम जवळच असल्याने मी रात्री सर्वात शेवटी निघत असायचो..पण शेवटी शेवटी असं वाटायचं की फक्त 5 तासासाठी रूमवर कशाला जात बसू? मग मी कधी कधी तेथेच थांबू लागलो. तिन लोखंडी खुर्च्या जोडायच्या आणी मिळेल तेवढी झोप घेवून, सकाळी सगळे येण्या अगोदर तेथेच तयार होवून बसून जायचे...हिमायत भाई पहाटेच हाॅटेल सुरू करायचे..थोडासा चहा घेतला की मग दुपार पर्यंत दगडाची मुर्ती बनून जायचो. सर्वांचा अभ्यास खुप चांगला झाला होता. दररोज अपडेशन, डिस्कशन, रिव्हिजन, व्ह्यल्यु अॅडिशन...बस्स..जणु रणधुमाळीच...अभ्यासात एवढी हातघाई आणी चढाओढ की..जणु अभ्यास केला तरच जिव वाचणार आहे..परिक्षेचा दिवस येइतो अक्षरशः सारे मुखोद्गत झाले होते..

         सरते शेवटी 30 मे आला..मिळालेल्या हाॅल टिकीटला कितीतरी वेळा पाहून ठेवले होते. सगळे जण एकत्र भेटलो..परस्परांना शुभेच्छा दिल्या. चुका करायच्या नाहीत, येते ते चुकायचे नाही, जे येत नसेल त्यालाही सहजासहजी सोडायचे नाही, रोल नंबर व उत्तरांचे गोल काळे करताना त्यांचा क्रम, हे दोन्ही चुकवायचे नाहीत.एकापेक्षा अधिक काळे बाॅलपेन घेतले का? ते व्यवस्थित रूळवलेले आहेत का? इत्यादी लहानात लहान तपशील एकमेकांना विचारून, आम्ही निघालो. मी जाताना कुठलेही दडपण येणार नाही याची काळजी घेत होतो..परिक्षा केंद्रावर पोहचल्यावर पाहीले, भरपूर गर्दी, गर्दीत ओळखीचे चेहरे..कोणी सिनीयर्स, कोणी नवखे.. कोणी घाबरलेला,कोणी उत्साहात, कोणाच्या पोटात गोळा उठत आहे..कोणी मित्रमैत्रिणीना बोलत आहे...मी एका कोप-यात ऊभा होतो...स्वतःला शांत ठेवत..बजावत स्वतःला "आपल्याला एकही चुक परवडणार नाही..." वडीलांचे शब्द आठवत होते.." घडी गेली की पिढी जाते" मी ही परीक्षेची घडी आयुष्यातून जाऊ द्यायची नाही हा निग्रह करून वर्गात गेलो...

       पेपर मिळाला..प्रत्येक गोष्ट अचुक ठरवल्याप्रमाणे घडत होती..प्रश्नाची गुंतागुंत भुलभुलैया तयार नाही करू शकली.. थेट ऊत्तरापर्यंत पोहचू शकत होतो. केलेला अभ्यास, मित्रांचे योगदान कामी येत होते..जसजसे प्रश्न सुटत होते,तसतसा आत्मविश्वास येत होता. प्रथम टप्प्यात आलेले दडपण निघून गेले होते.....वेळे अगोदरच येणारे प्रश्न सोडवून संपले होते ..ऊरलेल्या वेळात न येणा-या प्रश्नाना सोडवण्यासाठी प्रयत्न केला..त्यातील भरपूर प्रश्न बरोबर आल्याचा विश्वास वाटत होता. वेळ संपली..पेपर समाधानकारकरित्या सुटला होता..पण वाटते तसे काही नसते..जो पर्यंत आन्सर की शी ताडून पाहत नाही तो पर्यंत काहीच सांगता येत नसते हे माहित असल्याने त्वरीत अभ्यासाच्या ठिकाणी पोहचलो..एकेकजण जमले...अगोदर एकमेकाचा चेहरा पाहून घेऊन ,पेपर कसा गेला? हे विचारून सगळे जण उत्तरे शोधायला बसलो.( त्या काळी MPSC आन्सर की देत नसे) 200 पैकी बहुतेक प्रश्नाची उत्तरे(192) शोधली. अत्यंत अवघड प्रश्नाची उत्तरे पण आमच्याकडे होती. उरलेले प्रश्नाची उत्तरे इकडे तिकडे फोन करून घेतली. अत्यंत अभिमान तेंव्हा वाटला जेंव्हा पुण्यात पण दोन प्रश्नाची उत्तरे सापडत नाहीत असे तिकडून सांगितले गेले, त्यावर त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही सांगितले. ( ते माझ्या नोट्स मधे होते)खरंच असा ग्रुप होणे नाही!!!

       सर्व सोडवलेले प्रश्न तपासून घेतले. आम्ही सगळेच सेफ झोन मधे होतो!! मला खुप आनंद झाला.माझा रिझल्ट पॉझिटीव्ह येईल याचा अंदाज आल्याने मी लगेच मुख्य परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी जुळवाजुळव करायला सुरूवात केली. संदिप म्हणाला "अबे! मरशील ना, एक तर दिवस थांब!" मी ऐकूनही माझे काम सुरूच ठेवले.मुख्य परिक्षा माझ्या टाईप साठी अत्यंत योग्य होती. दिर्घोत्तरी स्वरूपाची!! मला माझी स्ट्रेंथ माहीत होती. मी कितीही अवघड पेपर आला तरी उत्कृष्ट लिहू शकतो हा आत्मविश्वास मला होता. मी नुकतीच M.A. ची परीक्षा दिली असल्याने लोकप्रशासन हा एक विषय जवळपास तयार होता पण त्याला MPSC च्या पध्दतीने तयार करायचे होते. जनरल स्टडीज, ईंग्रजी, मराठी व बॅकिग हा दुसरा ऑप्शनल निवडून मी तयारी करायला बसलो.
पुर्व परिक्षा झाल्यानंतर तांदळे सर, अतुल पाटील यांच्या रजा संपल्या ते जाॅईन झाले. अरूण भैया बाहेरगावी निघून गेले. राहिलो मी आणी संदिप!! संदिपचा खरा इंटरेस्ट ऑब्जेक्टीव्ह टाईप परिक्षेत होता. दिर्घोत्तरी प्रश्नाच्या परिक्षेला मला मर्यादा येतात हे तो स्वतः कबुल करायचा. आणी ते होते ही खरेच! कारण 200 पैकी पुर्व परिक्षेला 192 बिट असणारा तो एकटाच होता!! मी परिक्षा झाल्यानंतर एकदा घरी जाऊन आलो. आईवडील व दोन्ही भाऊ यांना माझे पेपर चांगले गेल्याचा खुप आनंद झाला होता. माझा पुर्व परिक्षेचा रिझल्ट येणारच या बाबत त्यांना माझ्या एवढाच आत्मविश्वास होता. मी जवळपास एकट्यानेच अभ्यास करत होतो. मुख्य परिक्षा कशी असते. कसे पेपर सोडवायचे असतात या बाबत निव्वळ कोरी पाटी!! पण शाहू काॅलेज व दयानंद काॅलेज मधे कला शाखेत शिकायला मिळाले होते!! मी अत्यंत कल्पकतेने मुख्य परिक्षेचा अभ्यास करू लागलो. पुर्व परिक्षेचा निकाल कधी लागेल याचा विचार असायचा सतत मनात. एक महिन्याने एम ए चा निकाल लागला युनिव्हर्सिटीच्या गुणवत्ता यादी मधे यायला फक्त 3 मार्क कमी पडले. पण हे मार्क्स काही कमी नव्हते. आता प्रचलीत पध्दतीने ऑफिसीयली काॅलेज शिकणे संपले होते!!

          दरम्यानच्या काळात कधी कधी दोन तीन दिवस सेंटर कडे कोणीही यायचे नाही. मग मी तरीही बसायचो एकटाच ....अभ्यास करत .दरम्यानच्या काळात मला मुख्य परिक्षा साठी सोहम सोबतच ज्ञानप्रबोधिनी या क्लासेस वर संचालक सुधिर पोतदार सरांनी शिकवण्यासाठी बोलावले. तेथेही तयारी करणा-यांची संख्या खुप चांगली होती. विशेष म्हणजे तेथे धन्वंतकुमार माळी सर ( नंतर Dy.Ceo), महेश वरुडकर सर (माझ्या सोबतच कक्ष अधिकारी) ज्योती चव्हाण मॅडम( नायब तहसीलदार), भांबरे सर , प्रकाश कुलकर्णी सर या सर्वांचा संच तेथे भेटला. पण तेथे मी शिकवायला जात असल्याने एकत्रित अभ्यास करायला मिळाला नाही कधी! तसेही आमचा ग्रुप वेगळ्यानेच अभ्यास करत होता. व तिकडे ते अभ्यास करत असत. तेथे शिकवताना जाणवले की, मुख्य परिक्षा बाबत आपल्याला नैसर्गिक समज तर आहेच पण विषय मांडण्याचीही विशेष शैली आहे. कारण शिकवत असताना या सिनीयर मंडळीकडून कधी निगेटिव्ह फिडबॅक तर आला नाहीच. उलट त्यांनी प्रचंड कौतुकच केले.शिकवत असताना काही सिनीयर्सनी त्यांच्या मटेरिअल मधे व्ह्यल्यु अॅडिशन होत आहे हे स्पष्टपणे सांगितले. आत्मविश्वास होताच ! तो वाढला.( कदाचित मी असा एकमेव असेन, ज्याने स्वतः पुर्व परिक्षा देत असतानाच इतरांना शिकवले, ती झाल्यावर मुख्य परिक्षा देत असतानाच इतरांना शिकवायची संधी मिळाली, आणी मुलाखतीची तयारी करताना ही इतरांना मुलाखती बाबत शिकवायला मिळाले...!! इतर सर्वजण सिलेक्शन झाल्यावर अथवा परिक्षेचा तो विशीष्ठ टप्पा पुर्ण झाल्यावर त्या अगोदरचा टप्पा इतरांना शिकवतात पण मी ज्या टप्प्याची तयारी करत होतो त्याच काळात तो द्यायच्या अगोदरच इतरांनाही शिकवत होतो) नंतरच्या काळात ज्ञानप्रबोधिनी लातुर मधे गेस्ट लेक्चरर म्हणून रंजन कोळंबे सर, राहूल माकणीकर सर (सध्या DCP नागपुर पोलीस -ज्यांनी महाराष्ट्रात STI मधे रेकाॅर्ड मार्क्स घेवून सिलेक्शन मिळवले, सबंध महाराष्ट्रात ज्यांचा नावलौकिक त्यांच्या अभ्यासामुळे व शिकवण्यामुळे होता व नंतर त्यांचेही आमच्या सेम बॅचमधेच Dysp म्हणून सिलेक्शन झाले.) यजुवेंद्र महाजन सर इत्यादी दिग्गजांशी तेथे संबंध आला. मी शिकवलेल्या विषयात तेथील मुलांची झालेली तयारी पाहून माकणीकर सरांनी केलेले कौतुक तर प्रचंड आत्मविश्वास देवून गेले..

        मी एकट्याने शिकत होतो, शिकवायला जाण्याने माझी मेन्सची दशा व दिशा योग्य आहे याचा अंदाज आल्याने मी तयारी वेगाने करत होतो. दिवसभर सोबत बसेल असे कोणी नव्हते. संदिप, तांदळे सर , अरूण भैया येत रहायचे अधुन मधुन .मी तेथेच अभ्यासाला बसायचो. पोलीस बाॅइजची एक बॅच आली. अरूण भैयाही मग रेग्युलर येवू लागले, कारण त्यांनाच ती बॅच चालवायची जबाबदारी होती. तेथे मला भारतीय राज्यघटना शिकवण्याची संधी मिळाली. एकदा भर रंगात येवून शिकवत होतो. अचानक नांगरे पाटील सर वर्गाच्या दारात ऊभे!!. थोडेसे टेन्शन आले पण मी शिकवण्याची गती व पद्धत बदलली नाही. सर साधारणतः2 मिनीटे थांबून , पाहून ,जाताना सर स्माईल करून गेले! ते निघून गेल्यावर मला जाणवले की अक्षरशः सर होते !

        पुर्व परिक्षा होवून खुप काळ लोटला होता..निकाल लागण्याची चिन्हे दिसत नव्हती. एक तर खुप गॅप नंतर, 2003 ची म्हणून 2005 मधे हातात आलेली जाहिरात ! पहिल्या वर्षी पुर्व परिक्षा तर दुस-या वर्षी मुख्य परिक्षा होणार आहे हे माहित नव्हते!!! अस्वस्थता दाटून येत होती. निकाल कधी लागेल याची खात्री नव्हती. दरम्यानच्या काळात PSI पुर्व परिक्षेचा निकाल लागला!! आख्खा ग्रुप पास झाला!! अर्थात मी ही!! पण मला वेध लागले होते ते राज्यसेवा पुर्व परिक्षा निकालाचे, सर्वजण PSI मुख्य परिक्षेचा अभ्यास करू लागले . इंग्लिशच्या तयारी साठी प्रा. लखादिवे सर मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांनी अत्यंत तळमळीने आम्हाला शिकवले. दरम्यानच्या काळात मी माझ्या स्तरावर मुख्य परिक्षेचा अभ्यास करत होतो.वडील अधून मधून निकाल कधी आहे म्हणून विचारायचे. त्यांना PSI चा निकाल आला आहे हे सांगितले. पण ते विचारायचे राज्यसेवे बाबत!!

          दरम्यानच्या काळात बरिश्ता हाॅटेलवर सगळेजण जमा होत होते.मी ज्यांना शिकवायचो, ज्यांना मला भेटायला यायचे आहे ते तिकडे यायचे. मग आम्ही अभ्यास, तयारी यावर बोलत असू..दरम्यानच्या काळात संदिपचा पुर्वाश्रमीचा( पण आमचा सगळ्यांचाच !!) मित्र, कायम धडपड्या, अत्यंत उत्साही व दोस्तीच्या व्याखेत चपखल बसणारा मित्र राजेंद्र ढाकणे शालेय पोषण आहार अधिक्षक म्हणुन सिलेक्ट झाला होता. त्याला अगोदर पासून ओळखत असल्याने खुप आनंद झाला. संदिप ही खुष होता. पण तो हलकेच एक मर्मभेदी प्रश्न विचारायचा,"कधी होइल यार आपले सिलेक्शन?"..मी त्याला आधार द्यायचो तो मला मानसिक आधार द्यायचा!!

           गज्या अनायसे सुट्टीला लातुरला आला होता, तो एम बी ए करून एका कंपनीत पुण्यात जाॅब करत होता. सचिन आडाणे पण होताच . एके सकाळी ते दोघेही बरिश्ता कडे आले. आमची चर्चा सुरू होती. शाळा काॅलेजचे मित्र असल्याने जरा जास्त आत्मीयतेने चर्चा सुरू होती. लवकर काही तरी सिलेक्शन झाले पाहिजे या बाबतच बोलत होतो तेवढ्यात बातमी आली आज पुर्व परिक्षेचा निकाल लागू शकतो!! एकदम धाकधूक वाढली! सगळे जमा व्हायला लागले! त्या काळात निकाल कलेक्टर ऑफिस मध्ये फॅक्स ने यायचा. पण MPSC ने नुकतीच वेबसाईट सुरू केली होती. सगळे जमा झाल्यावर वातावरणात एकदम टेन्स वाढून गेला. सगळे जण बसून बोलत तर होतो पण कधी चार वाजतील आणी कधी निकाल येईल याचीच वाट बघणे सुरू होते!! सरते शेवटी आम्ही सगळेच जण कलेक्टर ऑफिसला निघालो. तेथे पोहचल्यावर पाहीले खुपजण जमा झाले होते. दोन तीन वेळा आत जाऊन विचारणा केली. निकाल लावला जाईल म्हणून सांगितले, मन कशातच लागत नव्हते. सरतेशेवटी निकालाची प्रत भिंतीवर लावण्यात आली. खुप गर्दी होती..गर्दीतुन काही जण पास झाल्याचा निकाल लागल्याच्या खुशीत ओरडत तर काही जण पांढरा पडलेला, नाराज झालेला चेहरा घेवून बाजूला निघत होते. आम्ही ही गर्दीत घुसलो. आम्ही निकाल पहायला सुरूवात केली. अरूण पोतदार पास! , संदिप जाधव पास! तांदळे सर नापास!! माझाही नंबर काही केल्या मला सापडला नाही! लातुर सेंटर वरून एकुण 107 मुले पास झाली होती. काही तरी गल्लत होत असेल म्हणून मी पुन्हा पुन्हा माझा नंबर पाहीला. माझा चेहरा पाहून तो पर्यंत बाकीच्यांनी ओळखले..गज्या ने मला बाजुला घेतले. आम्ही काहीही न बोलता परत निघालो.परत येत असताना क्लासेस वरील मुले भेटली. विचारलं काय झाले ? मी सांगितले माझा नंबर नाही या यादीत म्हणून. थोडंसं पुढे आल्यावर मागून आवाज येत होता" असं होवूच शकत नाही, वाघमारे सर, प्रकाश कुलकर्णी सर यांचा अभ्यास खुप चांगला आहे पण तरीही त्यांचा रिझल्ट गेला यावर विश्वास बसत नाही " मी काहीच न बोलता परत आलो. सगळे जण जमा झाले होते. यशापयशाची चर्चा, समीक्षा , काहींना निकाल गेल्याचं दुःख,तर काहींना निकाल आल्याचा आनंद..! गेलेले आलेल्यांच्या आनंदात मनातुन सहभागी होवू शकत नाहीत आणी मित्रांचे निकाल गेले म्हणून ज्यांचे निकाल आले ते मनातुन आनंद व्यक्त करत नाहीत. यशापयशाचा फरक जाणवतो लगेच!! एक दिर्घ दरी असते...लांघताही येत नाही टाळताही येत नाही!!!

          मला प्रचंड दुःख झालं होतं. मी मनातुन अक्षरशः मोडून पडलो होतो, काय चुकलं, काय कमी पडलं, आपण तर सगळंच केलं होतं..तरीही निकाल निगेटिव्ह???? मनात प्रश्नाचं वादळ आलं होतं. काही बोलताच येत नव्हतं. परत येतो तो मोठा भाऊ राहूल भैय्या आणी वडील आलेले..लगेच त्यांनी ताडलं..मोठ्या भावाने विचारले..तुझा तर खुप अभ्यास झाला होता...पण जाऊ दे पुन्हा तयारी करू! असे तो म्हणाला. वडील म्हणाले PSI चा निकाल आलाच आहे तर त्याची तयारी कर तो पर्यंत पाहू राज्यसेवा देता येईलच !! मी मात्र मनातल्या मनात कुढत ऊभा होतो. माझ्या डोळ्यासमोर घर..येणारे एकटेपण, अभ्यास हे सगळं तरळत होतं . आता मी काय करणार होतो???? ते खुप वेळ बोलले. आणी मला समजवून निघून गेले. माझा मूड व चेहरा पाहून संदिप पण समजवत होता, बाकी सगळे जण समजावत होते..सरतेशेवटी या परिस्थितीत सर्वांनी तोडगा काढला आपण सगळे जेवायला जाऊ. थोडंसं वातावरण बदलेल..पुढचा विचार करता येईल. मला बिलकुल ईच्छा नव्हती. मी नकार दिला..सगळे जण माझ्यावर चिडले एवढे टेन्शन कशाला घेतो म्हणून, पण माझं आक्रंदनारं मन मी ऊघड करू शकत नव्हतो, हे सगळं सुरू असताना गजा शांत होता! तो काही तरी विचार करत होता. तो अचानक बोलला " किती जण पास आहेत लातुर सेंटर वरून?" कोणीतरी सांगितले 107! त्यावर तो म्हणाला ," लावलेल्या फॅक्स प्रिंट मधे 107 नंबर होते!! , म्हणजे जर ऊभ्या लाईन 14 होत्या तर आडव्या लाईन मधे 8 नंबर पाहिजे होते कारण शेवटच्या आडव्या लाईन मधे फक्त 3 नंबर होते!! म्हणजे 13×8= 104 + शेवटच्या आडव्या 14 व्या रांगेतील 3 मिळून 107 होतील, पण मी पाहिल्या त्यावेळी आडवी लाईन ही 8 ऐवजी फक्त 7 नंबरची होती. प्रत्येक आडव्या लाईन मधला शेवटचा नंबर अर्थात शेवटचा अख्खा ऊभा रो गायब आहे!!!!!" माझा श्वासच अडकला! मीही कॅल्क्युलेशन करून पाहीले तर गजाचे बरोबर होते!!


          मला एकदम तगमग झाली. सगळे बसले असल्याने मी एकटा पुन्हा कलेक्टर ऑफिसला जाऊन पाहीले गजाचे बरोबर होते! कोणाला विचारायला जावे तर ऑफिस बंद झाले होते. MPSC ऑफिस ही बंद झाले होते. मी यादी पुन्हा पाहिली माझ्या अगोदर चा नंबर व माझ्या नंतरचा नंबर याच्या दरम्यान लावलेल्या यादी प्रमाणे 647 नंबरचा चा गॅप होता , नेमका त्या 647 पैकी ज्याचाही नंबर आला असता तो रो च नव्हता व तो ही गजाने सांगितल्या प्रमाणेच!! अर्थात त्या शेवटच्या गायब रो मधे या 647 पैकी कोणीही असु शकत होते !! मी सुध्दा!! मी धावतच परत आलो. मी सगळ्यांना सांगितले. माझी एक्साइटमेंट नंतरही नकारात्मक निघाल्यास मला जास्तच धक्का बसेल याची संभाव्यता गृहीत धरून मला सर्वांनी एकदम शांतपणे प्रतिसाद दिला. एमपीएससी रिझल्ट वेबसाईटवर टाकणार आहे त्यावेळी पाहू सध्या सोबत चल म्हणून मला सर्वांनी अक्षरशः बळजबरी गाडीवर बसवले. मी आता खुपच तणावात आलो होतो. एमपीएससी माझ्या सोबत चकवा-चकवीचा खेळ करत होती. मी कुठल्याही तिरावर नव्हतो. अधांतरीच लटकत होतो!!!

         सगळे जण जेवण करत होते. मी खुप परेशान होतो. तोंडदेखल्या पध्दतीने हां हुं करून बोलत होतो. सगळे जण लातुर शहराबाहेर आले होते. त्यांचे जेवण होईतो मला धिर धरवत नव्हता! मी फक्त पाणी प्यायलो होतो. मला झालेल्या पराभवातुन बाहेर पडण्यासाठी एक अंधुकसा प्रकाश किरण दिसत होता. ना मोबाईल होता त्या काळात ना काही सुविधा! ऊठून परत यावे म्हटले तर कोणा सोबतच तरी यावे लागणार! मी 7.45 पर्यंत कशी तरी वाट पाहीली!! सरतेशेवटी मी जातो कसाही तुम्ही बसा म्हणून मी निघणार तो सचिन म्हणाला चल ! आपण जाऊ!! खरंतर त्याला माझी तगमग पाहवत नव्हती!! परत येताना तो गाडी चालवत चालवत मला समजावत होता, " आला तर आला रिझल्ट, नाही आला तर टेन्शन घेवू नको! पाहता येईल!"


           माझे लक्ष सगळे इंटरनेट कॅफेवर कधी पोहचतो या वरच होते! आम्ही पोहचलो! सुदैवाने बरिश्ताच्या काॅम्पलेक्स मधेच इंटरनेट कॅफे होते.गडबडीत मी आणी सचिन पोहचलो! मी भरभर टाईप करून MPSC ची साईट सर्च केली. हळूहळू ती उघडत होती..मी दिर्घ श्वास घेत होतो..मेन पेज आले. त्यावर रिझल्ट वर क्लिक करून दिले. रिझल्ट पेज स्पीड प्रमाणे ओपन होत होते..पहिली आडवी लाईन, दुसरी,तिसरी...(गजाने लक्षात आणुन दिलेला गायब रो ईथे स्पष्ट दिसत होता)..हळूहळू मला अपेक्षित असलेली लाईन व रो ओपन झाला!! आणी...माझा नकळत पाणावल्या डोळ्यातून मला माझा नंबर तेथे ठेवल्या सारखा दिसला!!

         कित्ती मोठा दिर्घ वळसा!!! जे अपेक्षित, जे सापडायचं ते एवढ्या मिनतवारीने व एवढ्या नाट्यमयतेने?!!!
(अशा प्रसंगामुळेच तर माझी ही कथा मला दिर्घ स्मरणीय आहे) मी आरोळी ठोकली नाही, मी हर्ष व्यक्त करण्याच्या स्थित यायलाही मला थोडा वेळ लागला. सचिन हसत होता..तु पास होणार हे वाटंतच होतं..तु नापास झाल्याचा विश्वास बसत नव्हता असे म्हणाला. मी बाहेर येवून PCO वरून गावात मामाच्या घरी फोन करून आईवडीलासाठी पास झाल्याचा निरोप दिला. रूमवर जाऊन भैय्याला सांगितले. त्यालाही खुप आनंद झाला. मी ऊभा होतो. सचिन म्हणाला आता काय? मी खुप खुष होतो. मी म्हटले तु जा माझ्यामुळे तुला जेवणही नाही भेटले, त्यावर तो गंमतीने म्हणाला "अरे चल आता पुन्हा सगळ्यांना जेवायला भाग पाडू".... मी सगळ्या मित्रांना ही बातमी द्यावी म्हणून निघालो..सचिन टु व्हीलर चालवत खुशीत बोलत होता...मी मात्र मुक होवून अपयश व यश यात किती मोठा फरक असतो याची तुलना करत होतो. काही तासापुर्वीची स्थिती व आत्ताची स्थिती यातील बदलाची याची अनुभूती घेत होतो. कदाचित MPSC भविष्यात आपल्याला चकमा देवू शकत नाही म्हणून तिने आत्ता असा चकवा दिला असावा असा विचार डोक्यात येत होता...गाडीवर मला लागणा-या हवेने
मला गावच्या माळरानावरच्या हवेची आठवण करून दिली होती....मी तेथे त्यावेळी फेकलेल्या स्वप्न बिजांनी अडचणीचा पाषाण भेदून ..मुळ धरले होते..बिज अंकुरायला सुरूवात झाली होती..मला वृक्ष होण्याचा ध्यास पुकारत होता......(क्रमशः)

अंतरात...